Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गाईचं दूध प्या उंच व्हा
#आरोग्याचे फायदे#डेअरी चे खाद्य #बाल संगोपन

ज्यांच्या घरात साधारण दहा-बारा महिन्यांची बाळं असतात, अशी मंडळी आजकाल डॉक्टरांना हा प्रश्न विचारतात. प्रश्न ऐकून डॉक्टरांना खरंच खूप भरून येतं. २१व्या शतकातील आरोग्यशैलीत या पालकांनी बाळाला चक्क दूध पाजायचा निर्णय घेतला, हेच खरं डॉक्टरांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. गायीचं दूध, म्हशीचं दूध, डबाबंद पावडरचं दूध, पॅकेज्ड दूध, सोया दूध, बदामाचं दूध असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर असतात. आपल्या या प्रश्नाचं उत्तर संगणकावर न शोधता डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या गोष्टीचं अप्रूप डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही, तर नवलच.


तसं पहिलं, तर दूध हे पूर्णान्न समजलं जातं. एक वर्षापर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं आवश्यक असतं. त्यानंतर मुलांना सर्व स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, कर्बोदकं असे सर्व अन्नघटक, जीवनसत्वं आणि कॅल्शियमसारखी खनिजं पुरवणारे दूध हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे मुलांचे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्था उत्तम बनते. त्यातही आपल्या देशात फार पूर्वीपासून गायीचंच दूध मुलांसाठी उत्तम समजलं जातं.
या समजुतीला पुष्टी देणारं एक संशोधन नुकतंच ‘अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशन’च्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. कॅनडामधील सेंट मायकेल्स हॉस्पिटलमधील डॉ. जोनाथन मॅग्वायर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या संशोधनानुसार, जी मुलं गायीचं दूध अगदी लहानपणापासून नियमितपणानं घेतात, त्यांची उंची इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वाढते.


या संशोधनामध्ये २ वर्षं ते ६ वर्षं वयाच्या ५,०३४ मुलांची वर्षभर पाहणी करण्यात आली. या मुलांना रोज १ ते ३ कप दूध देण्यात आलं. यातील ८७ टक्के मुलांना फक्त गायीचं, १३ टक्के मुलांना इतर प्रकारचं आणि ५ टक्के मुलांना दोन्ही पद्धतीचं दूध रोज देण्यात आलं.
या सर्वेक्षणाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या आणि चित्तवेधक गोष्टी नजरेस आल्या :

जी मुलं गायीचं दूध घेत नव्हती, त्यांची उंची त्यांच्या वयाला किमान अपेक्षित उंचीपेक्षा कमी भरली. आकडेवारीनुसार दर कप (२५० मिलीलिटर) दुधामागे ०.४ सेंटीमीटरनं ती खुजी भरली.

ज्या मुलांना फक्त गायीचं दूध दिलं जात होतं, त्यांची उंची त्यांच्या वयाच्या किमान अपेक्षित उंचीप्रमाणे ०.२ सेंटीमीटरनं अधिक वाढली.

३ वर्षांच्या मुलांमध्ये रोज ७५० मिलीलिटर गायीचं दूध घेणारी मुलं, त्याच वयाच्या इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा १.५ सेंटीमीटरनं उंच भरली.

जी मुलं गायीचं आणि इतर असं दोन्ही प्रकारचं दूध घेत होती, त्यांची उंचीदेखील फक्त गायीचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा कमी भरली.

या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की ५०० मिलीलिटर गायीच्या दुधात सर्वसाधारणपणे १६ ग्रॅम प्रथिनं असतात. म्हशीच्या दुधात ती तितक्याच प्रमाणात असतात; पण सोया मिल्क, बदामाचं दूध आणि इतर पॅकेज्ड दुधात ती खूपच कमी असतात. गायीच्या दुधातील प्रथिनं बाळाच्या पचनास सोपी असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम उत्तम होतो. म्हशीच्या दुधात स्निग्धांश खूप जास्त असतो. त्यामुळे मुख्यत्वे मुलांच्या चरबीत वाढ होते. दोन्ही प्रकारच्या दुधातजीवनसत्व आणि कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजं भरपूर असतात; त्यामुळे उंची वाढायला मदत होते. या संशोधकांच्या मते उंची वाढण्याच्या क्रियेला गायीच्या दुधाची जास्त मदत होते.


या संशोधनाचा मुख्य भर हा कृत्रिम आणि फॅन्सी दुधांवर जास्त आहे. एकविसाव्या शतकातल्या पालकांनी हे लक्षात घ्यावं, की नैसर्गिक दूध मग ते गायीचं असो, की म्हशीचं, कुठल्याही जाहिरातबाजी करणाऱ्या दुधाच्या ब्रँडपेक्षा जास्त सकस असतं. त्याचबरोबर, दुधात टाकून त्याची चव बदलणाऱ्या आणि मुलांची उंची आणि स्टॅमिना वाढवण्याची अशास्त्रीय जाहिरात करणाऱ्या बाजारू चॉकलेटी पावडरींपेक्षा गायीचं दूध लक्षपट आरोग्यदायी असतं.

Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Joydeep Saha
Dr. Joydeep Saha
Specialist, Pain Management Specialist Physician, 10 yrs, Kolkata
Dr. Simranpal Singh
Dr. Simranpal Singh
Medical Student, General Physician, 2 yrs, Chandauli
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune