Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मल्टिपल स्क्लेरोसिस
#रोग तपशील#मल्टीपल स्केलेरोसिस एमएसमल्टिपल स्क्लेरोसिस

मल्टिपल स्क्लेरोसिस हा मज्जासंस्थेतील काठिण्यामुळे होणारा आजार आहे. त्यात मुख्य मज्जासंस्था अकार्यक्षम झाल्याने मेंदूमध्ये होणारे संदेशवहन आणि मेंदू-शरीरादरम्यान होणारे संदेशवहन विस्कळीत होते. मल्टिपल स्क्लेरोसिसने बाधित व्यक्‍तीमध्ये नसांच्या फायबरच्या संरक्षित आवरणावरच प्रतिकार क्षमता हल्ला करते आणि मेंदू आणि सर्व शरीर यांच्यातील संदेशवहनावर त्याचा परिणाम होतो. शेवटी मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे नसा नष्ट होऊ लागतात किंवा नसांचे कायमचे नुकसान होते. तसेच मल्टिपल स्क्लेरोसिस मेंदू आणि मणक्यावर परिणाम करतो...

मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये सुरुवातीच्या काही लक्षणांमध्ये अशक्‍तपणा, बधीरपणा आणि अंधूक द‍ृष्टी अशी लक्षणे दिसतात. इतर काही लक्षणांमध्ये स्नायूंचे आखडणे, विचारक्षमता कमी होणे आणि मूत्रमार्गाच्या समस्या भेडसावतात. ज्या व्यक्‍तींना मल्टिपल स्क्लेरोसिस होतो त्यांच्यात वयाच्या 20 ते 40 वर्षांदरम्यान सुरुवातीची काही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जरी ही लक्षणे काही काळासाठी दूर होत असली, तरीही ती पुन्हा डोके वर काढू शकतात. या आजाराची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत त्यात टोचल्यासारखे वाटणे, बधीरपणा, खाज सुटणे, जळजळ, तीव्र वेदना होणे ही दिसतात. या सर्व लक्षणांची दखल घेऊन त्यावर उपचार करता येतात. मूत्राशयाच्या समस्येत सर्वसाधारण व्यक्‍तीपेक्षा अधिकवेळा मूत्रप्रवृत्ती होते. तसे शौचविसर्जनाच्या समस्या निर्माण होतात आणि बद्धकोष्ठता होते. चालताना तोल जाऊ शकतो. कारण, मेंदू आणि मणका यांच्यातील संदेशवहन प्रभावित झालेले असते. याचाच अर्थ मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे अशक्‍तपणा येतो, तसेच स्नायू आखडतात, त्यामुळे व्यक्‍तीला हालचाल करणे किंवा चालणे अवघड होऊन बसते. त्याव्यतिरिक्‍त तोल जाणे, पायात बधीरपणा, थकवा यामुळेही चालणे अवघड होते.

मल्टिपल स्क्लेरोसिसची कारणे :
याची नेमकी कारणे अजूनही ज्ञात नाहीत; पण संशोधनांमधून यासाठी काही अनुवांशिक घटक आणि पर्यावरणीय घटक सामील असल्याचे म्हटले आहे.

1) पर्यावरणीय घटक: स्कॉटलंड, स्कॅडीनिव्हिया आणि उत्तर युरोपात प्रामुख्याने हा आजार होतो. इतर वंशीय समाजापेक्षा श्‍वेतवर्णीय समाजात याचे प्रमाण अधिक असते. वयात येण्याअगोदरच विशिष्ट वातावरणाची सवय मल्टिपल स्क्लेरोसिससाठी पूर्वपरिस्थिती निर्माण करू शकते. काही अपवाद वगळता विषुववृत्तापासून दूर गेल्यास मल्टिपल स्क्लेरोसिसचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
2) अनुवांशिक घटक: कुटुंबातील पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या पिढीतील नातेवाइकांमध्ये हा आजार असल्यास धोका बळावतो. भावंडांपैकी कोणाला हा आजार असल्यास दुसर्‍या भावंडाला होण्याची शक्यता 5 टक्क्यांनी वाढते. जुळ्या भावंडांमध्ये हा आजार होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी वाढते. सर्वसाधारणपणे पालकांना हा आजार असल्यास ही शक्यता 10 पटींनी वाढते. काही अनुवांशिक घटकांमुळेही मल्टिपल स्क्लेरोसिस विकसित होण्याची शक्यता असते.
3) इतरही काही घटक मल्टिपल स्क्लेरोसिसचा विकास होण्यास कारणीभूत ठरतात : एपस्टेन-बर (मोनोन्युक्लिओसिस) व्हॅरिकेला झोस्टर यासारखे विषाणू आणि हेपटायटिसचे इंजेक्शन. गर्भावस्थेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन लैंगिक संप्रेरकांमध्ये वाढ.
धूम्रपान.
तणाव.

या आजाराची लक्षणे व्यक्‍तिगणिक बदलतात आणि कोणत्या नर्व्ह फायबरवर परिणाम झाला आहे, त्यावर ही लक्षणे अवलंबून असतात. अर्थात, सुरुवातीची लक्षणे सारखी असतात. द‍ृष्टीच्या समस्या आणि स्मरणशक्‍तीच्या समस्या ही प्राथमिक लक्षणे आहेत. इतर काही लक्षणे पाहूयात...
1) द‍ृष्टीची समस्या वाढून कमी दिसणे किंवा द‍ृष्टी पूर्णपणे जाणे. ही समस्या एकावेळी एकाच डोळ्याची भेडसावते. डोळ्यांची हालचाल करताना वेदना होतात.
2) दुहेरी द‍ृष्टीचा त्रास.
3) एकावेळी शरीराच्या एका बाजूच्या अवयवांमध्ये अशक्‍तपणा येतो. त्यामुळे पायावर परिणाम होतो.
4) विशेषतः, जेव्हा मान पुढच्या बाजूला झुकवतो तेव्हा मानेपासून पाठीपर्यंत आणि अवयवांमध्ये विजेचा झटका लागल्याची जाणीव होते. या लक्षणाला लार्मिट लक्षणे म्हणतात.
5) असंतुलित चालण्यामुळे समन्वय राहत नाही.
6) अस्पष्ट बोलणे.
7) थकवा आणि चक्‍कर येणे.
8) शौचविसर्जन आणि मूत्राशय यांच्या समस्या.

या आजाराचा झटका येतो तेव्हा ही सर्व लक्षणे एकदम गायब होतात; पण स्नायूची समस्या कायम राहते आणि ती वाढत जाते.

अन्य लक्षणे :

1) थकवा आणि अशक्‍तपणा ः मल्टिपल स्क्लेरोसिसच्या 80 टक्के रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अचानक थकवा आणि अशक्‍तपणा जाणवतो. मणक्याच्या नसांचे जेव्हा नुकसान होऊ लागते तेव्हा खूप अधिक थकवा येतो. सर्वसाधारणपणे थकवा अचानक येतो आणि सुधारणा होण्याआधी खूप आठवडे तो तसाच राहतो. पायाचा शक्‍तिपात होणे ही अगदी सहज लक्षात येणारी गोष्ट आहे.

2) मोठे आतडे आणि मूत्राशय विकार : 80 टक्के रुग्णांमध्ये मूत्राशयाचे कार्य व्यवस्थित चालत नसल्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सतत लघवी होणे, लघवीला घाई होणे, लघवीवर नियंत्रण ठेवता न येणे अशा समस्या भेडसावतात. मूत्राशयाशी निगडित समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांना कमी-अधिकवेळा बद्धकोष्ठता, डायरिया किंवा अनियंत्रित शौचप्रवृत्ती असे त्रास होतात.

3) मुंग्या येणे आणि बधीरपणा : मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये मुंग्या येणे आणि बधीरपणा ही दोन लक्षणे समान आहेत. चेहरा, हात, पाय आणि बोटे यामध्ये बहुतेकदा बधीरपणा येतो.

4) लैंगिक समस्या:ः मल्टिपल स्क्लेरोसिस असणार्‍या व्यक्‍तींच्या कामभावना उद्दीपित होण्यात समस्या येऊ शकतात. कारण, ही क्षमता केंद्रीय मज्जासंस्थेशीच निगडित असते.
प्रतिबंध कसा करता येतो? :

मल्टिपल स्क्लेरोसिसला नियंत्रणात कसे ठेवावे याचे मार्ग अजूनही माहीत नाहीत. मात्र, त्याच्या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील काही उपाय करून पाहता येतील...

1) शारीरिक उपचार : मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांना व्यावसायिक थेरपिस्ट मदत करू शकतात. ताणाचे आणि स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम रुग्णाला रोजची कामे आणि हालचाल करण्यास सहाय्य करू शकतात.

2) स्नायूंवरील ताण कमी करणारी औषधे : कडक आणि आखडलेल्या स्नायूंना शैथिल्य देण्यासाठी बाक्लोफेन (लिओरेझल) आणि टीझानाडाईनसारखी औषधे घेतली जाऊ शकतात.

व्यायाम, योगाभ्यास, ध्यानधारणा, पोषक आहार, अ‍ॅक्युपंक्चर आणि इतर आरामाची तंत्रे वापरून मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते.

Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai