Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
ऑस्टियोपोरोसिस
#रोग तपशील#ऑस्टियोपोरोसिस



ऑस्टियोपोरोसिस

एका निरीक्षणानुसार भारतात ३ कोटी ६० लाख लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे हाडांना ठिसूळ करणे. या आजाराने, आजच्या तरुणाईला आपला विळखा घातला आहे. तिशी पार केलेल्या महिलांमध्ये हात-पाय दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे ऑस्टियोपोरोसिस. या आजाराशी सामना करायचा असेल तर हाडांची काळजी कशा प्रकारे घ्यावी हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे.

हाडांचे दुखणे आज एक सामान्य समस्या झाली आहे. पुरुषांपेक्षा महिलांना ही समस्या जास्त भेडसावते. तसेच वाढत्या वयासोबत हा आजार वाढण्याचा धोका जास्त संभवतो. आधुनिक जीवनशैलीने दिनश्चर्या व अनियमित खाण्यापिण्याच्या सवयींमुळे या आजाराचे प्राबल्य वाढले. त्यामुळे आजच्या तरुणाईवर या आजाराचा जास्त प्रभाव जाणवतो. शरीरात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साधारण वयाची ४५ गाठल्यानंतर या आजाराची सुरुवात होते, मात्र ६०-७० वयापर्यंत हा आजार जास्त त्रासदायक होतो.

नक्की काय आहे ऑस्टियोपोरोसिस ?

ऑस्टियोपोरोसिस हा एक हाडांचा आजार असून या आजारात हाडांच्या ठिसुळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीचा अभाव. वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हाडांचा मजबुतपणा कमी होऊन त्यामुळे हाडे तुटण्याची शक्यता वाढते.

ऑस्टियोपोरोसिस या आजाराचे मुख्यत: दोन प्रकार पडतात.

1. पहिला प्रकार हा महिलांमध्ये आढळून येतो, विशेषत: मॉनोपॉज़नंतर.

2. ७५ वर्षांवरील स्त्री-पुरुष या आजाराचे बळी ठरतात.

ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त प्रभाव मणका व मनगटाची हाडे यांवर असतो.

आकडेवारी

१) वयाची पन्नाशी पार केलेल्या १२ पैकी एका पुरुषाला तर ३ पैकी एका स्त्री या आजाराला बळी पडलेली असते.

२) स्पाइनल फ्रॅक्चरमुळे ८० टक्के लोकांना ऑस्टियोपोरोसिस या आजाराची लागण होते. ऑस्टियोपोरोसिस झालेल्या ५० टक्के महिलांमध्ये विटॅमिन डीची कमतरता दिसून येते.
३) राष्ट्रीय ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनच्या आकडेवारीप्रमाणे आतापर्यंत १ कोटी लोकांना या आजाराची लागण झाली आहे.

४) जागतिक स्वास्थ संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात पन्नाशीत असणाऱ्या २ पैकी १ स्त्रीमध्ये या रोगाची लक्षणे आढळतात.

बोन डेन्सिटी टेस्ट :

बोन डेन्सिटी टेस्टसाठी एका विशेष प्रकारचा एक्स-रेचा वापर केला जातो. त्याला डीएक्सए (ड्यूअल एनर्जी एक्स-रे) असे संबोधतात. याद्वारे मणका, माकडहाड व हातांच्या हाडांचे स्क्रीनिंग करण्यात येते. या भागातील हाडांची डेन्सिटी पडताळली जाते. जेणेकरून हाडे ठिसूळ होऊन तुटण्याच्या आधी त्यांच्यावर उपचार सुरु करता येऊ शकतात. साधारणत: वयाच्या ४५ नंतर दर ५ वर्षांने ही तपासणी करणे आवश्यक आहे.
स्त्रीयांना जास्त धोकादायक

१) स्त्रीची आजाराला बळी पडण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते. विशेषत: ठेंगण्या व शरीराने बारीक असणाऱ्या महिलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

२) अनुवंशिकतेने या आजाराची लागण होण्याची शक्यता ७० टक्क्याने वाढते.

३) तरुण स्त्रीयांमध्ये नियमित मासिक धर्माच्या आधी येणाऱ्या मोनोपॉज़ स्थितीत जाणाऱ्या महिलांना या आजाराचा धोका संभवतो.

ऑस्टियोपोरोसिसची कारणे :

१) ऑस्टियोपोरोसिस आजाराचे मुख्य कारण म्हणजे पुरुषांमध्ये असणाऱ्या एण्ड्रोजन व महिलांमध्ये असणाऱ्या एस्ट्रोजन या हार्मोन्सची कमतरता.

२) शरीरात असणारी कॅल्शियम व विटॅमिन डीची कमतरता
३) थायरॉईडची समस्या व अनुवंशिकता

४) हाडांचा कॅन्सर

५) औषधांचा शरीरावर भडीमार

६) शारीरिक हालचालींची कमतरता किंवा मोठी बेड रेस्ट

७) धुम्रपान व मद्यपानामुळे हाडे ठिसुळ होतात.

ऑस्टियोपोरोसिस लक्षणे :
१) सामन्यात: ऑस्टियोपोरोसिस आजाराची लक्षणे ठळकपणे दिसून येत नाहीत. याचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांना फ्रॅक्चर. सामान्यत: माणसाची हाडे सहजासहजी मोडत नाहीत, परंतू या आजाराच्या प्रभावामुळे हाडे मोडतात, त्यामुळे याला फ्रेजाईल फ्रॅक्चर असे म्हणतात. असे फ्रॅक्चर केवळ मणका, माकडहाड व मनगटाचे हाड अशा ठिकाणी होते.

२) या आजारामध्ये हाडे आकुंचन पावतात. बोनमास व बोन टिशुचे देखील विघटन होण्यास सुरुवात होते.

३) सुरुवातीला या रोगाची कोणतीच लक्षणे दिसून येत नसली तरी नंतर कमरेच्या खालचा हिस्सा व मानेला त्रास होण्यास सुरुवात होते.

४) हिवाळ्यामध्ये हाडांचे दुखणे वाढणे, शारीरिक सक्रियेत कमतरता.

ऑस्टियोपोरोसिस थांबविण्यासाठी घ्यावयाची काळजी

१) जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. जेवणामध्ये कॅल्शियम व विटॅमिन ‘डी'चा प्रामुख्याने समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, डेअरी प्रोडक्ट्स, मासे या घटकांमध्ये कॅल्शियम व विटॅमिन ‘डी' मोठ्या प्रमाणात असतात.

२) १५०० मिलीग्रॅम कॅल्शियमचे सेवन करणे आवश्यक आहे.

३) शरीराचे वजन प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे.

४) दररोज एक मैल पायी चालणे लाभदायक. चालणे हाडांसाठी चांगले असते.

५) व्यायाम, योग यांच्या माध्यमातून शारीरिक हालचाल होणे आवश्यक

उपचार :

ऑस्टियोपोरोसिस या आजाराच्या रुग्णाला विटॅमिन ‘डी', विशेषत: विटॅमिन ‘डी' ३ व बायोफॉस्फोनेट पूरक स्वरूपात देण्यात येते. व्हिटेमिन 'के' देखील बोन डेन्सिटी वाढविण्यास मदतगार सिद्ध होते. सिलेक्टिव एस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर सिरम थेरपी देखील या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते.

कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक का?

हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शियम व फॉस्फेटचा वापर करते. कॅल्शियम ह्रदय, मेंदू व दुसऱ्या अवयवांसाठी देखील आवश्यक आहे. या अंगांचा देखील व्यवस्थित वापर करण्यासाठी पुन्हा शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. योग्य प्रमाणात शरीरात कॅल्शियम नसेल तर त्याचा परिणाम हाडे व टिशुवर होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ व लवकर तुटणारी बनतात. यासाठी वयाच्या ३० वर्षापर्यंत जेवणात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे कारण याच काळामध्ये हाडाचा विकास मोठ्या प्रमाणात होत असतो.

Dr. Rekha Y Sanap
Dr. Rekha Y Sanap
MD - Homeopathy, 13 yrs, Pune
Dr. Sachin  Bhor
Dr. Sachin Bhor
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Suryakant Bhise
Dr. Suryakant Bhise
BAMS, Ayurveda, 11 yrs, Pune