Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
सर्दी(पडसे)
#रोग तपशील#वाहणारे नाक



सर्दी(पडसे):

नाकातील श्लेष्मकलेच्या तीव्र शोथाला (दाहयुक्त सुजेला) सर्दी अगर पडसे असे म्हणतात. यामुळे नाकातील श्लेष्मकलेला शोफ होतो आणि ग्रंथी वाढून मोठया प्रमाणात स्राव तयार होतो. स्रावाच्या प्रकाराप्रमाणे नाकातून पाणी गळत असल्यास त्याला नाक गळणे, घट्ट चिकट व सहजी बाहेर न पडणारा स्राव असल्यास त्याला नाक दाटणे वा चोंदणे आणि पूयुक्त स्राव असल्यास त्याला पिकलेली सर्दी असे रूढ भाषेत म्हटले जाते.

कारणांनुसार सर्दीचे दोन प्रकार संभवतात :

संक्रमणजन्य सर्दी व्हायरस किंवा सूक्ष्मजंतूंच्या संक्रमणामुळे नाकातील श्लेष्मकलेचा शोथ झाल्यामुळे होते.
अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी नाकाच्या श्लेष्मकलेतील प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेच्या परिणामामुळे उद्भवते.
अनेक विषारी, रासायनिक, वनस्पतिज व प्राणिज कार्बनी पदार्थ नाकावाटे शरीरात शिरताना प्रतिजन म्हणून कार्य करतात आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिकिया घडते. या प्रतिक्रियेतून निर्माण होणाऱ्या हिस्टामीन इ. रासायनिक द्रव्यांमुळे सर्दीची लक्षणे उद्भवतात. [ अ‍ॅलर्जी; प्रतिजन; प्रतिपिंड].

लक्षणे
नेहमीच्या सर्दीची सुरूवातीची सर्व लक्षणे अनेक प्रकारच्या व्हायरसां च्या संक्रमणामुळे उद्भवतात. सुरूवात एकाएकी होते. नाकात गुदगुल्या झाल्यासारखे वाटून शिंका येतात. नाक व घसा कोरडा पडून दाह किंवा वेदना जाणवते. डोके जड होते व डोळ्यांची जळजळ सुरू होते. नंतर नाकातून पाण्यासारखा स्राव मोठया प्रमाणात वाहू लागतो. याबरोबरच बारीक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक मंदावणे इ. व्हायरस संक्रमणाची इतर लक्षणेही दिसू शकतात. या अवस्थेत २-३ दिवस गेल्यावर संक्रमणाचा जोर ओसरतो व सर्व लक्षणे कमी होत जाऊन रूग्ण ५७ दिवसांत पूर्ववत होतो. तथापि वरीलप्रमाणे सर्दी झाल्यावर बहुधा एक-दोन दिवसांत सूक्ष्मजंतूंच्या संक्रमणामुळे स्राव घट्ट, चिकट व पूयुक्त बनतो. डोकेदुखी, घसादुखी, ताप इ. लक्षणांची तीवता वाढते. योग्य उपचारांअभावी इतर उपद्रव, उदा., नासाकोटरशोथ, मध्यकर्ण शोथ, नाकापुढील श्वसनमार्गाचे विकार व संक्रमणे इ. उद्भवू शकतात किंवा साध्या सर्दीचे जुनाट सर्दीत (चिरकारी नासाशोथात) रूपांतर होऊ शकते.

अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या अधिहर्षताजन्य सर्दीत नाक व डोळ्यांची खाज, शिंका व डोळ्यांतून पाणी गळणे, नाक चोंदणे, डोके जड येणे इ. लक्षणे दिसतात. लक्षणे एकाएकी सुरू होतात. त्याचप्रमाणे सहसा थोडयाच वेळात एकाएकी बंद होतात; परंतु राहून राहून पुनःपुन्हा उद्भवू शकतात. विशिष्ट मोसमात लक्षणे पुनःपुन्हा उद्भवण्याची शक्यता असते, परंतु सहसा सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव न झाल्याने नाकातील स्राव पूयुक्त होत नाही व इतरही उपद्रव होण्याचे प्रमाणही कमी असते.

उपचार
व्हायरसजन्य सर्दीसाठी प्रतिव्हायरस औषधे उपलब्ध नसल्याने व या प्रकारच्या सर्दीचा कालावधी ठराविक असल्याने फक्त लक्षणानुसारी उपचार (ताप, अंगदुखी, डोकेदुखी व नाकातून पाणी गळणे कमी होण्यासाठी औषधे) करावे लागतात व सहसा ते पुरेसे असतात. अधिहर्षताजन्य सर्दीसाठी हिस्टामीनरोधक औषधे उपयोगी पडतात. रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे पूयुक्त सर्दी किंवा पुढील इतर उपद्रव झाल्यास योग्य प्रतिजैविक (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोग आवश्यक ठरतो.

प्रतिबंध
जीवनसत्त्वयुक्त चौरस आहार व योग्य व्यायामाच्या साहाय्याने शारीरिक आरोग्य राखणे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम, मोकळी स्वच्छ हवा, अतिदमट किंवा अती कोरडी हवा व कोंदट जागी काम करणे टाळावे, अधिहर्षताजनक पदार्थाचा संपर्क टाळण्याचा प्रयत्न करणे इ. प्रतिबंधक उपचार महत्त्वाचे आहेत; परंतु त्यामुळे सर्दी कायमची बंद करणे शक्य नसते. बरेच अधिहर्षताजनक पदार्थ समजून येत नाहीत आणि त्यातील काही न टाळता येणारे असतात. तसेच सर्दीजनक व्हायरस सतत बदलत असल्याने त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधक लसनिर्मिती शक्य झालेली नाही. परंतु या प्रकारच्या सर्दीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळच्या वेळी उपचार केल्यास सर्दी पूययुक्त होणे व त्यापुढील अनेक प्रकारचे उपद्रव टळू शकतात.

वारंवार सर्दी होत असल्यास किंवा नेहमीच्या उपचारांनी बरी होत नसल्यास नाक-कान-घशाच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. अशी सर्दी टिकून राहण्यामागे नासागिलायू वृद्धी, विचलित नासापटल, नासामांसवृद्धी, नासाकोटरशोथ आणि प्रौढ वयानंतर कर्करोग इ. शक्यता असतात.

Dr. Palavi Gholap
Dr. Palavi Gholap
BAMS, Ayurveda Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Geetanjali Ghule Karad
Dr. Geetanjali Ghule Karad
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Sandeep Borse
Dr. Sandeep Borse
MBBS, Internal Medicine Specialist Neurotologist, 5 yrs, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune