Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
अतिझोप
#रोग तपशील#झोपेचे विकार



अतिझोप (Hypersomnia)
झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला व मेंदूलाही विश्रांती मिळावी यासाठी झोप अत्यावश्यक आहे. रात्री पुरेशी झोप झाल्यास शरीर दुसर्‍या दिवशी काम करण्यासाठी ताजेतवाने होते. याशिवाय आपले हृदय, डोळे यांच्यासहित आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही झोप आवश्यक असते. समान्यपणे एका लहान मुलाला 8 ते 10 तासांची झोप आवश्यक असते, तर प्रौढांना 6 ते 7 तासांची झोप पुरेशी असते; पण अलीकडे प्रौढांमध्ये अतिझोपेचे प्रमाण वाढते आहे. 6 तासांऐवजी 8 ते 10 तास किंवा अनेकजण 11 तासही झोपतात, तर काहीजणांना धड 4 तासांची झोपही मिळत नाही; पण या कमी झोपेचे किंवा अतिझोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात.

झोपेच्या योग्य सवयी, वेळ इत्यादी गोष्टी मागे पडून आपल्याला वाटेल त्यावेळी वाटेल तेवढा वेळ झोपण्याचे प्रमाण वाढते आहे. नोकरदार असतील आणि सकाळी लवकर ऑफिसला जायचे असेल, तर अशा व्यक्‍ती लवकर उठतातच; पण काहीवेळा पार्टी किंवा काही कामानिमित्त त्यांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागते व त्यानंतर झोपल्यावरही सकाळी ऑफिस असल्यामुळे त्यांना पुन्हा लवकर उठून ऑफिसला जावे लागते. दुसरीकडे स्वतःचा व्यवसाय असलेल्या व्यक्‍ती मात्र आपल्या वेळेप्रमाणे उठू शकतात व कामाच्या ठिकाणी जाऊ शकतात. अशा व्यक्‍तींमध्ये अतिझोपेचे प्रमाण जास्त असते. झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिरेकामुळेही आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत.

झोपेच्या समस्यांचे दुष्परिणाम :

- कमी झोपेमुळे किंवा अतिझोपेमुळे आळस येतो व त्यामुळे सुस्ती येते. त्यामुळे आपल्या कामांचा वेग मंदावतो व परिणामी आधी काही मिनिटांत होणारे आपले काम काही तासांवर जाऊन पर्यायाने आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो. आपल्या सहकार्‍यांसमोर आपला प्रभावही फिका पडतो व बाहेरच्या जगातही आपली मंद अशी प्रतिमा तयार होते.

- अतिझोपेचा किंवा कमी झोपेचा आपल्या बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. शिकणे व विचार करणे या प्रक्रियांमध्ये झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपली एकाग्रता, सावधपणा, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मेंदूत एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे आरोग्य हे झोपेवर अवलंबून असते. अतिझोप झाल्यास या व्यवस्थेच्या कार्यावर परिणाम होतात व पर्यायाने आपल्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो.

- याशिवाय आपली स्मरणशक्‍ती मजबूत करण्यासाठीही झोप गरजेची असते. झोप अति झाल्यास आपल्या स्मरणशक्‍तीवरही त्याचा परिणाम होतो.

- झोप अति झाल्याने कामात लक्ष न लागणे, कामाचा वेग मंदावणे इत्यादी गोष्टी घडतात. त्यामुळे काम करताना अपघातही होतात. यामुळे आपण आपल्यासहित इतरांनाही हानी पोहोचवू शकतो. एका संशोधनानुसार कामाच्या ठिकाणी अपघात होऊन आग लागणे किंवा रस्त्यावरही भीषण अपघात होण्याचे कारण कामगारांच्या व त्या त्या व्यक्‍तींच्या झोपेच्या तक्रारी हे होते.

- याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिझोपेमुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, उच्च रक्‍तदाब, मधुमेह इत्यादी समस्या निर्माण होतात.

- गरजेपेक्षा कमी झोप झाल्यास आपल्या त्वचेवरही त्याचा दुष्परिणाम होतो. एक रात्र झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली काळे डाग पडणे, डोळ्यांखालील त्वचा सुजणे इत्यादी समस्या निर्माण होतात. हीच गोष्ट सातत्याने होत राहिल्यास हे निशाण कायमचे चेहर्‍यावर बसतात.

- झोपेच्या कमतरतेमुळे लैंगिक क्षमतेवरही दुष्परिणाम होतो. संपूर्ण शरीरात ताण व आळस असल्यामुळे लैंगिक संबंधांसाठीचा उत्साह हरवून जातो.

झोपेच्या समस्यांची कारणे :

अतिझोप : अतिझोपेची कारणे अनेक असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे, नीट झोप न लागणे. आपल्याला गाढ किंवा नीट झोप न लागल्यास आपण रात्रभर कूस बदलत राहतो व मध्ये कधीतरी झोप लागते, पण आपल्याला उशिरापर्यंत जागच येत नाही. याशिवाय नैराश्य किंवा उत्साहाचा अभाव हेही अतिझोपेचे कारण असू शकते. सकाळी उठताना आपल्याला दिवसातील एकही काम करण्याचा उत्साह नसेल, तर आपल्याला उठावेसेच वाटत नाही. किंवा आपल्याला किती दिवसांमध्ये कुठली गोष्ट करायची आहे याचे काही नियोजन नसल्यामुळे आपण झोपून राहतो. शिवाय आयुष्याचा कंटाळा आला असेल किंवा नैराश्य आले असेल, तर आपण उठून कामाला सुरुवात करण्याऐवजी झोपून राहणे पसंत करतो.

उपाय :
झोपेच्या समस्या निर्माण होऊ नयेत व पर्यायाने त्यामुळे होणारे दुष्परिणामही होऊ नयेत यासाठी अनेक उपाय करता येतात. सर्वप्रथम अतिझोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी काय करता येईल ते पाहू. अतिझोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सकाळी किती वाजता उठण्याची वेळ नक्‍की करावयाची आहे हे ठरवावे व आपल्या झोपण्याची वेळ टप्प्याटप्प्याने कमी करीत त्यावेळेपर्यंत पोहचावे. म्हणजेच आपण सध्या 9 वाजता उठत असू आणि आपल्याला 6 वाजता उठण्याची सवय लावून घ्यायची असेल, तर थेट 6 वाजता उठण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या शरीरांतर्गत व्यवस्थेला धक्‍का बसतो. त्यामुळे क्रमाक्रमाने वेळ कमी करीत आणावी. 9 वाजता उठण्याची सवय असल्यास आधी 8.30 चा अलार्म लावावा. ही वेळ दर आठवड्याला अर्धा अर्धा तास अशी कमी करीत आणावी व नंतर आपल्या अपेक्षित वेळेवर यावे.

कमी झोप किंवा जागरणाच्या समस्येवरचा उपाय आपल्या निश्‍चयात आहे. रात्री होणारे जागरण संपूर्णपणे टाळावे व रात्री झोपण्याची वेळ निश्‍चित करावी. आपला कॉम्प्युटर, टीव्ही व मोबाईल झोपण्याच्या अर्धा तास आधी बाजूला ठेवून द्यावा. कारण झोपण्यापूर्वी मन शांत असणे खूप महत्त्वाचे आहे. मोबाईल, टीव्ही इत्यादी बंद केल्यावर लगेच झोपायचा प्रयत्न केल्यास झोप येत नाही. कारण आपले मन शांत झालेले नसते. याशिवाय खोलीत लाईट किंवा चमकणारी वस्तू ठेवणे टाळावे. यामुळे आपल्या झोपेत अडथळे येतात. याशिवाय झोपण्यापूर्वी अनुलोमविलोम इत्यादी दीर्घ व सावकाश असे श्‍वसनाचे व्यायाम करावेत. त्यामुळेही शांत झोप लागते. विश्रांती व त्यासाठी झोप ही माणसाला श्रमपरिहारासाठी मिळालेली सर्वात मोठी नैसर्गिक सोय आहे. त्यामुळे या सोयीचा आदर करून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक तेवढी आणि तेवढीच झोप घ्यावी. याचा आपल्या बुद्धिमत्तेसहित आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो व आपल्याला आपल्या कामात अधिकाधिक प्रगती करता येते.

Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. Shalthiel Sathe
Dr. Shalthiel Sathe
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 10 yrs, Pune
Dr. Rajesh Jagdale
Dr. Rajesh Jagdale
BAMS, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune