Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
वंध्यत्व
#रोग तपशील#वंध्यत्व



वंध्यत्व:


१.वंध्यत्व म्हणजे काय?
एखाद्या जोडप्यास एक वर्षांच्या सलग, गर्भनिरोधक साधनांशिवाय केलेल्या शरीरसंबंधांनंतरही गर्भधारणा होणे (गरोदर राहाणे) जमले नसेल तर त्यास वंध्यत्व म्हणतात.
ही झाली शास्त्रीय व्याख्या.पण सामाजिक दृष्ट्या, जोडप्यास गर्भधारणा होऊन जर एखादे जीवंत मूल झाले नसेल तर त्यास वंध्यत्व असे समजले जाते.
प्राथमिक वंध्यत्व -यात जोडप्यास एक वर्षाहून अधिक काळ शरीर संबंध ठेवूनही कधीच गर्भधारणा झालेली नसते.
दुसर्‍या वेळचे वंध्यत्व- यात जोडप्यास एखादे मूल असून दुसर्‍या गर्भधारणेत कमतरता असते.

२. कोणत्या डॉक्टराकडे यासाठी सल्ला घेण्यास जावे?
जरी वंध्यत्वाठी स्त्री आणि पुरूष दोघांतही काही दोष असू शकतो तरी प्राथमिक चिकीत्सा किमान भारताततरी स्त्री रोग तज्ज्ञांकडे (गायनॅककडे)करावी. त्या आपली प्राथमिक तपासणी करून जोडप्यातील स्त्री आणि पुरूष दोघांनाही काही चांचण्या सुचवतील. त्या चांचण्यांच्या अनुषंगाने उपचार करतील किंवा योग्य त्या दुसर्‍या तज्ज्ञांचा(उदा.एंडोक्रिनॉलॉजिस्ट,डायबेटॉलॉजिस्ट,युरॉलॉजिस्ट,सर्जन,फिजिशीयन)सल्ला घेण्यास सांगतील.

३. डॉक्टरांकडिल पहिल्या भेटीत काय अपेक्षित आहे.
बर्‍याच वेळा भारताततरी पेशंट आणि डॉक्टर यांच्यात योग्य तो संवाद होत नाही. लाजेमुळे पेशंट आणि वेळेअभावी डॉक्टर बर्‍याचश्या गोष्टींची चर्चा करत नाहीत. डॉक्टरांशी योग्य चर्चा झालीय किंवा कसे हे तुम्हाला खालील मुद्द्यांवरून कळेल.

अ. 'वंध्यत्वाविषयी स्त्री आणि पुरूष दोघेही जबाबदार असू शकतात म्हणून दोघांच्याही चांचण्या करणे गरजेचे आहे तसेच वंध्यत्वाचे उपचार ही जोडप्याची संयुक्त जबाबदारी असून केवळ स्त्री किंवा पुरूष यांची वैयक्तिक
जबाबदारी नाही' हे तुमच्या डॉक्टरने तुम्हाला समजावलेय का?

आ.डॉक्टरांनी तुमची सगळी महत्त्वाची वैद्यकीय हिस्टरी विचारलीय का? तसेच एकत्र राहण्याचा वेळ, शरीरसंबंधांची वारंवारता आणि काळ(पाळीच्या काळाच्या अनुषंगाने)या गोष्टी विचारल्यात का ?

इ. स्त्रीच्या पाळीसंबंधी खोल विचारणा केलीय का? कधी सुरू झालीय.रेग्युलर आहे का? किती दिवस रक्तस्राव होतो इ.

ई. पुरूषाच्या आरोग्यासंदर्भात इतिहास विचारलाय का? उदा. बीपी,डायबेटिस,प्रजनन संस्थेसंबंधित संसर्ग, अपघात इ.

उ. अपेक्षित चांचण्याच्या निदानानंतर ढोबळमानाने काय दोष निघू शकतात व त्यांचे निराकरण कसे करता येऊ
शकेल याची प्राथमिक,जुजबी माहिती दिलीय का?

वंध्यत्वाची कारणे-

गर्भधारणा होण्यासाठी खालील गोष्टींची गरज आहे
१.स्त्री शरीरात बीजांडातून एक(च) बीज/अंडे बाहेर पडणे (ओव्यूलेशन)
२.बीजनलिकेतून ते अंडे गर्भाशयाच्या दिशेने पोचणे.
३.बीजनलिका गर्भाशयाला जिथे मिळते तिथे पुरुषाचा शुक्रजंतू येऊन ते बीज फ़लित होणे.(फ़र्टिलायजेशन)
४. फ़लित बीज गर्भाशयात रुजणे (इंप्लांटेशन)

या चारपैकी एकाही पायरीत अडचण आल्यास गर्भधारणा होत नाही.
मुळात १/३ वेळा दोष पुरूषात असू शकतो, १/३ वेळी स्त्रीमध्ये असू शकतो आणि १/३ वेळी दोघांतही कमी-अधिक प्रमाणात किंवा एकातही नसतो. एका सर्व्हेनुसार भारतातील विविध राज्यातील पुरूषांमध्ये ८ ते १०% पुरूषांमध्ये वंध्यत्व आढळते.

स्त्रीयांमधील वंध्यत्व

स्त्रीयांमधील वंध्यत्वाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे-

१.बीज तयार होऊन बीजांडातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतील दोष (disorders of follicle maturation and ovulation) - जवळजवळ ४०% दोष या प्रकारचे. यात बीजांडातील दोषांबरोबरच मुख्य प्रजनन संस्थेबाहेर असणाया अंतर्स्त्रावी ग्रंथीं(endocrine glands)उदा. हायपोथॅलॅमस, पिच्युटरी, थायरॉईड यांचा मोठा प्रभाव असतो

२.बीजनलिकेतील दोष (disorders of fallopian tubes) - बीजांडापासून सुटणारे बीज आपल्या बोटांसारख्या फ़िंब्रिआंनी (fimbriae) पकडून त्यांना गर्भाशयापर्यंत आणायचे काम या बीजनलिका करतात. जन्मत:च त्या बंद असू शकतात (stenosis) किंवा काहीवेळा जंतूसंसर्गामुळे किंवा इतर काही कारणांनी बंद होतात.

३.एंडोमेट्रिऑसिस (endometriosis)
- सर्वसाधारणतः गर्भाशयाच्या आत असणार्‍या आवरणाच्या पेशी (एंडोमेट्रियम) ओवरी,गर्भनलिका किंवा ओटीपोटात इतरत्र आढळणे. ज्यामुळे चुकीच्या ठिकाणी ब्लॉकेजेस किंवा रक्तस्त्राव होउन पाळीच्या काळात अतिशय वेदना होतात आणि नंतर राहिलेल्या ब्लॉकेजेसमुळे (scaring and stenosis) वंध्यत्व येते.

४.गर्भग्रीवेचे /गर्भाशयमुखाचे दोष (disorders of cervix)-चुकीच्या पद्धतीने तयार होणारा सर्वायकल म्युकस(गर्भग्रीवा स्त्राव), स्टिनोसिस.(गर्भग्रीवेतून गर्भाशयात जाणारा मार्ग काही कारणांनी बंद असणे.

५.इतर (multiple or unknown causes) - जवळपास २०% स्त्रीयांमध्ये नेमके कुठले दोष आहेत हे कळूनच येत नाही किंवा वरिलपैकी विविध प्रकारचे दोष एकत्र असू शकतात.

स्त्रीयांमधल्या वंध्यत्वाचा विचार करण्यापुर्वी आपल्याला स्त्री प्रजनन संस्थेची प्राथमिक ओळख करून घ्यावी लागेल. आजकाल हाताशी नेट असल्याने आपण ही माहिती कधीही मिळवू शकतो म्हणा. पण पुढे कारणांची आणि उपायांची चर्चा करण्यापूवी सगळे संदर्भ एकत्र असावेत म्हणून इथे सुरुवातीसच थोडक्यात माहिती देत आहे.

