Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
कोरडे डोळे
#रोग तपशील#कोरडे डोळे



कोरडे डोळे…

डोळे कोरडे होण्याच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला पुष्टी मिळाली ती अलीकडे औषधांच्या दुकानात डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर विविध प्रकारचे आय-ड्रॉप्स घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विविध समस्यांवर वेगवेगळे आय-ड्रॉप्स सध्या डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त लोक खरेदी करत आहेत. डोळ्याला खाज येणे, जळजळणे, कोरडे होणे या समस्येसह डॉक्‍टरांचा धावा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे होतंय कशाने? हा ना कोणत्या संसर्गाचा प्रकार ना ऍलर्जीचा. विशेष म्हणजे डॉक्‍टर मंडळी या समस्येसाठी जबाबदार ठरवत आहेत, स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर वर्किंग स्टाइलला.

आय केअर इंडस्ट्रीच्या अंदाजपत्रकानुसार, जगभरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या डोळे कोरडे होण्याच्या समस्येने ग्रस्त आहे. दृष्टिदोषानंतर सध्याची सर्वाधिक संख्येने केली जाणारी आरोग्य तक्रार म्हणजे डोळे कोरडे होणं ही असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या सर्वाधिक असल्याचं आतापर्यंत नेत्रचिकित्सकांचं म्हणणं होतं. पण आता केवळ स्त्रिया किंवा वृद्धच नव्हे, तर सर्वच वयोगटांतील स्त्री-पुरुष डोळ्यांच्या तक्रारी घेऊन येत असल्याचं चित्र दिसतं.

या वाढत्या समस्येचं कारण काय?
डोळ्यातील श्‍लेष्मा पटल (म्युकस मेम्ब्रेन) जे अश्रूनिर्मितीसाठी मुख्य घटकद्रव्य निर्माण करतं, ते वयानुसार कोरडं होत जातं. कॉर्निआ नामक जर्नलमध्ये नुकतंच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचं मुख्य कारण आहे आर्द्र, दमट वातावरणात दीर्घकाळ आपण राहतो ते. उदा. वातानुकूलित कार्यालयं. दुसरं आणि अतिमहत्त्वाचं म्हणजे पापण्याही लवू न देता सतत कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन स्क्रीनकडे पाहात राहणं. खरं तर लोक पापण्या लवणंच विसरले आहेत. आज असंख्य नोकऱ्या अशा आहेत की, त्यात संपूर्ण दिवसभर कॉम्प्युटरकडे डोळे लावून बसावं लागतं, असे लोक डोळ्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. आता खरं तर आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक स्टिकरच लावायला हवा, “ब्लिन्क. पापण्या मिचकवा…’ असा.

सर्वसामान्यत: माणसाने एका मिनिटात 12-15 वेळा डोळे मिचकावले पाहिजेत. डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग तसंच ऍण्टिस्टॅमिना आणि ऍण्टिडिप्रेसंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत असतात. लसिकसारख्या काही डोळ्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये तात्पुरती कोरडे होण्याची समस्या उद्‌भवते. कोरड्या आणि वादळी हवामानामुळेही डोळे कोरडे होतात. कॉण्टॅक्‍ट लेन्सेस आणि डोळ्यांचा मेकअपही यासाठी कारणीभूत आहेच. काही डॉक्‍टरांचं असं म्हणणं आहे की, कॉण्टॅक्‍ट लेन्स वापरणाऱ्यांना जर कोरड्या डोळ्यांची समस्या असेल तर डोळ्यांचा संसर्ग आणि सतत खाज होण्याची शक्‍यता अधिक असते.

कोरड्या डोळ्यांचेही दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे ऑक्‍स्ट्रक्‍टिव्ह सिंड्रोम. यात आपले डोळे आवश्‍यक अश्रूनिर्मिती करू शकत नाहीत. दीर्घकाळ हेच एकमेव कारण मानलं जात होतं. मात्र, अलीकडील काही वर्षामध्ये अश्रूंचा वाईट दर्जा, त्यांची निकृष्ट स्रवणक्षमता हेही कारण दिसू लागलं आहे. याला सिक्रेट्री सिंड्रोम म्हटलं जातं. अनेकांमध्ये या दोन्ही समस्या दिसतात. डोळ्यांचा पृष्ठभाग आच्छादणारी अशी एक संरक्षक अश्रूफित (प्रोटेक्‍टिव्ह टीअर फिल्म) ही मुख्यत: तीन घटकांपासून बनलेली असते.

बाह्य तैलस्तर हा डोळ्याचं बाष्पीकरण रोखतो. मधला असतो पाण्याचा स्तर. या स्तरात जेल स्वरूपातील म्युसिन नामक घटक काही प्रमाणात असतो, ज्याद्वारे डोळ्यांची बाह्य अश्रूफित धरून ठेवण्याचं काम केलं जातं. डोळ्यांच्या वरील आणि खालील पापण्यांमध्ये असणारी मेबोमिअन ग्रंथी डोळे पाणीदार राहण्यासाठी आवश्‍यक तैलनिर्मिती करत नाही, तेव्हा मध्य पातळीतील पाण्याच्या स्तरयुक्त अश्रूंचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.

आपण जेव्हा जेव्हा डोळे मिटतो आणि जेव्हा आपल्या वरच्या पापण्यांचा खालच्या पापण्यांना स्पर्श होतो तेव्हा मेबोमिअन ग्रंथी तेल स्रववतात. या तैलस्तरामुळेच अश्रूफित स्थिरावते. जर आपण अर्धवट डोळे मिटले तर ही प्रक्रिया पूर्णच होत नाही. त्यामुळे डोळे पाणीयुक्त ठेवण्यासाठी आवश्‍यक तेल बाहेरच येत नाही. ते तेल पुन्हा वरच्या पापणीकडेच राहतं. तिथे त्यांचा जाड स्तर तयार होतो. त्यामुळे या तैल ग्रंथींचा प्रवाह आपोआप बंद होऊ लागतो. अनेकांना अर्धवट डोळे मिटण्याचीच सवय असते. आपल्याही नकळत आपण हे करत असतो, परिणामत: डोळे कोरडे व्हायला सुरुवात होते.

डोळे कोरडे होण्याची लक्षणं म्हणजे, रवाळ-खरखरीत वाटणं, जळजळणं किंवा खाज येणं, कधी कधी अंधुक दिसणं. यात अनेकदा एक सुरक्षात्मक तंत्र (प्रोटेक्‍टिव्ह मेकॅनिझम) म्हणून आपलं बोलकं शरीरच अधिक प्रमाणात डोळ्यातून पाणी बाहेर स्रवतं. डोळे कोरडे होण्याच्या समस्येला हा प्रतिसाद असतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कणनिर्मिती होऊन डोळ्यात एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब या जीवनशैलीनुसार होणाऱ्या आजारांचं प्रमाण जसं वाढलंय, तसंच हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येचं आहे. पूर्वी आपल्या देशात डोळ्यांचे आजार व्हायचे, ते कुपोषणामुळे. ती एक न्युट्रिशनल समस्या होती. आता मात्र बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानामुळे हा आजार वाढला आहे. दिवसातून किमान एक रुग्ण ड्राय आय सिंड्रोमचा असतो. डोळ्यांच्या इतर समस्या घेऊन आलेल्यांमध्येही कमी-जास्त प्रमाणात ही समस्या आढळते. त्यानुसार आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे भाग करू. बाहेरून फिरून आलं की डोळे लाल होऊन पुन्हा आपोआप बरे होतात हा माइल्ड प्रकार. ड्राय आय सिंड्रोमची ही अगदी सुरुवातीची स्टेज, जी अनेकांमध्ये दिसते.

त्यासाठी डोळ्याला गरम उबदार कपड्याची वाफ घेता येते. मात्र, मॉडरेट आणि सिव्हिअर प्रकारच्या सिंड्रोममध्ये विशिष्ट उपचारपद्धती अवलंबली जाते. डोळ्याला गरम वाफ देऊन बंद झालेल्या नेत्रग्रंथीतील क्‍लॉग्स वितळले जाऊन ती उघडली जाते, याला हॉट फॉर्मेण्टेशन किंवा हॉट कॉम्प्रेशन म्हणतात. डोळ्यांना मसाज करण्याचं तंत्रही वापरलं जातं. मसाज मिळून बंद झालेला भाग मोकळा होतो. साचलेली घाण बाहेर आल्यावर ती स्वच्छ केली जाते. नंतर चांगली अश्रूनिर्मिती व्हावी यासाठी काजळासारखं ऍण्टिबायोटिक स्टिरॉइड लावलं जातं. यासोबत डोळ्यांवर अश्रू ड्रॉप्सही दिले जातात. त्याला टीअर सबस्टिटयुटस्‌ म्हटलं जातं. डोळे स्वत:हून अश्रूनिर्मिती करत नसल्याने हे कृत्रिमरीत्या तयार केलेलं रसायन अश्रूसारखं काम करतं.

कोरड्या डोळ्यांची समस्या गंभीर स्वरूपात असेल तर जेल ड्रॉप्स, ऑइंटमेंट वापराचा सल्ला दिला जातो. पण या उपचारात काही काळापुरतं अंधुक दिसतं, म्हणूनच जेल किंवा ऑइंटमेंट स्वरूपातील औषधं रात्रीच्या वेळीच वापरण्यास सांगितली जातात. काहींना रात्री झोपताना डोळे अर्धवट बंद करण्याची सवय असते ती चुकीची आहे, यासाठीही असे उपचार केले जातात. नेत्रग्रंथीचा दाह कमी करण्यासाठी स्टेरॉइड्‌स, ओमेगा थ्री फॅटी ऍसिडसारखी ऍण्टिइन्फ्लामेट्री औषधंही दिली जातात.

अशी विविध प्रकारची औषधं आणि उपचारपद्धती अवलंबण्यापेक्षा डोळ्यांची योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली तर निरोगी दृष्टी मिळू शकते, पण अर्थातच त्यासाठी हवी आरोग्याची दूरदृष्टी!

Dr. Sheetal Gulhane
Dr. Sheetal Gulhane
BAMS, Ayurveda Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Dr. Uday  Maske
Dr. Uday Maske
BAMS, Ayurveda, 18 yrs, Mumbai
Dr. Saurabh Jaiswal
Dr. Saurabh Jaiswal
MBBS, General Physician, 4 yrs, Varanasi