Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
यकृत सिरोसिसमध्ये जलोदर
#रोग तपशील#सिरोसिस

जलोदर

पोटात द्रव साठल्यास त्या अवस्थेला ‘जलोदर’ म्हणतात. काही वेळा जलोदर हा सार्वदेहिक शोफाचा (द्रवयुक्त सूजेचा) भाग असतो, तर यकृतविकारात पर्युदरगुहेमध्ये (उदरातील इंद्रियांवरील आवरण व त्याचेच पोटाच्या पोकळीच्या भित्तीवरील आतील आवरण यांमधील पोकळीमध्ये) रक्तातील द्रव झिरपून साठून राहतो. जलोदर हे एक लक्षण असून ते अनेक विकारांत आढळते. त्याच्या कारणांचे दोन प्रकार आहेत : (१) स्थानिक : म्हणजे खुद्द पर्युदरामध्ये (पोटाच्या पोकळीच्या भित्तीला आतील बाजूस असणाऱ्या आवरणामध्ये) क्षय, अर्बुद (पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या मारक गाठी) वगैरे कारणांमुळे होणारा पर्युदरशोथ (पर्युदराची दाहयुक्त सूज) आणि (२) सार्वदेहिक : म्हणजे शरीरात इतरत्र होणाऱ्या विकृतींमुळे पर्युदरगुहेत रक्तद्रव साठून राहतो.

स्थानिक
पर्युदराचा शोथ उत्पन्न करणाऱ्या सर्व कारणांमुळे जलोदर होऊ शकतो. तीव्र व विशेषतः चिरकारी (फार काळ टिकणारा) पर्युदरशोथ, पर्युदरातील लसीका तंत्राचा (रक्तद्रव सदृश द्रव पदार्थ ज्यामधून वाहतो त्या वाहिन्यांच्या यंत्रणेचा) क्षयरोग व मारक अर्बुदे ही प्रमुख स्थानिक कारणे आहेत. उदरात कोठेही मारक अर्बुदाचा प्रादुर्भाव झाला म्हणजे पर्युदरात त्याची आनुषंगिक किंवा दुय्यम अर्बुदे उत्पन्न होऊन त्यामुळे जलोदर होतो. जठर, यकृत व स्त्रियांमध्ये अंडकोश या अंतस्त्यांच्या (छाती व पोट यांच्या पोकळीतील इंद्रियांच्या) मारक अर्बुदांच्या अनुषंगी अर्बुदांमुळे जलोदर होतो.

सार्वदेहिक

यकृत
यकृतसूत्रणरोग या रोगात जलोदर हे एक प्रमुख लक्षण आहे. या रोगात यकृत कोशिकांचा (पेशींचा) नाश होऊन त्यांची जागा तंतुमय ऊतकाने (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहाने) भरून काढली जाते. हे तंतू जसजसे आकसू लागतात तसतसा यकृतातील रक्तप्रवाहाला रोध उत्पन्न होऊन प्रवेशिका नीलेमधील (यकृतातील मुख्य अशुद्ध रक्तवाहिनीमधील) रक्तदाब वाढतो. प्रवेशिका नीलेच्या पोषक शाखोपशाखांमध्ये रक्त तुंबून राहिल्यामुळे त्यांच्या कोशिकांमधून रक्तद्रव पाझरून बाहेर पडून पर्युदरात साठून राहतो. प्रवेशिका नीलेमधील रक्तदाब वाढल्यामुळे तिच्या पोषक शाखोपशाखांचा एरवी असलेला परिवहन तंत्रातील (रक्त वाहून नेणाऱ्या यंत्रणेतील) इतर नीलाशाखांशी असलेला अस्फुट संबंध अधिक प्रमाणात उघडला जाऊन तुंबलेले रक्त प्रवेशिका नीलेकडून सार्वत्रिक परिवहन तंत्रात जाण्याची क्रिया सुरू होते. त्यामुळे अस्फुट असलेल्या नीला मोठ्या दिसून लागतात. त्या प्रकाराला पार्श्व परिवहन असे नाव असून अशा तऱ्हेच्या परिवहनामुळे ग्रासिकेच्या (अन्ननलिकेच्या) नीला, जठरनीला, नाभीच्या भोवतीच्या उदराग्रभित्तीतील नीला मोठ्या दिसून लागतात. केव्हा केव्हा ग्रसिकेतील नीला फुटून होणारा रक्तस्राव ओकारीवाटे बाहेर पडतो.
प्रवेशिका नीलेवर बाहेरून दाब पडला असता अशीच परिस्थिती उत्पन्न होऊन जलोदर होतो. अग्निपिंड (जठराच्या मागच्या बाजूस असणारी मोठी, लांबट व द्राक्षाच्या घडासारखी ग्रंथी) इ. जवळपासच्या अंतस्त्यांमध्ये अर्बुद झाल्यास त्यांचा दाब प्रवेशिका नीलेवर पडूनही जलोदर होऊ शकतो.

हृदय
अनेक हृद्‌विकारांत हृद्स्नायू निर्बल झाल्यामुळे रक्तपरिवहन (रक्ताभिसरण) नेहमीसारखे कार्यक्षम न राहता नीलांमध्ये रक्त तुंबून राहिल्यामुळे त्यांतील द्रव पाझरून उदरात व शरीरात इतरत्रही साठून राहतो. त्यामुळे हृद्‌विकारातील जलोदर हे सार्वदेहिक शोफाचेच एक अंग असते. विशेषतः पायावर अथवा रोगी निजून राहिलेला असल्यास पाठीवर असा शोफ जलोदराबरोबरच अथवा त्याच्या आधीही दिसतो.

वृक्क
(मूत्रपिंड)वृक्कविकारामध्ये रक्तातील प्रथिने मूत्रावाटे बाहेर पडल्यामुळे रक्तातील तर्षणदाब कमी पडतो. त्यामुळे रक्तातील द्रवाला आत ओढून धरण्याच्या क्रियेत दोष उत्पन्न होऊन द्रव कोशिकांवाटे बाहेर पडतो. वृक्कविकारातील शोफ सार्वत्रिक असला, तरी सुरुवातीस मुख्यतः पोकळ जागेत उदा., डोळ्यांभोवती व मुष्कांत (वृषण म्हणजे पुं-जनन ग्रंथी ज्यात असतात त्या पिशवीत) दिसतो. जलोदर हा सर्वांगशोफाचाच एक भाग असतो. पांडुरोगातही (अ‍ॅनिमियातही) प्रथिनांचे रक्तातील प्रमाण कमी झालेले असल्यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न होऊन जलोदर होणे शक्य असते. जलोदरात पोटात साठलेला द्रव पिवळट रंगाचा असतो. क्वचित मारक अर्बुदामुळे होणाऱ्या जलोदरात तो लाल वा रक्तमिश्रित असतो. वक्षांतर्गत (छातीतील) लसीका मार्गातील रोधामुळे जलोदर झाला असल्यास तो दुधासारखा पांढरा असतो. त्या द्रवाचे विशिष्ट गुरुत्व १·०१५ ते १·०१८ असून त्यातील प्रथिनांचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी असते.

लक्षणे
साठलेला द्रव फार नसेल आणि त्याचा दाब उदरातील अंतस्त्यांवर पडत नसेल, तर काहीही लक्षणे दिसत नाहीत. जसजसा द्रव अधिकाकधिक साठतो तसतसे पोट मोठे दिसू लागते. विशेषतः कुशीचे भाग बाह्य गोलाकृती दिसू लागतात. सर्व पर्युदरगुहा द्रवाने भरली म्हणजे अग्र उदरभित्ती ताणली जाते, त्या भित्तीवर फुगलेल्या नीला दिसू लागतात. उदरातील अंतस्त्यांवर द्रवाचा दाब पडल्यामुळे पुढील विविध लक्षणे दिसू लागतात. अपचन, क्षुधानाश, वृक्कावर दाब पडल्यामुळे मूत्रोत्पत्ती कमी होणे वगैरे. द्रवाचा दाब अधोमहानीलेवर (शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातील अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या वाहिनीवर) पडल्यामुळे पायांवर सूज येणे वगैरे लक्षणे दिसतात. मध्यपटलावर (छातीच्या व पोटाच्या पोकळ्यांच्या मधल्या पडद्यावर) दाब पडल्यामुळे श्वासोच्छ्‌वासास त्रास होतो. नाभीभोवती नीलांचे जाळे असून नाभी फुगीर व वर आल्यासारखी दिसते.

द्रवाच्या दाबामुळे यकृत वक्षामध्ये वर ढकलले जाते, तसेच हृदयही वरच्या बाजूस सरकते. या गोष्टी ताडनाने म्हणजे एक हात तपासावयाच्या जागी ठेवून दुसऱ्याने ताडन करून तपासण्याने ओळखता येतात.

उदराच्या एका बाजूस टिचकी मारली असता आतील द्रवात उत्पन्न होणारी लाट दुसऱ्या बाजूला हाताला जाणवते. उदरभित्तीमधून जाणारी अशी लाट उदरावर मध्यरेषेत हात उभा ठेवला असता बंद पडते, तशी जलोदरात पडत नाही.

निदान : वर दिलेल्या वर्णनावरून जलोदराचे निदान करणे सोपे असले, तरी त्याच्या कारणांचे निदान करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या कोष्टकावरून निदानाला मदत होते.

Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Snehal Deshmukh
Dr. Snehal Deshmukh
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune