Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
संधिरोग
#रोग तपशील#संधिरोग



गाऊट

चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीतील) आनुवंशिक दोषांमुळे यूरिक अम्‍ल जास्त प्रमाणात तयार होऊन ते सांध्यांत साठल्यामुळे सांध्यांना सूज येते, हे मुख्य लक्षण असलेल्या रोगाला ‘गाऊट’ असे म्हणतात.
हा रोग फार प्राचीन काळापासून माहीत असला तरी अजूनही त्याच्या संप्राप्तीचा (कारणमीमांसेचा) पूर्ण उलगडा झालेला नाही. प्राकृतावस्थेत (निरोगी अवस्थेत) १०० मिलि. रक्तात २ ते ५ मिग्रॅ.

यूरिक अम्‍ल असते ते या रोगात ८ ते १० मिग्रॅ. इतके आढळते.यूरिक अम्‍ल हे न्यूक्लिइक अम्‍ल आणि प्युरीन यांचे अंतिम स्वरूप असून त्या स्वरूपातच ते विसर्जित होते. यूरिकअम्‍लापासूनच सोडियम, पोटॅशियम आणि अमोनियम यूरेटे ही लवणे तयार होतात. प्राकृतावस्थेत बहुतेक सर्व यूरिक अम्‍ल त्यास्वरूपातच विसर्जित होते, परंतु गाऊटमध्ये यूरिक अम्‍लाचे असे रूपांतर का होत नाही, याचे निश्चित कारण सांगता येत नाही. बहुधा हा आनुवंशिक दोष असावा. यूरिक अम्‍ल वृक्कावाटे (मूत्रपिंडावाटे) बाहेर पडण्याच्या कामीही काही विकृती असावी, असे मानतात. गाऊटच्या रोग्यांपैकी शेकडा २० पर्यंत रोग्यांत वृक्काश्मरी (मूत्रपिंडातील खडा) आढळतो.

काही रक्तरोगांमध्ये, उदा., पांडुरोग (अॅनिमिया), रक्तकोशिकाधिक्य (रक्तातील तांबड्या पेशींच्या संख्येत वाढ होणे), रक्तातीलयूरिक अम्‍लाचे प्रमाण वाढलेले असते, तेव्हाही गाऊटची लक्षणे दिसतात; त्या प्रकाराला ‘गौण गाऊट’ असे म्हणतात. आनुवंशिकप्रकाराला ‘प्राथमिक गाऊट’ असे म्हणतात. हा रोग बहुधा पुरूषांत होतो. स्त्रियांत अगदी क्वचितच दिसतो. ज्यू लोकांत या रोगाचे प्रमाण अधिक असते.

अवस्था गाऊट या रोगाच्या तीन अवस्था मानलेल्या आहेत: (१) तीव्र, (२) मध्यंतरीय आणि (३) चिरकारी (रेंगाळणारी).

1. तीव्र: ही अकस्मात सुरू होते. मध्यरात्रीनंतर एकाएकी रोगी जागा होऊन त्याच्या सांध्याला भयंकर वेदना होत असतात. शेकडा ८० रोग्यांमध्ये पायाच्या आंगठ्याच्या सांध्यात ही विकृती दिसते. सांधा लाल व टरटरून फुगतो; त्याला स्पर्शसुद्धा सहन होत नाही. थंडी भरून ताप येतो. अस्वस्थता, डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसतात. रक्तातील श्वेतकोशिकांचे (पांढऱ्या पेशींचे) प्रमाण दर घ. मिमी. मध्ये ५,००० च्या ऐवजी २०,००० पर्यंतही वाढते. ही तीव्र अवस्था वयाच्या चाळिसाव्या वर्षाच्या सुमारास प्रथम सुरू होते.

2. मध्यंतरीय : या अवस्थेमध्ये रक्तातील यूरिक अम्‍लाचे प्रमाण अधिक असले, तरी रोग्याला काहीही त्रास होत नाही. ही अवस्था कित्येक महिनेही टिकते.

3. चिरकारी : ही अवस्था वारंवार संधिशोथ (सांध्याची दाहयुक्त सूज) येऊन गेल्यानंतर दिसते. सांधे, संधिबंध (सांध्यांची हाडे एकत्र बांधणारी मजबूत तंतुमय फीत), सांध्यावरील आवरण, कानाच्या पाळी, कंडरा (स्‍नायू हडांना घट्ट बांधणारा तंतुमय पेशीसमूह) वगैरे ठिकाणी सोडियम यूरेट या लवणाच्या स्फटिकांचे निक्षेपण झाल्यामुळे (साका साचल्यामुळे) त्या जागी जाड गाठी उत्पन्न होतात. वारंवार सांधा सुजून राहिल्यामुळे त्या सांध्याचा हळूहळू नाश होऊन त्या भागाला वाकडेपणा व विरूपता येते आणि त्यामुळे कायम अपंगत्व येते.

चिकित्सा
रोगाची प्रवृत्ती आनुवंशिक असल्यामुळे तो असाध्य आहे; परंतु तीव्र प्रकारात कॉल्चिसीन हे औषध फार गुणकारी ठरलेले आहे. अलीकडे कॉर्टिसोन, एसीटीएच वगैरे औषधेही उपयुक्त ठरली आहेत. ठणका फार असेल तर कोडीन, अॅस्पिरीन वगैरे औषधांचा तात्पुरता उपयोग होतो. सांध्याची हालचाल होणार नाही अशा तऱ्हेचा आधार द्यावा, परंतु ठणका कमी झाल्यानंतरहालचाल करण्यास हरकत नाही.

मध्यंतरीय व चिरकारी प्रकारांत यूरिक अम्‍लाचे विसर्जन (शरीराबाहेर टाकणे) अधिक प्रमाणात होईल अशी खटपट करणे जरूर असते. त्याकरिता पुष्कळ पाणी पिऊन मूत्राचे प्रमाण वाढविणे, मूत्राची विक्रिया क्षारीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देणार्‍या पदार्थासारखी) ठेवण्यासाठी सोडियम सायट्रेटासारखी औषधे देणे हे उपाय करतात. सोडियम सॅलिसिलेटचाही या कामी उपयोग होतो.

अलीकडे प्रोबेनेसीड व त्यासारखी नवीन औषधे निघाली असून त्यांच्यामुळे यूरिक अम्‍लाचे विसर्जन जास्त प्रमाणात होते. ही औषधे नेहमीच कमीजास्त प्रमाणात घ्यावी लागतात. परंतु ती घेत असल्यास अॅस्पिरीन, सॅलिसिलेट इ. घेऊ नये.

न्यूक्लिइक अम्‍ल व प्युरीन यांचे प्रमाण अधिक असलेले मांसरस, मासे, यकृत, वृक्क वगैरे मांसाहार वर्ज्य करावा.

पशूंतील गाऊट
हा रोग सस्तन प्राण्यांपेक्षा पक्ष्यांमध्ये अधिक महत्त्वाचा आहे. रोगाच्या कारणमीमांसेबद्दल स्पष्ट उलगडा झालेला नसला, तरीपण कोंबडी व टर्की पक्ष्यांमधील कारणांबाबत थोडी माहिती उपलब्ध आहे. संधायक (सांध्यांचा) आणि अभ्यंतरीय अंत्यस्त्यांचा (आतील भागाचा – पोटाच्या पोकळीतील अवयवांचा) असे दोन प्रकारचे रोग आढळतात. केवळ प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यामुळे पहिल्या प्रकारचा रोग होतो, तर वृक्कात बिघाड होण्यामुळे दुसऱ्या प्रकारचा रोग होतो.

लक्षणे रोगग्रस्त पक्ष्यात भूक मंदावणे, अशक्तता आणि क्वचित पंख व पायांच्या सांध्यांवर सूज अशी लक्षणे असतात. मरणोत्तर तपासणीत सुजलेल्या सांध्यावर यूरेटाच्या निक्षेपणामुळे खडूसारखा पांढरा पदार्थ साठलेला दिसतो. पक्ष्यांमध्ये असा संधायक प्रकार कमी आढळतो. कुत्र्यामध्ये मात्र जास्त आढळतो. पक्ष्यांमध्ये अभ्यंतरीय अंत्यस्त्य प्रकार हे रोगवैशिष्ट्य आहे. लसी-कलेवरील (शरीराच्या पोकळ्यांच्या आतील भागावरील नाजुक लसयुक्त पडद्यावरील) पांढरा किंवा हिमासारखा ठिपका हे विशिष्ट लक्षण मानता येईल. मूत्रवाहिन्यांमध्ये यूरेट साठलेले आढळते व सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता त्याचा आकार अणकुचिदार स्फटिकासारखा दिसतो.
पाळीव प्राण्यामध्ये यूरिक अम्‍ल मूत्रातून शरीराबाहेर न पडता यूरिकेज या एंझाइमामुळे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थामुळे) अॅलॅनटॉइनामध्ये (ग्‍लायोक्झिलिक अम्‍लाच्या डाय-यूराइडामध्ये) रूपांतरित होते व मूत्राद्वारे बाहेर पडते. हा बदल प्रायः यकृतात घडून येतो.

Dr. Nitin Desai
Dr. Nitin Desai
BAMS, Ayurveda Panchakarma, 22 yrs, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune