अंग दुखायला लागलं, की अनेकांना ताप आल्यासारखं वाटतं; परंतु अंगदुखीसाठी तापाव्यतिरिक्त अन्यही अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा या अंगदुखीकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरतं. अचानक एखादी जड वस्तू उचलली गेल्यास किंवा शरीरावर अतिताण पडल्यास अंगदुखी होऊ शकते; परंतु या दोन्ही गोष्टी न करता अंगदुखीचा त्रास सुरू झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
सांधेदुखी : या आजारात सांधे, डोकं आणि हाडं दुखायला लागतात.
तणाव : सततच्या तणावामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. झोपेची कमतरता, थकवा, स्नायू किंवा छाती दुखणं इत्यादी कारणांमुळे शरीरावर ताण पडतो आणि त्यातून अंगदुखीचा त्रास सुरू होतो.
टीबी : ट्युबरक्युलेसिस अर्थात क्षयरोग हा तसा फुप्फुसाचा विकार आहे; परंतु टीबीमुळे अनेकदा शरीराच्या इतर भागांतही वेदना होतात.
कॅन्सर : सातत्यानं अतितीव्र स्वरूपातील दुखणं असल्यास ते कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या पेशी शरीराच्या इतर भागांत पसरतात आणि त्यातून वेदना वाढतात.
गाठ : शरीराच्या एखाद्या भागात गाठ असेल, तर प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील टीश्यूंवर सूज येते. हे टीश्यू दुखावल्या गेल्यामुळे शरीरात वेदना होतात.
डेंग्यू : डेंग्यूच्या तापामुळेही अंगदुखी वाढू शकते. डेंग्यूच्या तापात अंगदुखीबरोबरच डोकदुखीचाही त्रास होतो.
अधिक व्यायाम : आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यासही स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. त्यामुळे आपल्या शरीराला मानवेल तितकाच व्यायाम केला पाहिजे.
पोटॅशियमची कमतरता : या आजाराला हायपोकॅलीमिया ही म्हणतात. यात रक्तामधील पोटॅशियमचं प्रमाण कमी होतं. परिणामी, शरीराच्या विविध भागांत दुखायला लागतं.
स्नायू आखडण्यावर उपाय
आपण विविध प्रकारची कामे करतो तेव्हा त्यातल्या कोणत्या तरी कामामुळे आपल्या स्नायूवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो आणि परिणामी तो स्नायू दुखावला तरी जातो किंवा आखडतो. विशेषत: शरीराला न मानवणारा व्यायाम करणे, मर्यादेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करणे, मॅराथॉन स्पर्धेत भाग घेणे किंवा पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करणे यातून स्नायूवर भार पडतो. अशावेळी खालील प्रकारचे उपाय योजावेत. म्हणजे औषधे न घेताच स्नायूंचे दुखणे कमी होऊ शकते.
स्नायू दुखत असतील तर आपल्या घराच्या आसपास किंवा एखाद्या मोकळ्या मैदानावर फेऱ्या मारा . स्नायू दुखावल्यामुळे आराम करावासा वाटतो, पण तसा आराम टाळून थोडेसे तरी फेऱ्या माराआवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो आणि दुखणार्या स्नायूचे दुखणे थांबते. स्नायूच्या दुखण्यावर दुसरा उपाय म्हणजे मालिश करणे. योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने मसाज केला म्हणजे स्नायूचे दुखणे कमी होते. मसाज केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.
आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ही ग्लुकोज नावाची शर्करा शरीराला ऊर्जा प्रदान करते. परंतु ग्लुकोज तयार करण्याच्या प्रक्रियेत काही वेळा बाधा येते किंवा पुरेसे ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे स्नायू दुखायला लागल्यावर तर प्रथिनयुक्त अन्नपदार्थ खावेत. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगादाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. स्नायूच्या आखडण्यावर एक चांगला उपाय म्हणजे दुखावलेल्या स्नायूंना थोडासा ताण देणे.
एक सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. व्यायाम करण्याच्या आधी, व्यायामाच्या मध्ये आणि व्यायामानंतर भरपूर पाणी पिले पाहिजे. कारण व्यायामाने आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन या कमतरतेचा स्नायूवर परिणाम होऊ शकतो. तेव्हा पाणी पिण्यासारखा साधा उपाय करावा. मात्र तहान लागली म्हणून कॉङ्गी आणि अल्कोहोल यांचा वापर करणे कटाक्षाने टाळावे.