Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
घटसर्प
#रोग तपशील#बॅक्टेरियाचे संक्रमण#सुजलेल्या टॉन्सिल्स



घटसर्प

घटसर्प हा नावाच्‍या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्‍य रोग असून त्‍यामुळे घसा व टॉन्सिल्‍स यांचा संसर्ग होऊन त्‍यावर तयार झालेल्‍या पडदयामुळे श्‍वासास अडथळा तसेच मृत्‍यु होऊ शकतो. लहान मुलांमध्ये घटसर्प नावाचा एक गंभीर आजार येऊ शकतो. या सांसर्गिक आजाराची सुरुवात बारीक ताप, अंगदुखी, घसादुखी या लक्षणांनी होते. यात घशात किंवा टॉन्सिलवर पांढरट करडा पडदा तयार होतो. तो काढण्याचा प्रयत्न केल्यास तिथून रक्तस्राव होतो. यात ब-याचदा घशात अवधाण येऊन गळा सुजतो, गिळण्याची क्रिया मंदावल्याने तोंडातून लाळ गळत राहते. या आजारात हृदय, मेंदू, इत्यादी अवयवांवर जंतूंच्या विषाचा परिणाम होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. सध्या तिहेरी लसटोचणी कार्यक्रमामुळे या घातक आजाराचे प्रमाण कमी झाले आहे.

एका विशिष्ट जंतूच्या संसर्गामुळे घसा, नाक वगैरे ठिकाणी होणाऱ्या सांसर्गिक रोगाला घटसर्प असे म्हणतात. या रोगामध्ये ग्रस्त भागावर पांढरट पिवळट रंगाचा चामड्यासारखा पापुद्रा वा साखा जमतो. येथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचा) कोथ (रक्त पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मृत्यू होणे) होऊन त्यावर रक्तातील फायब्रीन (रक्त गोठण्याचे वेळी फ्रायब्रिनोजेन या रक्तातील प्रथिनापासून तयार होणारे प्रथिन) जमा होऊन त्याच्यापासूनच हा पापुद्रा तयार होतो. हा रोग २ ते १८ वर्षांच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. प्रौढांत त्याचे प्रमाण कमी असते.

घटसर्पाच्या जंतूला कॉरिनिबॅक्टेरिटम डिप्थेरी असे नाव असून त्याचा शोध १८८३ मध्ये क्लेप यांनी लावला; त्याचे सविस्तार वर्णन लफ्लर यांनी केले म्हणून त्या जंतूला ‘क्लेप्स-लफ्लर’ जंतू असेही म्हणतात. हा जंतू दंडाकृती असून त्याची अनेक रूपे दिसतात. दंडाला कांही ठिकाणी बाक आल्यासारखा, तर काही ठिकाणी त्यात रंजक-कण साठल्यासारखे दिसतात. सूक्ष्मदर्शकाने तपासले असता त्यांची मांडणी चिनी अक्षरांसारखी दिसते. हा जंतू अचल व अबीजाणू (सुप्तावस्थेतील निरोधीरूप प्राप्त न होणारा) असून त्याचे शरीराबाहेर संवर्धन केले असता, तो द्राक्षशर्करेचे (ग्लुकोजाचे) किण्वन (आंबण्याची क्रिया) करू शकतो. परंतु उसाच्या साखरेचे किण्वन करू शकत नाही. ग्रॅम यांच्या रंजकपद्धतीने रंजक क्रिया केल्यास तो जंतू ‘ग्रॅम रंजकव्यक्त’ (ग्रॅम रंजकाने रंगणारा) दिसतो. या जंतूच्या संसर्गक्षमनेनुसार त्याचे तीव्र, मध्यम आणि सौम्य असे तीन प्रकार मानलेले आहेत.

घटसर्पाच्या जंतूंसारखेच दिसणारे आणि तसेच रंजकगुण असलेले आणखी एका प्रकाराचे जंतू कित्येक वेळा घशात व जखमांत आढळतात. परंतु ते संसर्गी नसतात. त्यांना घटसर्पाभ जंतू असे म्हणतात. या जंतूचे व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणार्यात रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करण्यासाठी त्यांची विविध शर्करांवरील किण्वन क्रिया तपासावी लागते. या जंतूंपासून रोग होत नसल्यामुळे असे व्यवच्छेदक निदान करण्याची फार जरूरी असते.

घटसर्पाचे जंतू ग्रस्त (रोगपीडित) भागांतच असतात; परंतु त्यांच्यापासून उत्पन्न होणारे बाह्यविष रक्तमार्गे सर्व शरीरभर पसरून लक्षणे आणि उपद्रव उत्पन्न करते. ह्या बाह्याविषाचा हृद्‌स्नायूंवर फार विपरीत परिणाम होत असल्यामुळे या रोगाची मारकशक्ती फार असते. तंत्रिकांवरही (मज्जांवरही) या विषाचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे स्नायुपक्षाघात होण्याचा संभव असतो. हे बाह्यविष शुद्ध स्वरूपात तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग घटसर्पाची सक्रिय प्रतिरक्षा (रोगापासून संरक्षण) उत्पन्न करण्यासाठी केला जातो.

रोग्याच्या खोकण्या-शिंकण्याबरोबर तुषार रूपाने हे जंतू बाहेर पहून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग करतात. तसेच दूषित हातरुमाल, कपडे, भांडी, टॉवेल वगैरे जिनसांमुळेही संसर्ग होऊ शकतो. रोग होऊन गेल्यानंतरही कित्येक दिवस हे जंतू रोग्याच्या नाकात व घशात असू शकतात. तसेच काही व्यक्तींना रोग झाला नसला, तरी त्यांच्या नाक-घशात हे जंतू असू शकतात. अशा व्यक्तींना ‘रोगावहक’ असे नाव असून त्यांच्यामुळेही रोग संसर्ग होऊ शकतो.

रोग लक्षणे
- नाकातून वाहाणे
- घशात वेदना
- ताप
- कसेतरी वाटणे
- घसा खवखवणे
- सौम्‍य ताप
- घशामध्‍ये राखडी रंगाचा पडदयाचा पट्टा किंवा पट्टे

- संसर्ग झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांच्या परिपाककालानंतर (रोगजतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोग लक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) लक्षणे सुरू होतात. घसा खवखवणे, दुखणे, नाक वाहणे या प्राथमिक लक्षणांनंतर अंगावर काटा येऊन ज्वर चढतो. कित्येक वेळा ज्वर फार नसला तरी रोग तीव्र व मारक असू शकतो. अतितीव्र घटसर्पात ज्वर मुळीच नसतो, उलट शक्तिपात होऊन रोगी पांढरा फटफटीत पडतो. त्याची चर्या भीतिग्रस्त असल्यासारखी असून ओठ निळसर दिसतात. रोगी अत्यंत अस्वस्थ असतो.

- ग्रस्त भागावर म्हणजे मुख्यतः घशातील गिलायूवर (टॉन्सिल्सवर) अथवा ग्रसनीच्या (घशाच्या) पश्चभित्तीवर वर वर्णन केलेला पापुद्रा वा साखा दिसू लागतो. हा पापुद्रा प्रथम पांढरट असून पुढे तो पिवळट लालसर होतो. पापुद्रा खरडून काढण्याचा प्रयत्न केल्यास तो नाकाच्या आतील श्लेष्मकला (बुळबुळीत पदार्थ स्रवणारे पातळ पटल) स्वरयंत्र आणि श्वासनालामध्येही (मुख्य श्वसनलिकेमध्येही) संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा तयार होतो. त्वचेवरील जखमा, नेत्रश्लेष्मकला, योनी आणि मणिच्छद (शिश्नातच्या सर्वांत पुढील भागावरील त्वचेचे आवरण) या जागीही क्वचितप्रसंगी घटसर्पाचा संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा दिसू लागतो.

- घशात सूज आल्यामुळे मानेतील गाठी व त्याभोवतीच्या ऊतकांना शोथ (दाहयुक्त सूज) आल्यामुळे सर्वच मान सुजून जाड दिसते. घशाच्या व स्वरयंत्राच्या शोथामुळे गिळणे, श्वास घेणे या क्रियांना फार अडथळा होतो, त्यामुळे दर श्वासागणिक घशातून चमत्कारिक आवाज येतो. श्वसनक्रिया नीट न चालल्यामुळे रक्ताला पुरेसा ऑक्सिजनपुरवठा मिळत नाही. त्यामुळे सर्वांगाला विशेषतः चेहऱ्याला निळसर छटा येते.

- श्वासाला एक तऱ्हेची दुर्गंधी येऊन नाकातून रक्तमिश्रित स्राव होऊ लागतो.

- श्वसनरोध आणि जंतूंचा हृद्‌स्नायूंवरील विपरीत परिणाम यांमुळे मृत्यू ओढवतो. तंत्रिकांवरील परिणामामुळे मृदुतालू, डोळ्याचे स्नायू, ग्रसनी, हातपाय व क्वचित शरीराचा अर्धा भाग या अनुक्रमाने पक्षाघात होऊ शकतो. असा पक्षाघात रोगाच्या ५-६ व्या दिवसापासून ४०-४५ व्या दिवसांपर्यंत होऊ शकतो. कित्येक वेळा मूळ दुखणे सौम्य असल्यामुळे पक्षाघात झाल्यानंतरच निदान होऊ शकते.

- अतितीव्र प्रकारांत त्वचेखाली आणि अंतस्त्यांत (छाती व पोटाच्या पोकळीतील इंद्रियांत) रक्तस्राव होतो.

निदान :

वर वर्णन केलेल्या लक्षणांवरून विशेषतः ग्रस्त भागावरील पापुद्यावरून निदान करणे फारसे कठीण नसते. त्या पापुद्यावर साठलेल्या स्रावामध्ये चिनी अक्षरांसारख्या दिसणाऱ्या जंतूंमुळे सूक्ष्मदर्शकाने निदान सुलभ होते. घटसर्पाभ जंतूंपासूनच निदान करणे कित्येक वेळा कठीण होते.
गिलायुशोथाच्या एका प्रकारात गिलायूवर बारीक बारीक पिवळट कण जमून ते एकत्र जमले, तर घटसर्पाच्या पापुद्यासारखे दिसतात. त्यामुळे त्याचे व्यवच्छेदक निदान काही वेळा कठीण होते परंतु सुक्ष्मदर्शकपरीक्षेने निदानास मदत होते.

चिकित्सा :

स्पष्ट निदानाची वाट न पाहता बाह्यविषप्रतिरोधी प्रतिविष (प्रतिरक्षक रक्तरस) शक्य तितक्या त्वरेने टोचणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जितक्या लवकर ही लस टोचली जाईल तितका रोगप्रतिहार होण्याचा संभव वाढतो. रोगाच्या तीव्रतेनुसार या प्रतिविषाची मात्रा द्यावी लागते. दिवसातून दोन तीन वेळाही प्रतिविष टोचणे जरूर पडते. इतर जंतूंचा संसर्ग न व्हावा म्हणून पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वापरतात.

रोग संसर्गी असल्यामुळे शक्यतर घटसर्पाच्या रोग्याला रुग्णालयात ठेवणे इष्ट असते.

श्वसनाला अडथळा उत्पन्न झाल्यास श्वासनालाला भोक पाडून त्यात नळी घालून श्वसन व्यवस्थित चालण्याची तरतूद करावी लागते. या शस्त्रक्रियेने एक मोठा धोका टळतो.

संपूर्ण विश्रांतीची अत्यंत जरूरी असते. हालचाल केली असता हृद्‌स्नायूंवर ताण पडून हृदय बंद पडण्याचा संभव असतो. रोग्याला पूर्णपणे निजवून ठेवून जरूर तर नाकातून नळी घालून अन्न द्यावे लागते.

रोगप्रसार
घटसर्पाचा जीवाणू जंतुसंसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तोंड, नाक व घसा या भागात वास्‍तव्‍य करतो. खोकला व शिंकेच्‍या माध्‍यमातून तो एका व्‍यक्‍तीकडून दुस-या व्‍यक्‍तीपर्यंत पसरतो.

रोगप्रतिबंधक उपाययोजना
बालपणाच्‍या सुरुवातीच्‍या काळात डीपीटी (घटसर्प, डांग्‍या, खोकला व धर्नुवात यांचे एकञीत ट्रीपल) लसीकरण ही प्रतिबंधाची सर्वांत प्रभावी पध्‍दत आहे. लसीकरणाच्‍या अभावी १४ वर्षापर्यंतची बालके घटसर्प रोगाच्‍या जंतुसंसर्गाला वारंवार संवेदनशील आहेत. लसीकरण कार्यक्रमाच्‍या वेळापञकानुसार डीपीटीचे लसीकरण देण्‍यात यावे.

प्रतिबंध
मुलांना घटसर्पा च्या विरोधात डीपीटीची लस.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune
Dr. Ravindra Borade
Dr. Ravindra Borade
BAMS, Allergist Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune