Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कानाचा स्त्राव
#रोग तपशील#कानदुखी



कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

पथ्यपाणी विचार –

ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

सोपा घरगुती उपचार –

हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.

कानाचे यंत्र –

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. कान यंत्र घेण्यापूर्वी हा कान मंत्र समजून घेतला तर इंद्रियाची जपणूक होईल.

Dr. Yogesh Patil
Dr. Yogesh Patil
BAMS, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Swati Dagade
Dr. Swati Dagade
BAMS, Ayurveda Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Abhinandan J
Dr. Abhinandan J
BAMS, Ayurveda Family Physician, 1 yrs, Pune
Dr. Geetanjali Ghule Karad
Dr. Geetanjali Ghule Karad
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune