Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
लो ब्लड प्रेशर
#कमी रक्तदाब#रोग तपशील



हायपोटेन्शन या व्याधीला सर्वसाधारणपणे लो ब्लडप्रेशर असे म्हणतात. या व्याधीमध्ये शरीरातील धमन्यांमध्ये रक्तदाब कमी होतो. काही वेळा हा रक्तदाब इतका कमी होतो, की रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गरगरणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे असे प्रकारही घडू शकतात. १३०/९० हे रक्तदाबाचे रीडिंग आता नॉर्मल समजले जाते. यापैकी जो आकडा जास्त आहे, तो ‘सिस्टॉलिक प्रेशर’दर्शवितो. हे प्रेशर, हृदय धमन्यांमध्ये रक्त पंप करते आणि धमन्यांमध्ये रक्त भरते तेव्हाचे असते. जो आकडा कमी आहे, तो ‘डायस्टॉलिक प्रेशर’दर्शवितो. हृदय धमन्यांमध्ये रक्त पंप करताना विश्रांती घेते. हृदयाच्या दोन ठोक्यांमधील अंतर हा हृदयाचा विश्रांतीचा काळ असतो. ह्या विश्रांतीदरम्यान धमन्यांमध्ये रक्त पंप केले जात नाही. तेव्हाचे धमन्यांमधील प्रेशर म्हणजे डायस्टॉलिक प्रेशर. ह्या दोन्ही प्रेशर्स पैकी कोणतेही प्रेशर कमी किंवा जास्त असेल, तर रक्तदाबाचा विकार उद्भवू शकतो.

जर ब्लडप्रेशर कमी राहत असेल, पण त्याची विशेष लक्षणे जाणवत नसतील, तर याची खूप जास्त काळजी करण्याची आवश्यकता बहुतेक वेळा नसते. पण रक्तदाब कमी असल्याने हृदयाला किंवा मेंदूला, अथवा इतर अवयवांना कमी रक्त पुरवठा होत असेल, तर मात्र त्वरित उपाययोजनेची आवश्यकता असते. आपले ब्लड प्रेशर दिवसभरात निरनिराळे राहते. ह्यातील चढ-उतार हे निरनिराळ्या कारणांमुळे होत असतात. आपली दिवसभरातील हालचाल, शारीरिक आरोग्य, आपण घेत असलेली औषधे, खानपानाच्या सवयी, या आणि इतर काही गोष्टींवर आपले ब्लडप्रेशर अवलंबून असते. आपण झोपेच्या स्थितीमध्ये असताना ब्लडप्रेशर कमी असते, तर आपण उठल्यावर ब्लडप्रेशरमध्ये एकदम वाढ होते.

ब्लड प्रेशर अचानक कमी होण्याची काही कारणे आहेत. शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता असली, तर रक्तदाब कमी होतो, व थकवा, अशक्तपणा, गरगरणे अशी लक्षणे जाणवू शकतात. हृदयासंबंधी काही विकार असले, तरीही रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, हृदयाच्या व्हाल्व मध्ये अडथळे निर्माण होणे या तक्रारी उद्भवू शकतात. एखादी महिला गर्भारशी असेल, तरी ही काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो, पण ही स्थिती कायम टिकून रहात नाही. बाळंतपण झाल्यानंतर त्या स्त्रीचे ब्लडप्रेशर पुनश्च नॉर्मल होते.

एखाद्या मोठ्या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे खूप रक्त गेले असेल किंवा शरीराच्या आतमध्ये जखमा होऊन रक्तस्राव झाला असेल, तर रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच, थायरॉइड किंवा डायबेटिस या व्याधींमध्ये ब्लडप्रेशर कमी जास्त होऊ शकते. शरीरामध्ये बी१२ जीवनसत्वाची कमी असल्यास रक्तदाब कमी असू शकतो. हे जीवनसत्व लाल रक्तकोशिका तयार करण्यास मदत करीत असते. त्यामुळे शरीरामध्ये ह्या जीवनसत्वाची कमतरता असेल, तर रक्तकोशिका कमी प्रमाणात तयार होतात, आणि परिणामी, रक्तदाब कमी होतो. जर अचानक एखादी अॅलर्जी उद्भविली, तर त्यामुळे ही रक्तदाब कमी होऊ शकतो. आहारामध्ये मिठाचे प्रमाण अतिशय कमी असल्यासही लो ब्लडप्रेशरचा त्रास जाणवू शकतो.

जर काही कारणाने ब्लड प्रेशर कमी झाले, तर चक्कर येणे, शुद्ध हरपणे, मळमळणे, चित्त एकाग्र न होणे, थकवा जाणविणे, धूसर दिसणे, गरगरणे अशी लक्षणे जाणवू शकतात. जर रक्तदाब अचानक खूपच कमी झाला, तर पल्स रेट अचानक वाढणे, अशक्तपणा येणे, वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत आपण कुठे आहोत याचे भान हरपणे, चेहरा पांढरा पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. अश्यावेळी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

लो ब्लड प्रेशर टाळायचे असल्यास काही सवयींचा अवलंब करणे अगत्याचे आहे. आपल्या आहारामध्ये द्रव पदार्थांचा भरपूर समावेश करावा. मद्यपानावर नियंत्रण ठेवावे. जर उन्हाळयाचे दिवस असतील, किंवा ताप आला असेल, तर भरपूर पाणी प्यावे. कोणत्याही प्रकारच्या व्याधीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, स्वतःच्या मनाप्रमाणे औषधोपचार करू नयेत. शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत राहण्याकरिता नियमित व्यायाम करावा. झोपेतून उठल्यानंतर काही क्षण अंथरुणातच बसावे आणि मग सावकाश उठून उभे राहावे. एकदम ताडकन उठून चालणे सुरु करु नये. खाण्यामध्ये मीठाचे प्रमाण योग्य राखावे. रात्रीच्या वेळी कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेला आहार टाळावा. जेवणानंतर काही मिनिटे विश्रांती घ्यावी.

रक्तदाब म्हटलं की आपल्याला उच्च रक्तदाब, त्याची लक्षणे, गंभीरता डोक्यात येते. पण हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर ही समस्या देखील तितकीच गंभीर आहे. आजकाल या त्रासाने अनेकजण ग्रासले आहेत. आणि यावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार देखील उच्च रक्तदाबइतकाच गंभीर होऊ शकतो. अचानक रक्तदाब कमी झाल्यास चक्कर येते, थकवा जाणवतो. आणि हे काळजी करण्यासारखे आहे. कारण मेंदूला रक्ताचा योग्य पुरवठा झाला नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. कार्डिओलॉजी, एफएमआरआय चे असोसिएट डायरेक्टर आणि युनिट हेड डॉ. संजीव चौधरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधांव्यतिरिक्त इतर काही मार्ग आहेत ज्यामुळे आपण भविष्यात होणाऱ्या लो बीपी ला प्रतिबंध करू शकतो.

भरपूर पाणी प्या: ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे रक्तदाबात होणारा क्षणिक बदल (रक्तदाब कमी होतो) जो सामान्यपणे डिहायड्रेशनमुळे होतो. यावर झटपट आणि खात्रीचा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे ब्लड वोल्युम वाढते आणि रक्तदाब काही मिनिटातच सुरळीत होतो. दिवसातून ८ ग्लास पाणी अवश्य प्या.

काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खा: एका वेळी भरपूर खाल्याने पचनसंस्थेवर एकाच वेळी अधिक ताण येईल. त्यामुळे रक्तप्रवाह देखील पचनसंस्थेच्या दिशेने वाहू लागेल. आणि शरीराच्या इतर भागातील रक्तप्रवाह कमी होईल. याचा परिणाम म्हणजे रक्तदाब कमी होईल. त्याऐवजी तुम्ही जर काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खाल्लं तर पचनसंस्थेवर एकाच वेळी ताण येणार नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत राहील. पुवी-राजसिंहम आणि माथीस सीजे यांच्या अहवालानुसार रक्तदाब अचानक कमी होऊ नये म्हणून थोडं थोडं खाणं गरजेचं आहे.

डोकं थोडं वर ठेवून पडून रहा: अनेकदा आपण आराम करत असताना रक्तदाब कमी असतो. त्यामुळे डोकं थोडं वर च्या अँगलला ठेवून पडून रहा. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर रक्तदाबात अचानक होणारा बदल टाळता येईल. काळजीपूर्वक उभे रहा: खूप वेळ बसल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर पटकन उठून उभे राहू नका. त्यामुळे डोळ्यापुढे अंधारी येऊ शकते. आणि चक्कर येऊन बेशुद्ध होण्याची भीती असते.

नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन ला प्रतिबंध होतो. व्यायामामुळे रक्तप्रवाह एकाच भागात न होता संपूर्ण शरीरभर रक्ताचा व्यवस्थित संचार होतो. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग याचबरोबर आयसोटॉनिक एक्ससरसाईझ म्हणजेच लाईट वेट लिफ्टिंग असे व्यायामप्रकार तुम्ही करू शकता.

मिठाचा योग्य वापर करा: असे सांगितले जाते की, दिवसाला १०-२०ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे. पण तुमच्यासाठी योग्य प्रमाण काय असेल हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर पालक, केळी यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. कारण आहारातून मीठ अधिक घेतल्याने पोटॅशियमचे प्रमाण कमी होईल.

Dr. Sachin Nandedkar
Dr. Sachin Nandedkar
MS/MD - Ayurveda, Obesity Specialist Ayurveda, 22 yrs, Pune
Dr. Rahul Pawargi
Dr. Rahul Pawargi
BAMS, Family Physician General Physician, 19 yrs, Pune
Dr. Amruta Siddha
Dr. Amruta Siddha
MBBS, ENT Specialist, 9 yrs, Pune
Dr. Sachin Hundekari
Dr. Sachin Hundekari
MBBS, Cardiologist, 4 yrs, Pune
Dr. Aniket Amrutkar
Dr. Aniket Amrutkar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune