Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
पेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीज
#रोग तपशील#पेरीफरल न्युरोपॅथीपेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीज

हृदयविकार किंवा तत्सम गंभीर विकार होऊ नये म्हणून आपण सगळेच जण वेळोवेळी काळजी घेत असतो. पण समजा आपल्या पायाला काही झालं तर मात्र आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी पायाला सूज येणं किंवा अगदी चप्पल चावणंदेखील महागात पडू शकतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याविषयी आपल्यात असलेला जागरूकतेचा अभाव..
हृदयविकार हा शब्द ऐकला की आपल्याला धडकी भरते. त्यामुळे हृदयविकार होऊ नये म्हणून आपण आधीपासूनच काळजी घेतो. कारण त्याची तीव्रता आपल्याला सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे जाणवते. मात्र त्या मानाने पायाच्या विकारांचं गांभीर्य तितकंसं कोणाच्या लक्षात येत नाही. काही मोजकीच मंडळी याबाबत जागरूक असतात, असं म्हटलं तरीही चालेल. पण पायाला काहीही झालं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयविकाराप्रमाणेच पायाचे विकारही अतिशय धोकादायक ठरू शकतात. या गोष्टीच्या तीव्रतेची कोणाला कल्पना नसल्याने वेळेवर निदान होत नाही. आणि वेळेवर निदान झालं नाही की पायाचे आजार अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचतात.

पायाच्या विकारात नेमकं काय होतं?
हृदयविकाराप्रमाणेच पायातील नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याने पायाचे विकार संभवतात. पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींना मधुमेह असेल, तसंच ही मंडळी धूम्रपान करत असतील तर त्यांच्यामध्ये पेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीज विकसित होण्याचा धोका अधिक संभवतो आणि पायाचा आजार हा त्यापैकीच एक लक्षण आहे. पायाचा विकार हा हृदयविकाराची संभावना दर्शवतो. भविष्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा अवयव कापून काढण्याची वेळ येऊन ठेपते. पेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीजवर काम करणा-या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यात धोक्याची पातळी अधिक असली तरी ब-याच केसेसमध्ये आजार अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निदानच झालेलं नसतं.

मधुमेही रुग्णांना इस्पितळात दाखल करावं लागण्यामागे पायाची समस्या महत्त्वाची असते. यासाठी वर्षाला करोडो रुपयांचा खर्च होत असून विकृती निर्माण होण्याचं तसंच मृत्यूचं प्रमाणही खूप आहे. पायाचं दुखणं खूपच गंभीर असून यामुळे रुग्णाचे जीवन व अवयव धोक्यात येतो. पायाच्या शिरांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. रुग्णाच्या हृदयातील शिरा किंवा नसा ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यावरून हेच दिसून येतं की रुग्णाच्या उर्वरित शरीरामध्ये अशा प्रकारे ब्लॉकेज निर्माण होण्याचं प्रमाण ३० टक्के इतकं असतं, मात्र पायातील नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास रुग्णाच्या उर्वरित शरीरामध्ये अशा प्रकारे ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता ६० ते ७० टक्के इतकी असते.

लवकर झालेले निदान आणि वाढती जागरुकता यामुळे पायाचं दुखणं कमी होण्यास मदत होते. रुग्णाने तज्ज्ञ व्हॅस्क्युलर सर्जनची मदत घेतली तर योग्य औषधे आणि साधी जीवनशैली यांच्या मदतीने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यावर सहज उपचार करता येतात. इमेजिंग टेक्निकच्या मदतीने कलर डॉप्लर टेस्टचा वापर करून रक्तवाहिन्यांच्या आतील स्थिती पाहता येते आणि याचं निदान करता येतं. १५ टक्के मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायाची गंभीर समस्या केव्हा ना केव्हा निर्माण होते. ज्यामुळे संबंधित अवयवाला धक्का पोहोचतो व व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते. मधुमेहामध्ये संबंधित अवयवाचे विच्छेदन करावं लागण्याचा धोका अधिक असतो. मोठय़ा प्रमाणावर हे रुग्ण न्यूरोपॅथीशी संबंधित असतात आणि त्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता कमी झालेली असते. अशा रुग्णांना कळत न कळतपणे पायाला जखमा होतात, उदा. चप्पल चावणे. यात वेदना होत नसल्याने डॉक्टरकडे वेळेवर जाणं होत नाही. अवयव गमावणा-या अशा रुग्णांची संख्या लक्षणीय असून सुरुवातीला काळजी न घेतल्याचे हे परिणाम आहेत.

अशा प्रकारे आपण पायाच्या समस्यांना आमंत्रण देत असून मधुमेहामुळे तसेच धूम्रपानामुळे या समस्या अधिकच गंभीर होतात. आपल्याकडे अशा प्रकारच्या पायाच्या समस्यांबाबत जागरूकता फारच कमी दिसून येते. मधुमेह झालेल्या लोकांमध्ये जखमा भरून ब-या होण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. कमी झालेला रक्तप्रवाह, जखमा ब-या होण्याचं मंदावलेलं प्रमाण या लोकांमध्ये दिसून येते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये अवयवाचे विच्छेदन करण्याचे प्रमाण ५० टक्के असून सामान्यांच्या तुलनेत ते ४० पटीने अधिक आहे. बलून आणि स्टेंटिंगमुळे साधारणपणे इन्व्हेसिव्ह सर्जरीची जागा घेता येते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट अरुंद किंवा ब्लॉक झालेली रक्तवाहिनी उघडण्यासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट बलूनचा वापर करतो आणि काही वेळा याकरता स्टेन्टचा वापर केला जातो.

पायाच्या आजारातील काळजी
- चालण्याचं अंतर वाढवा.
- पायाची जखम किंवा गँगरीन यावर त्वरीत उपचार घ्यावेत.
- अशा प्रकारच्या आजारात हार्टअटॅक किंवा स्ट्रोक येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. म्हणून शक्यतो धूम्रपान करणं टाळावं.
- सकस आहार घ्यावा जेणेकरून रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
- मधुमेह, लिपिड लेव्हल आणि रक्तदाब नियंत्रणात कसा राहिल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

पायाची समस्या निर्माण होताना पहिल्या टप्प्यातील लक्षणं
- चालताना पायात पेटके येऊन चालण्याचे अंतर कमी होणे.
- पाय बधीर होणे.
- पाय थंड पडणे.
- पायांवरचे केस कमी होणे आणि नखं बारीक होऊन तुटणे.
- आराम केल्यावर पाय दुखायचे थांबणे हे पायाच्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे दुसरे लक्षण आहे.
- बैठी आणि तणावपूर्ण शहरी जीवनशैली.

Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Nitin Desai
Dr. Nitin Desai
BAMS, Ayurveda Panchakarma, 22 yrs, Pune
Dr. Sushant Bagule
Dr. Sushant Bagule
BAMS, Pune
Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Snehal Pharande
Dr. Snehal Pharande
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune