Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
खांदा दुखणे
#रोग तपशील#खांदा दुखणेखांदा दुखणे

खांदा निरोगी राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करणे आणि आवश्‍यक तेव्हा अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास टाळाटाळ न करणे. तज्ज्ञाचा सल्ला घेणे म्हणजे शस्त्रक्रिया नव्हे, तर एक निरोगी खांदा पूर्ववत प्राप्त करण्याची हमी नक्कीच आहे.

साठीतली एक सेवानिवृत्त शिक्षिका बाहय-रुग्ण विभागात आली. तिचे दोन्ही खांदे अनेक वर्षापासून दुखायचे आणि त्या त्रासा बरोबर जगायचे तिने स्वीकारले होते. पण अलीकडे तिला उजव्या खांद्याचा त्रास असहनीय झाला होता. ब-याच कामांसाठी तिला दुस-यांवर अवलंबून राहावे लागायचे. मग ते केस विंचरणे असो, कपडे बदलणे वा आंघोळ करणे. वेदनांमुळे तिच्या अनेक रात्री निद्रारहित जाऊ लागल्या. स्वावलंबी अशी ती खंबीर व्यक्ती खांद्याच्या त्रासामुळे आपला आत्मविश्वास गमावत चालली होती. मला खात्री आहे; बरेच जण या वृद्ध महिलेचा त्रास स्वत:च्या खांदे दुखीशी परस्पर संबधित करू शकतील. तरुणांमध्ये सुद्धा खांद्याचा त्रास भरपूर प्रमाणात आढळतो ज्यामुळे त्यांना आवडीच्या छंदांना (खेळ, कसरत इ.) अलविदा करावा लागतो.

खांदा दुखणे किती सामान्य आहे ?

स्नायु आणि अस्थिचे दोष बघता खांदा-दुखी ही पाठदुखी आणि मानेच्या दुखण्यानंतर तिस-या क्रमांकावर आहे. भारतातील वाढती क्रीडा-संस्कृती आणि वाढत्या आयुर्मानामुळे यात दरवर्षी वाढ होत आहे. एका संशोधनानुसार एका व्यक्तीला पूर्ण जीवनकाळात खांदे दुखीचा त्रास होण्याची शक्‍यता 70% असते. खांद्याचा सांधा शरीरातला सर्वात लवचिक व हलणारा सांधा आहे. त्यामुळे इजेलाही संवेदनक्षम आहे. हा सांधा शारीरिक श्रम, खेळ आणि सततच्या हालचालीमुळे दुखावला जाऊ शकतो. इजा झाली नाही, तरी वाढत्या वयात खांद्याची झीज होऊ शकते. वयाच्या साठीनंतर खांद्याचे त्रास खूप प्रमाणात आढळून येतात.

खांदादुखीची सर्वसामान्य कारणे ?

खांदादुखीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रोटेटर कफ डिसऑर्डर (सिंड्रोम ) हे आहे. जेथे खांद्याभोवती असणा-या स्नायुंचे आवरण (रोटेटर कफ) खराब होते. हा दोष रोटेटरी कफला सूज आल्यामुळे, वारंवार इजेमुळे किंवा स्नायुतील कमकुवतपणामुळे होतो. ब-याच वेळा हा कफ फाटतो व त्यामुळे संधिवात होऊ शकतो. संधिवात हा वयोमानानुसार होणारा दोष आहे. ज्यामध्ये जसजसे वय वाढते तसतसे खांद्याच्या हाडावरचे संरक्षणात्मक आवरण नष्ट होते आणि खांद्यातली हाडे एकमेकांवर घासली जातात त्यामुळे ती दुखतात. ब-याचदा तरुणांमध्ये खांदा निखळणे हे पण त्रासाचे एक कारण होऊ शकते. फ्रोजन शोल्डर हा एक स्वयंमर्यादित दोष आहे. ज्यामध्ये सांध्याभोवतीचे स्नायु व कॅप्सूल आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्यामुळे खांदे सुजतात व हालचाल मर्यादित होते. हा त्रास पन्नाशीतील मधुमेही रुग्णांना अधिक प्रमाणात होतो. कधी कधी खांदे-दुखी ही मानेच्या स्नायुं किंवा नसांच्या त्रासामुळे उद्भवू शकते.

खांदा दुखीसाठी आपत्कालीन मदत कधी घ्यावी ?
कोणतीही इजा झाली नसता खांदा अचानक दुखत असेल तर तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हृदयविकाराच्या इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जळजळ होणे, घेरी येणे, जास्त प्रमाणात घाम येणे, मान किंवा जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागातील (एपिगॅसट्रीम) वेदनांचा समावेश होतो. आपल्याला खांद्याच्या वेदनेसह तापाची कणकण असेल किंवा खांद्याची हालचाल करण्यास असमर्थता असल्यास डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. खांद्याला अपघाती इजा झाली किंवा खांदा निखळला असल्यास अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या.

खांदे-दुखीवर उपचार व पर्याय काय ?
बहुतेकवेळा शस्त्रक्रियेविना खांदा दुखणे बरे होऊ शकते. काही उपचार पर्यांयामध्ये अल्पकाळ विश्रांती, बर्फाचा शेक, फ़िजिओथेरपी, स्लिंग वा इनमोबीलायझर ब्रेस, स्टेरॉईड इंजेक्‍शन व शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. अनेकदा दुखण्यावर आणि सुजेवर डॉक्‍टर औषधे देतात. खांद्यावर शस्त्रक्रियेची आवशकता असेल तर आजकाल बहुतेक शस्त्रक्रिया या दुर्बिणीद्वारे केल्या जातात याला की-होल शस्त्रक्रिया म्हणतात. सांधा निरोपण (जॉईंट-रिप्लेसमेंट) शस्त्रक्रियेचा सल्ला इतर पर्यायी उपचार संपल्यावर दिला जातो.

खांदे-दुखीवर घरगुती उपचार कोणते ?
खांद्याच्या वेदना क्षुल्लक दुखापतीमुळे होत असतील तर घरगुती उपचारांचा विचार केला जाऊ शकतो. तथापि त्याकडे दुर्लक्ष करू नये. खांदा सामान्य स्थितीत येण्यास काही दिवस लागतात. खांद्याच्या संरक्षणासाठी विश्रांती घ्यावी. सूज व दुखणे बर्फाच्या शेकाने कमी होऊ शकते. खांद्याच्या संरक्षण व आधारासाठी सपोर्टिंग स्लींगचा वापर होऊ शकतो. सौम्य मालीश दुखणे बरे करण्यास मदत करू शकते, पण मार लागला असल्यास ते टाळावे. एक किंवा दोन आठवडे विश्रांती खांदा दुखीवर पुरेशी आहे, पण त्यापेक्षा जास्त विश्रांती घेऊ नये, कारण त्यामुळे खांद्याची हालचाल कमी होऊ शकते. म्हणून खांद्याचे व्यायाम सुरु करणे आवश्‍यक असते. व्यायाम सोपे आहेत व ते सहजपणे इंटरनेटवर शोधले जाऊ शकतात. खांद्याच्या वेदना व सुजेवर औषधांद्वारे (ओवर द काऊंटर ) लवकर आराम मिळू शकतो. जर खांद्यावर शास्त्रक्रिया झाली असेल तर शस्त्रकियेनंतर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. वेदना आणि सूज कमी झाल्यावरच खेळांमध्ये सहभागाचा विचार होऊ शकतो. घरगुती उपचारांचा फायदा होत नसेल तर अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

खांद्याच्या दुखापतीपासून बचाव कसा करावा ?
खांदा दुखापती रोखण्यासाठी खांद्यावर अतिरिक्त ताण देण्याचे टाळावे. खेळामध्ये सहभागी असाल किंवा व्यायाम करू इच्छित असाल, तर योग्य तंत्र व कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे. वृद्धांची हाडे कमजोर व स्नायू कमी लवचीक असतात. त्यांनी जड वस्तू उचलताना विशेष काळजी घ्यावी. जड वस्तू खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणे टाळावे. वारंवार डोक्‍याच्या पातळीपेक्षा वर करावी लागणारी कामे टाळावी किंवा कामात अनुरूप बदल करून घ्यावा. जड वस्तू (5 किलोपेक्षा जास्त) घेऊन जाणे आवश्‍यक असेल तर तिला शरीरानजीक घेऊन उचलावे. शरीरापासून दूर भार उचलल्यास खांद्यावर अतिरिक्त ताण पडतो. खांद्याची वारंवार हालचाल करावी लागणारी कामे करताना अधूनमधून आवश्‍यक तेवढी विश्रांती घ्यावी. रोजच्या वापरावयाच्या वस्तू सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्या.

Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Manish Rawool
Dr. Manish Rawool
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Varshali Mali
Dr. Varshali Mali
MBBS, Gynaecologist Obstetrician, 6 yrs, Pune
Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune