Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
उच्च रक्तदाब
#रोग तपशील#उच्च रक्तदाब



उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाचे प्रमाण सध्या फार झपाट्याने वाढत आहे. उच्च रक्तदाब म्हणजे हृदय, किडनी, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांच्या आजारास निमंत्रण आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करावयाचे असेल तर त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. रक्तदाब म्हणजे शरीरातील धमण्यांच्या भिंतींवर रक्ताने निर्माण केलेला दाब होय. हा दाब दोन प्रकारे मोजला जातो सिस्टोलिक प्रेशर (वरचा) - हृदय आंकुचित होऊन धमण्यांमध्ये रक्त सोडताना निर्माण झालेला दाब होय. हा साधारणतः १२० मिमी पारापेक्षा कमी असावा

डायस्टोलिक प्रेशर (खालचा ) - हृदय प्रसारण पावतेवेळी धमन्यांमध्ये जो दाब तयार होतो, हा सामान्यतः ८० मिमी पारापेक्षा कमी असावा. सर्वसाधारण रक्तदाब १२०/८० मिमी असावा. त्यापेक्षा जास्त दाब झाल्यास आपण त्यास उच्च रक्तदाब असे म्हणतो. प्रिहायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाची पूर्वीची अवस्था असेल तर अशा व्यक्तीस रक्तदाब होण्याचा धोका असतो.

उच्च रक्तदाबाची कारणे

- इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन : सरासरी ९० टक्के ते ९५ टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबासाठी कुठलेही कारण आढळत नाही, यालाच इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतात.

- सेकंडरी हायपरटेन्शन : रुग्णास इतर व्याधींचा परिणाम म्हणून उच्च रक्तदाब असल्यास त्यास सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. जसे किडनीचे आजार, अंत:स्त्रावी ग्रंथीचे आजार इत्यादी.

- उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरणारे घटक

जीवनशैली : सद्यस्थिती पाहता कामाचे स्वरूप प्रामुख्याने बैठे आहेच आणि अति तणावयुक्तही आहे. त्यामुळे तरुण वयातच उच्च रक्तदाबासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

- अतिमद्यपान

- धुम्रपान

- तंबाखू

व्यायामाचा अभाव : रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करणे तर दूरच राहिले परंतु दैनंदिन कामातही दुचाकी व चारचाकीचा वापर वाढू लागल्याने आपण स्थूलता, उच्च रक्तदाब यासारख्या अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत.

स्थूलता : उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णातील ६०% रुग्ण स्थूल असतात. ही स्थूलता कमी झाल्यास उच्च रक्तदाब ही कमी होतो.

चुकीच्या आहार सवयी : आपल्या आहारात सकस अन्न पदार्थांपेक्षा पिझ्झा बर्गर अशी बेकरी उत्पादने, तसेच बराच काळ साठवलेले अन्न यांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे. तसेच अधिक मीठयुक्त पदार्थ उदा. चिप्स, कुरकुरे जास्त प्रमाणात घेतले जातात. या चुकीच्या आहारसवयीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

अनुवांशिकता : आपल्या आई वडिलांना उच्च रक्तदाब असल्यास आपणासही उच्च रक्तदाब होण्याची शक्यता ३०% ते ४०% ने वाढते.

उच्च रक्तदाबाची लक्षणे

- ९० टक्के रुग्णांत उच्च रक्तदाबाचे कुठलेही लक्षण आढळून येत नाही. बरीच वर्षे आपल्या शरीरात कुठलेही लक्षण नसतांना देखील उच्च रक्तदाब असू शकतो व त्यामुळे इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो, म्हणूनच या आजारास ‘सायलेंट किलर’ म्हणतात.

- डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत धडधड होणे, चालताना दम लागणे ही उच्चरक्तदाबाची लक्षणे असू शकतात. अशी काही लक्षणे आढळल्यास आपल्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी.

- व्हाईटकोट हायपरटेंशन : काही वेळा रुग्णाचा रक्तदाब रुग्णालयात गेल्यानंतरच वाढलेला आढळून येतो व इतरवेळा तो सामान्य असतो. यालाच व्हाईटकोट हायपरटेंशन म्हणतात. त्याच्या निदानासाठी अम्ब्यूलेटरी ब्लडप्रेशर मॉनिटरिंग आवश्यक असते. यात रुग्णाच्या संपूर्ण दिवसभराच्या रक्तदाबाची नोंद केली जाते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करताना
उच्च रक्तदाबाची कारणे, लक्षणे आणि दुष्परिणाम याची माहिती घेतल्यानंतर आता तो कसा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो याची माहिती आज आपण घेऊ.

दैनंदिन जीवनातील आहार सवयी बदलून, स्थूलता कमी करून तसेच जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. धुम्रपान, मद्यपान व तंबाखूसेवन कमी केल्यास दैनंदिन ताणतणाव कमी करून नियमित व्यायाम केल्यास त्याचा बराच फायदा होतो.

काय काळजी घ्याल?

१. मीठ खाण्यावर नियंत्रण : उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. याचा अर्थ असा नव्हे की, मीठ खाऊच नये किंवा अळणी जेवण खावे. खूप काळ साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये तयार केलेले पदार्थ, कुरकुरे, चिप्स इत्यादी पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.

२. ताज्या भाज्या व फळे : रोजच्या आहारात ताज्या भाज्या, फळे तसेच कमी स्निग्धता असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

३. कडधान्ये : सर्व प्रकारच्या कडधान्यांचा डाएटरी फायबर्स हा मुख्य स्रोत असतो. कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

४. मासे : मासे खाणाऱ्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका शक्यतो उद् भवत नाही. मुख्यत्वे यासोबत वजन कमी केल्यास जास्त फायदा होतो.

५. कॉफी : कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी प्याल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो.

हे लक्षात ठेवा

१. मद्यपान : अतिमद्यपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच असते. अतिरिक्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याला हा धोका संभवतो.

२. वजन : स्थूलत्वामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार सहजतेने जवळ येतात. कमी व सकस अन्न खाणे, भरपूर व्यायाम करणे ही खरी वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.

३. नियमित व्यायाम : दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करायलाच हवा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग आदी व्यायाम करता येतील. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी वेट ट्रेनिंग करावे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल, तरी उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे हे लक्षात ठेवावे.

नियंत्रित आहार व आवश्यक व्यायाम करूनही उच्च रक्तदाब नियंत्रित होत नसेल, तर आपल्याला औषधोपचाराची गरज असते.
उच्च रक्तदाबावरील औषधे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात, जसे…

- शरीरातील मिठाचे प्रमाण कमी करणे

- हृदयाचे ठोके नियंत्रित करणे

- रक्तवाहिन्यांचे प्रसारण करणे

बऱ्याच वेळी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एकापेक्षा जास्त औषधांची गरज भासू शकते. तुम्ही उच्च रक्तदाबासाठीची नुकतीच औषधे सुरू केली असल्यास, खालील मुद्दे लक्षात ठेवावेत :

१. तुम्ही औषधे नियमित घेतली पाहिजेत.

२. औषधांचा काहीही परिणाम होत नाही, असे तुम्हाला वाटत असले, तरीही त्यांचे शरीरात कार्य चालू आहे, हे लक्षात ठेवावे.

३. औषधांमुळे वजन वाढणे, थोडासा थकवा जाणवण्यासारखी लक्षणे दिसत आहेत, असे वाटले तरीही ही औषधे बंद करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशी जाऊन वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी करा.

Dr. Sushil Shinghavi
Dr. Sushil Shinghavi
MS/MD - Ayurveda, Diabetologist General Physician, 13 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch
Dr. Kalpesh Wani
Dr. Kalpesh Wani
BAMS, Ayurveda Panchakarma, 8 yrs, Pune