निसर्गाने स्त्री शरीराची रचना बरिच गुंतागुंतीची केली आहे. स्त्रीला केवळ अपत्य प्राप्ती होण्यासाठीच नव्हे तर स्त्री म्हणून योग्य शारिरीक विकास साधण्यासाठीही विविध प्रकारच्या अवयवांचे, आंतर्स्त्रावी ग्रंथींचे(हॉर्मोन्स), मेंदू आणि मज्जासंस्थेचे योग्य आणि नियमित कार्य असणे हे गरजेचे आहे.

स्त्री भ्रूणाच्या आईच्या पोटातील आयुष्याच्या बाराव्या आठवड्यातच तिच्या बीजांडात जवळजवळ ६० ते ७० लाख बीजे अर्धपक्व अवस्थेत असतात. मुलगी जन्मताना त्यातील किमान २० लाख बीजे शिल्लक राहतात. तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी फ़क्त ५ लाख बीजे दोन्ही बीजांडात मिळून शिल्लक असतात. उरलेली बीजे बीजांडाच्या (ओवरीच्या) आतच नष्ट होतात. या जवळपास ४-५ लाख बीजांतून केवळ एकच बीज दर महिन्याला पूर्ण पक्व अवस्थेत बीजनलिकेत येणं ही निसर्गाची अफ़ाट किमया आहे.

coronal section.jpg
होतं काय की दर महिन्याला एखादी स्पर्धा असल्याप्रमाणे ४०-५० बीजांचा समूह परिपक्व व्हायच्या तयारीला लागतो. प्रायमरी फॉलिकल आणि सेकंडरी फॉलिकल या दोन पायर्‍या बीजांडातच होतात. पण या सेकंडरी फॉलिकलचं परिपक्व / मिलनोत्सुक स्त्रीबीज बनवण्यात मात्र प्रजनन संस्थेच्या बाहेर असणार्‍या बाकीच्या घटकांचा प्रभाव असतो.
यातील मुख्य अवयव आहे हायपोथॅलॅमस ग्रंथी (Hypothalamic gland) आणि तिच्या हुकुमाबरोबर वागणारी पिच्युटरी ग्रंथी (Pituitary gland). मासिकपाळीच्या पहिल्या दिवशी ही हायपोथॅलॅमिक ग्रंथी जीएन.आर.एच. (GnRH) नावाचे हॉर्मोन सोडते. हे हॉर्मोन जवळच असणार्‍या पिच्युटरी ग्रंथीला अजून दोन प्रकारची हॉर्मोन तयार करायला लावते. पैकी एक म्हणजे एफएसएच (FSH-Folicle stimulating hormone) आणि
दुसरे एलएच (LH- leutinizing hormone). यांपैकी FSH लगेच रक्तात सोडले जाते तर LH काही काळाकरिता पिच्युटरितच साठवून योग्य वेळ येताच रक्तात सोडले जाते.

१.मासिक पाळीची फॉलिक्युलर फेज- रक्तात मिसळलेले FSH ओवरीत पोचताच एका किंवा दोन्ही ओवरीतील मिळून ७-८ फॉलिकल्स मोठी होऊ लागतात आणि इस्ट्रोजेन (estrogen) तयार करतात. हे इस्ट्रोजेन रक्तात मिसळते. काही नैसर्गिक संकेत मिळून या इस्ट्रोजनमुळे या सात आठपैकी बाकीची फॉलिकल वाढायची थांबतात व एकच फॉलिकल वाढते ज्याला डोमिनंट फॉलिकल म्हणतात. हे अधिकाधिक इस्ट्रोजेन तयार करत जाते. सुरूवातीला यामुळे रक्तात मिसळणारे इस्ट्रोजेन पिच्युटरीला निगेटिव फीडबॅक देवून आणखी FSH तयार करण्याचे प्रमाण कमी करते मात्र शेवटीशेवटी इस्ट्रोजेन इतके वाढते की पिच्युटरिला पॉजिटिव्ह फीडबॅक मिळून FSH चा शेवटचा मोठा स्त्राव होतो. इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाचे आतले अस्तर जाड होते आणि त्यात रक्तवाहिन्या वाढतात.

२. ओव्युलेशन फेज- पिच्युटरी जीएनारएचला जास्तच सेंसिटिव्ह होऊन पूर्वी साठवलेले LH रक्तात मिसळायला सुरूवात होते. हे LH रक्तातून ओवरिकडे येऊन डॉमिनंट फॉलिकलला बीज मुक्त करण्यास (ओव्युलेशन) भाग पाडते. ओवुलेशन प्रेडिक्शन किट हे एलेच सर्ज (LH SURGE))द दाखवतात. (एल एच सगळ्यात जास्त प्रमाणात र्क्तात मिसळले गेल्याचा दिवस)तर एल एच सर्जच्या दिवशी सर्वायकल म्युकस सगळात जाड आणि योग्य (स्वागतोत्सुक गर्भग्रीवा स्त्राव- fertile mucus) होतो, गर्भग्रीवा (cervix)गर्भाशयाजवळ म्हणजे वर सरकते आणि मऊ पडून थोडिशी उघडते. थोडक्यात ज्यामुळे वीर्यातील शुक्रजंतूंचा स्त्री शरिरातील प्रवास निर्धोकपणे पार पडेल अशा सगळ्या गोष्टी घडतात. स्त्रीयांमध्ये या काळात शरिरसुखाची आसक्तीही वाढलेली असते.
तर या एलेच सर्जनंतर एक (किंवा क्वचित दोन बीजे)ओवरीतून मुक्त होतात.

३. ल्युटिअल फेज- पाळीच्या साधारण १४ व्या दिवशी हे ओव्युलेशन होऊन मग ल्युटिअल फेज चालू होते. मुक्त ओवम २४ तास योग्य शुक्रजंतूची वाट बघत फॅलोपिअन ट्यूबमध्ये जीवंत राहाते. गर्भशयात बीजाच्या वाढीतील शिल्लक राहिलेल्या भागाला कॉर्पस ल्युटिअम असे म्हणतात. ओव्युलेशननंतरच्या काळात LH कॉर्पस ल्युटिअमला अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि एक नविन हार्मोन प्रोजेस्टरॉन तयार करण्यास भाग पाडते. या प्रोजेस्टरॉनमुळे शरिराचे तापमान ( बेजल बॉडी टेंपरेचर) वाढते. तसेच गर्भाशयाच्या आतील पेशींचे आवरण (एंडोमेट्रियम)मधे रक्तप्रवाह वाढतो आणि ते तयार बाळाचे संगोपन करण्यास अधिकाधिक सक्षम बनते. प्रेग्नन्सीच्या किंवा ल्युटिनायजिंग फेजच्या काळात येणारे इमॅजिनरी प्रेग्नन्सी सिम्टमही प्रोजेस्टरोन घडवते. जर ओवम फलित झाले तर त्यापासून तयार होणारे मानव कोरियोनिक गोनाडोट्रॉपिन (HCG)ओवरीत शिल्लक असलेल्या कॉर्पस ल्युटिअमला LH प्रमाणेच अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करणास भाग पाडते. मात्र जर ओवम फलित झाले नाही तर हे कॉर्पस ल्युटिअम पाळीच्या तीन दिवस आधी नष्ट होते. इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्याने बाहेर पडलेले ओवम व गर्भाशयाने केलेली गर्भरपणाची तयारीही हळुहळू नष्ट होत नविन मासिक स्त्रावाच्या रुपाने गर्भाशयाबाहेर पडते. यालाच आपण पुढच्या पाळीचा पहिला दिवस म्हणतो आणि चक्रनेमीक्रमे स्त्रीशरीर परत पहिल्यापासून हा सगळा कार्यक्रम परत सुरू करते. याला स्त्रीयांचे हायपोथॅलॅमिक-पिच्युटरी-गोनॅडल अ‍ॅक्सिस असे म्हणतात.


Dr. Pallavi Joshi
Dr. Pallavi Joshi
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Deelip Janugade
Dr. Deelip Janugade
BAMS, Family Physician General Physician, 31 yrs, Pune
Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Kedarnath  Kalyanpur
Dr. Kedarnath Kalyanpur
MDS, Dental Surgeon Dentist, 8 yrs, Pune
Dr. Kamlesh Manikhedkar
Dr. Kamlesh Manikhedkar
BDS, Dental Surgeon, 9 yrs, Pune