Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मुरगळणे / लचकणे
#लचक



मुरगळणे / लचकणे

काही वेळा दुखणी अचानक उद्भवतात. कंबरेत लचक भरणे, पाय मुरगळणे, डोळ्यांत कचरा जाणे, कान दुखणे इत्यादी दुखणे रात्रीबेरात्री सुरू झाल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. अशा वेळी आपण तात्पुरते घरगुती पण शास्त्रोक्‍त उपाय करू शकतो. जेणेकरून त्या वेळेपुरता थोडासा आराम मिळू शकतो; मात्र शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांकडे जाऊन दुखण्याचे नेमके कारण जाणून घेतले पाहिजे.

चालता चालता घरातच अचानक पाय मुरगळणे, मान लचकणे, कंबरेत उसण भरणे, डोळ्यांत काही तरी जाणे, कान दुखणे अशा गोष्टी अपघाताने होतात. रात्रीच्या वेळी किंवा काही अडचण असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. अशा वेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत आपण या दुखण्याची कशा प्रकारे काळजी घ्यायची, हे जाणून घेणे गरजेचे ठरते. म्हणजे दुखणे अधिक न वाढता त्याची योग्य प्रकारे काळजी घेता येऊ शकते.

कंबरेत भरलेली लचक : ही समस्या बहुधा सर्वांनाच कधी ना कधी जाणवते. घरात एखादी जड वस्तू उचलल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्यास, कमरेस हिसका बसल्यास कमरेवर ताण पडून लचक भरण्याची शक्यता असते. यामध्ये कंबरेमध्ये प्रचंड वेदना होतात. कंबर लचकणे हे दोन-तीन वेगळ्या प्रकारचे असू शकते. काही वेळा कंबरेभोवतीचे स्नायू थोडेसे फाकतात किंवा लिगामेंट दुखावून फाटू शकतात. काही वेळा कंबरेच्या चकतीची हालचाल होऊन तिला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे होणार्‍या वेदना हे व्यक्‍तीचे वय, तिचे वजन, तिने कोणत्या प्रकारचे वजन उचलले आहे, त्या व्यक्‍तीला आधीपासूनच काही कंबरेचा त्रास आहे का इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. कुठल्याही प्रकारे कंबरेमध्ये लचक भरल्यास सर्वप्रथम झोपावे आणि मांडीखाली उशी घ्यावी. यामुळे थोडासा आराम मिळतो. तसेच मज्जारज्जूवरील ताण कमी होतो. कुशीवर झोपायचे असल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी ठेवावी. त्यामुळेसुद्धा मज्जारज्जूंवरील ताण कमी होतो. आपल्याला चालते आणि सहज मिळते असे एखादे वेदनाशामक औषध घ्यावे. अर्थात, औषध अधिक प्रमाणात घेऊ नये. कंबर लचकल्यानंतर पायात मुंग्या येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरते. या मुंग्या पायाच्या पुढच्या आणि बाहेरच्या बाजूस पावलांपर्यंत येत असतील किंवा पायातील ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल, पायाचा अंगठा उचलता येत नसेल तर मात्र तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

पाय मुरगळल्यास : हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा वेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्‍या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्‍या उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. असे झाले तर पायाच्या घोट्याजवळ सूज येते. सूज आली असता त्या भागावर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेकण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. बर्फाचे खडे जाडसर पिशवीत घेऊन त्यात थोडे मीठ घालावे. पिशवीला गाठ मारावी आणि दुखत असणार्‍या जागेवर ही पिशवी काही वेळ ठेवावी. वेदना तीव्र होईपर्यंत ही पिशवी तशीच ठेवावी. नंतर पुन्हा ती दुसर्‍या जागेवर ठेवावी. अशा प्रकारे सलग 15 मिनिटे बर्फाने शेकावे. दिवसातून साधारणपणे दोन वेळा बर्फाचा शेक द्यावा. मुरगळल्यानंतर पायाला पूर्ण विश्रांती द्यावी. पाय शक्यतो उशांवर ठेवावा. बाजारामध्ये पायाला बांधण्यासाठीचे बँडेज मिळते. ते पायाच्या बोटांपर्यंत बांधावे जेणेकरून पायांच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सूज लवकर कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांत कचरा गेल्यास : सध्या प्रदूषण कमाल पातळीकडे सरकू लागले आहे. याखेरीज धुळीचे साम्राज्यही वाढू लागले आहे. गाडीवरून जाताना किंवा घरातही काही वेळा अचानक बारीकसा खडा, काचेचा तुकडा, लाकडाचा तुकडा, चिलटे किंवा अन्य काही डोळ्यांत जाते. रंगपंचमीच्या वेळी रंगही डोळ्यांत जाऊ शकतो. अशा वेळी डोळ्यांची अतिशय काळजी घेणे गरजेचे असते. कारण, डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे. अशा वेळी सर्वप्रथम डोळा स्वच्छ पाण्याने धुवावा. स्वत:च्या मनाने कुठलेही औषध डोळ्यांत घालू नये. दूध, मध, डोळ्यांत टाकणे अशा प्रकारचे घरगुती उपायही करू नयेत. त्वरित डॉक्टरांकडे जाणे हा सर्वांत योग्य मार्ग आहे. कारण चोळल्यामुळे किंवा इतर काही डोळ्यांत टाकल्यामुळे डोळ्यांची अधिक प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते. काही वेळेला डोळ्यांत चुना, सिमेंट जाऊ शकते. आम्ल डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना चटकन इजा होते. असे काहीही झाले तरी सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने डोळे धुवून लगेच डॉक्टरांकडे जावे. काही वेळेला मुलांकडून चुकून फेविकॉलसारखे पदार्थ डोळ्यांत जाऊ शकतात. अशा वेळीसुद्धा घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरांकडे जाणे अधिक फायद्याचे ठरते.

मान लचकल्यास : काही वेळा झोपेत मान लचकते किंवा आखडते. अशा वेळी मानेत खूप वेदना होतात आणि ती हलवणेही अशक्य होऊन बसते. त्यावर प्राथमिक उपाय म्हणजे घरात जर मानेला लावण्याची कॉलर असेल तर ती ताबडतोब लावावी. त्यामुळे मानेची हालचाल कमी होऊन तिला आराम मिळतो. शक्य तेवढी मानेला विश्रांती द्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादे मलम किंवा वेदनाशामक गोळी घ्यावी. मान लचकल्यानंतर हाताला मुंग्या येत असतील, हातांची ताकद कमी झाल्यासारखी वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.

दात दुखत असल्यास : काही वेळा रात्रीतून अचानकपणे दाढ दुखू लागते. हा ठणका सहन न होणारा असतो. अशा वेळी कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे आणि त्या पाण्याने चुळा भराव्यात. यासाठी माऊथवॉशचाही वापर करता येतो. यामुळे दातामध्ये काही अडकल्यास ते निघून जाऊन दातदुखी कमी होते. तसेच लवंगाच्या तेलामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो दातावर दाबून धरल्यामुळेही आराम मिळतो. साधारणपणे पाऊण तास हा बोळा दाताखाली धरून ठेवावा. आपल्याला चालत असणारी एखादी वेदनाशामक गोळीसुद्धा घ्यावी. मात्र, हा तात्पुरता उपाय झाला. कायमस्वरूपी उपचारासाठी दुसर्‍या दिवशी दंतवैद्यांकडे जाणे योग्य ठरते.

कान दुखणे : सर्व वयातील व्यक्‍तींना काही वेळेला अचानकपणे कानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात; परंतु पाच वर्षांच्या आतील मुलांची कानदुखी ही त्यांच्या कान व नाक यांना जोडणार्‍या नलिकेवर दाब आल्यास किंवा त्या ठिकाणी जंतूसंसर्ग झाल्यास निर्माण होते. मध्यकर्णामध्ये दाह निर्माण झाल्यास हे दुखणे कोणत्याही वेळी रात्री-अपरात्री उद्भवू शकते. अशा वेळी लहान मुलांना डॉक्टरांनी दिलेले सर्दीवरचे औषध ज्यामध्ये पॅरासिटेमॉल आहे, ते तात्पुरते द्यावे. यामुळे दुखणे बर्‍याच अंशी कमी होते. सकाळी मात्र लगेचच डॉक्टरांना कान दाखवावा. बर्‍याच मोठ्या माणसांना कान खाजवण्याची सवय असते. त्यासाठी ते हेअरपिन, कॉटनबड यासारख्या वस्तूंचा वापर करतात. कानातील मळ काढण्यासाठी कॉटनबडचा वापर करताना हा मळ कानाच्या अरुंद भागात ढकलला जातो. त्यामुळे कान दुखावण्याची शक्यता असते. काही वेळेला दमट हवामानामुळे कानात बुरशीसंसर्ग होतो आणि कान दुखू लागतो; तर काही वेळा घशातील जंतूसंसर्गामुळेही कानावर परिणाम होतो. अशा वेळी तात्पुरता उपाय म्हणून घरातील एखादे वेदनाशामक औषध घ्यावे; पण लगेचच दुसर्‍या दिवशी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हे सर्व उपाय तात्पुरते असून अडनिड वेळ उद्भवल्यास करावयाचे आहेत. त्यामुळे तेवढ्यापुरते उपाय करून शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांकडे जाणे श्रेयस्कर ठरते.

Dr. Anuja Lathi
Dr. Anuja Lathi
MBBS, Dermatologist, 13 yrs, Pune
Dr. Hitendra Ahirrao
Dr. Hitendra Ahirrao
BAMS, Family Physician General Physician, Pune
Dr. Suhas Sodal
Dr. Suhas Sodal
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Yogeshwar Sanap
Dr. Yogeshwar Sanap
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune