Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
टाचदुखी
#रोग तपशील#घोट्याचे वेदना

टाचदुखीचा त्रास

उभे असताना किंवा चालताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतो. शरीराचा भार पेलता यावा यासाठी तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यात प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. एखाद्या िस्प्रगप्रमाणे शरीराचा भार सांभाळण्याचे काम या स्नायूकडून केले जाते. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी सुरू होते. अनेकदा तळव्यांना जखम झाल्यास, तळव्यांवर अधिक भार आल्यास, शरीराचे वजन वाढल्यास टाचांचे दुखणे सुरू होते. कामाच्या पद्धती, जीवनसत्त्वांचा अभाव, पुरेशी विश्रांती न घेतल्यामुळे तसेच तळव्यांचे हाड वाढल्यामुळे तळव्यांना सूज येते आणि असह्य वेदना सुरू होतात. याला वैद्यकीय भाषेत प्लान्टर फेशिआयटिस म्हणतात. साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखी होत असे मात्र आता कोणत्याही वयात टाचांची दुखणी होत असून यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

स्थूलता
अतिप्रमाणात वाढलेल्या वजनामुळे तळव्यांच्या स्नायूंवर दाब पडून इजा होते. यातूनच पावलांच्या टाचेपासून ते चवडय़ांपर्यंत तीव्र कळा जाणवतात. अनेकदा पायांना सूजही येते. ही लक्षणे महिलांमध्ये त्यातही चाळिशीपेक्षा अधिक वयोगटातील गृहिणींमध्ये अधिक प्रमाणात दिसतात. हायपोथायरॉईजम या आजारामुळेही वजन वाढत असल्याने टाचदुखी बरी होण्यासाठी सुरुवातीला या आजारावरही उपचार सुरू करणे आवश्यक होते.

तळव्यांचे हाड वाढणे
हा प्रकार सर्वसाधारणपणे आढळत नाही. टाचेचे हाड वाढल्यामुळे व्यक्तींना चालणे कठीण होते. या प्रकारात दुखण्याची तीव्रता अधिक असल्यामुळे यावर शस्त्रक्रिया करून वाढलेले हाड कमी केले जाते.

अधिक वेळ चालणे किंवा उभे राहणे.
अधिक वेळ चालल्यामुळे किंवा उभे राहिल्यामुळे पायांच्या तळव्यांतील स्नायूंवर ताण पडतो. त्यातून पायांचे दुखणे सुरू होते. सतत उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे तळव्यांच्या पेशींना विश्रांती मिळत नाही. वाहतूक पोलीस किंवा शिक्षक यांना या कारणांमुळे तळव्यांचे दुखणे जडते.

उंच टाचांच्या चपला घालणे.
उंच टाचांच्या चपलांमुळे पायांची ठेवण बदलली जाते. या प्रकारात टाच आणि पायांचा चवडा यामध्ये अंतर राहते. यामुळे चवडा आणि टाचांच्या मधील वक्राकार भागात कळ येते. अशा चपला फार वेळ घातल्याने पायांना सूजही येऊ शकते. सपाट चपला चालण्यासाठी आरामदायी असतात. तर उंच टाचांच्या चपलांमुळे तोल जाऊन पडण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी पायांच्या घोटय़ाला आणि हाडांना इजाही होऊ शकते.

जीवनसत्त्व ‘ई’चा अभाव
जीवनसत्त्व ‘ई’चा अभाव असल्यामुळेही टाचांचे दुखणे उद्भवते. दूध, लोणी, अंडी, सोयाबीन, धान्य या पदार्थामधून ई जीवनसत्त्व मिळत असल्याने त्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. या जीवनसत्त्वाच्या अभावी शरीरातील स्नायूंची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही. कारण स्नायूंची चांगली वाढ होण्यासाठी टॉनिक म्हणून जीवनसत्त्व ई काम करत. टाचांच्या दुखण्यावर उपाय म्हणून महिनाभर ई जीवनसत्त्व असलेल्या पदार्थाचा आणि औषधांचा समावेश आहारात केला जातो.

उपाय
सकाळी उठल्यानंतर पडणारे पहिले पाऊल अतिशय त्रासदायक असते. या वेळी रुग्णांना सर्वाधिक कळ जाणवते. हा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. मात्र या उपायांचा अवलंब करताना त्यात सातत्य हवे. या उपायांमुळे गुण आला नाही तर एक्सरे काढणे, इंजेक्शन देणे अशा प्रकारचे उपाय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केले जातात. या इंजेक्शनमध्ये कमी प्रमाणात वेदनाशामक औषधे असतात. कोणत्याही उपायांना प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र अखेरीस शस्त्रक्रिया करून स्ट्रेच झालेले स्नायू कमी करण्यात येतात.

पायांचा व्यायाम
टाचांच्या दुखण्यासाठी व्यायाम हा अतिशय गुणकारी उपाय असून दिवसातून किमान तीन वेळा हा व्यायाम केल्यास पायाचे दुखणे कमी होऊ शकते. भिंतीसमोर उभे राहल्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांचा भार िभतीवर द्यावा. त्यानंतर टाच उंच उचलून दहापर्यंत आकडे मोजून पुन्हा खाली घ्यावे. चवडा जमिनीवरून उचलू नये. एका वेळेस किमान पाच वेळा व्यायाम करावा. या व्यायामामुळे तळव्याचे घट्ट झालेले स्नायू सल होण्यास मदत होते. खुर्चीवर बसून पायांचा चवडा हाताने मागेपुढे केला तसेच हाताने टाचेभोवती मसाज केल्यासही आराम पडतो.

गरम पाण्याचा शेक
तळव्यांच्या स्नायूंवर अतिरिक्त भार आल्यामुळे ते घट्ट होतात. अशा वेळी पायाचा तळवा जाड आणि टणक होतो. हा टणकपणा कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक देणे उपयुक्त ठरते. गरम पाण्यात पाय ठेवल्यामुळे तळव्यांचे स्नायू सल होण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे रुग्णाला काही काळ आराम पडतो.

मेणाचा लेप
रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास तळवा दुखण्याच्या प्रमाणानुसार मेणाचा लेप दिला जातो. या पद्धतीत तळवा आणि वरील भागात वितळलेले आणि साधारण गरम असलेल्या मेणाचा लेप दिला जातो. हे मेण फार गरम नसते. मेण वाळल्यानंतर आपोआप निघते. मेणाच्या उबदारपणामुळे तळव्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. ही पद्धत तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली करणे गरजेचे आहे, रुग्णांनी घरी करणे धोकादायक आहे.

मऊ चपलांचा वापर
उंच टाचांच्या चपला वापरण्याऐवजी सपाट किंवा टाचेची उंची कमी असलेल्या मऊ चपला वापराव्यात. त्यातही तळव्याखाली मऊ गादीप्रमाणे स्तर असलेल्या चपला अधिक चांगल्या. आणि बूट घालायचे असल्यास त्यातही तळव्याखाली मऊ स्तर असावा. घरातही वावरताना मऊ पादत्राणे वापरावीत.

Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Aniket Amrutkar
Dr. Aniket Amrutkar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Amar B.  Shah
Dr. Amar B. Shah
ND, Ophthalmologist, 25 yrs, Pune
Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Amol Dange
Dr. Amol Dange
MBBS, Diabetologist, 14 yrs, Pune