Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
चिपडलेले दात
#रोग तपशील#दातदुखी



जवळ जवळ सगळ्यांनाच माहित असेल की मोठ्या माणसांना ३२ दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी
सर्वात समोरचे चार पटाशीचे दात - मधले दोन सेण्ट्रल इनसायझर. त्या दोघांच्या बाजूचे दोन लॅटरल इनसायझर. त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे दोन सुळे - कनाईन, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन उपदाढा - प्रीमोलर. त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन दाढा - मोलर्स. आणि सर्वात शेवटची दाढ अक्कलदाढ - विस्डम टूथ - सगळ्यांनाच अक्कलदाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबडयात १४-१६ दात.

दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली, आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉ कडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहू. पेस्ट वापरून ब्रश करने महत्त्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट्मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा - उदा. कोलगेट अल्ट्रा सॉफ्ट (कोलगेट अल्ट्रा सॉफ्सारखा कोणताही ब्रश वापरलात तरी चालेल. मी कोलगेट कंपनीची जाहिरात करत नाही आहे.) तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागेपुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.

प्रत्येक दाताला ५ सर्फेस असतात. प्रत्येक सर्फेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रशिंग मुळे दाताचा ओठाकडचा आणि जीभेकडचा आणि दाढेचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सर्फेस स्वच्छ होतो. दोन दातांच्या मधले दोन्ही सर्फेस ब्रशने साफ होऊ शकत नाहीत. काहीजण त्याकरता टूथपीक वापरतात. पण त्यानेही पूर्ण स्वच्छता होत नाही. दोन दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. (केवळ फ्लॉसिंगचाच दोरा वापरावा. शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत). हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्राँग असतो. त्या दोर्‍याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सर्फेसला घासून बाहेर काढावा. लगेच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळा भराव्यात.

तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा (भारतातले माऊथवॉश वापरताना तरी) त्यानंतर १५ दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथवॉश वापरू नये.

न चुकता जिभलीने जीभ साफ करावी, कधी कधी जीभेवर चिकटलेले अन्नकण देखील तोंडात कीड वाढवू शकतात.

दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या - खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहाता दोन वेळा हे कमीच आहे. सकाळचा चाहा-दूध नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करने जीभ घासणे महत्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा.

असे केल्याने दातातील ९५% अन्नकण निघून जातात. राहिलेले ५% अन्नकण हिरडी आणि दात ह्यातल्या फटीत अडकून असतात. काही वेळा फ्लॉसिंगने दोन दाताम्च्या मधल्या फटीतल्या हिरडीतले अन्नकण निघून जातात परंतु दातावरची आणि मागची हिरडी आणि दात ह्यात अडकलेले अन्नकण साफ करायला दाताच्या डॉक्टरची मदतच घ्यावी लागते. दाताचे डॉक्टर ओरल प्रोफायलॅक्सिस म्हणजेच स्केलिंग म्हणजेच इंस्ट्रुमेंटस वापरून दाताची स्वच्छता करतात. काही डॉ हॅण्ड इंस्ट्रुमेंटस वापरून स्केलिंग करतात काही डॉ. मशिन वापरून करतात. अर्थात मशिनने केलेले स्केलिंग जास्त इफेक्टिव्ह असते.
स्केलिंग केल्यामुळे दात आणि हिरड्या ह्यात अडकलेले अन्नकण केवळ सफ होत नाहीत तर चहा सिगरेट ह्याने पडलेले डागही कमी होतात. ह्यामुळे हिरडीचे आणि हिरड्यांच्या आतील हाडाचे निरोगी पण टिकते आणि आयुष्य वाढते. ह्याशिवाय दातात अन्नकण अडकल्याने आपल्याला न कळलेली दाताला लागलेली कीडदेखील लगेच कळून येते आणि त्यावर ट्रीटमेण्ट करता येते.

ब्रशिंग, फ्लॉसिंग, स्केलिंग बद्दल काही समज आपल्यात असतात.
१. ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात - असे अजिबात नाही. उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो. ज्यामुले दातांना सेन्सिटिव्हिटि चा त्रास होऊ शकतो. दात हलक्या हाताने घासावेत.

२. दात घासायला खूप वेळ लागतो - वर दिलेल्या टेक्निकने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात.

३. फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात. - फ्लॉसचा दोरा खूप बारिक असतो त्याच्यामुळे फटी अजिबात वाढत नाहीत. दात सरकून फटी वाढायला दातांवर कायम असा खूप जोर असावा लागतो. ऑर्थोच्या ट्रीट्मेण्ट मध्ये असतो तसा

४. जीभ घासणे, फ्लॉसिंग करने हे फक्त अ‍ॅडल्टसनी करायचे असते - वयाच्या चार पाच वर्षापासून मुलांना जीभ घासण्याची, फ्लॉसिंगची सवय लावावी.

५. स्केलिंगने दातात फटी वाढतात - अजिबात नाही. स्केलिंगमुळे दातात फटी झाल्यासारखे वाटत असेल तर - दातात मुळातच फटी होत्या. अन्नकण दातात अडकून त्या फटी बुजल्या होत्या. स्केलिंगनंतर अन्नकण निघून गेल्याने त्या फटी दिसायला लागल्या आहेत एवढेच. फार मोठ्या मोठ्या फटी नसतील तर त्यावर ट्रीटमेण्टची गरज नसते. तरीही तुम्हाला त्या फटी नको असतील तर कॄपया दात काढून तिथे दुसरा कृत्रिम दात बसवू नका. दाताचे रूट कॅनाल करून / न करून दातावर कॅप बसवू नका. फटी कमी करण्यासाठी वेगळे उपचार असतात. त्याकरता नैसर्गिक दात काढून तिथे खोटा दात बसवणे, कॅप बसवणे हे अयोग्य आहे.

६. स्केलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात - स्केलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरे नाही. ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच काळ अन्नकण साठून त्याचा दगद झालेला असतो, त्यांचे दात स्केलिम्ग केल्यावर हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांचा दगड काढला जातो. ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाताखालचे हाडदेखील झिजायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अन्नकणांचा दगड काढणे मस्ट आहे. अशा अडकलेल्या अन्नकणांमुळे दाताम्खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात. जर व्यवस्थित काळजी घेतली- नीट ब्रशिंग केले, वरचे वर - वर्षातून एक / दोन वेळा स्केलिंग करून घेतल्यास हिरड्या, दाताखालचे हाड कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाहीत.

७. दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये.- मुळात दातातून रक्त येत नाही, रक्त हिरडीतून येते. हिरड्या कमकुमत झाल्याचे ते लक्षण आहे, कारण एकच दाताची स्वच्छता नीट झालेली नाही (किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशिंग केले.) हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे. पायोरिया ह्या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. स्केलिंग करून घ्यावे. स्केलिंग करूनही आठ दिवसात हिरड्यतून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो. ही फारशी दुखवणारी ट्रीटमेण्ट नाही. ह्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात. हिरड्या साफ करून घेतल्याशिवाय दातावर कॅप लावून घेऊ नये किंवा ऑर्थो ट्रीटमेंटही करू नये. हिरड्या आनखी कमकुवत होतील आणि दात पडतील.

८. पेस्ट एइवजी दंतमंजन वापरले तरी चालते - दंतमंजन किती वारीक आहे ते पाहावे. जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते.

९. दात सेन्सिटिव्ह झाले की सेन्सिटिव्ह टूथपेस्ट स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते. - डेंटिस्टला ला विचारूनच मग सेन्सिटिव्ह टूथेपेस्ट वापरावी. किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे.

१०. दात दुखत असेल तर एखादी पेनकिलर / अ‍ॅण्टिबायोटिक घेऊन काम चालते - दात दुखतो आहे ह्याचा अर्थ कीड मुळापर्यंत गेली आहे. ती कीड रूट कॅनाल प्रोसिजरनेच काढावी लागते. पेनकिलर घेऊन दूख दाबण्यात अर्थ नाही. ती कीड आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या दातातही पसरू शकते. पेनकिलर अँटिबायोटिक स्वत:च्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये. अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे. पेन्किलर आणि अँटिबायोटिक तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला अ‍ॅसिडिटिचा त्रास आहे की नाही, कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग डॉ प्रीस्क्राईब करतात. शिवाय अँटिबायोटिक हे सांगितले तितके दिवस घेतली गेलीच पाहिजे नाहीतर मेडिसिन रेझिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला लागू पडणार नाही अशीही वेळ येऊ शकते.

११. दात दुखण्यावर दात काढणे हाच उपाय आहे, दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो. दात काढला तरी हरकत नाही इम्प्लाण्ट करून नवीन दात बसवता येतो. - आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल, तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे - पोस्ट अँड कोअर, कॅप करणे हे उपाय आहेत. केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही.

दात व हिरड्या साफ करून घेणे ही दंतस्वच्छतेची शेवटची ट्रीटमेण्ट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे. हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील.

Dr. Ramesh Ranka
Dr. Ramesh Ranka
MS - Allopathy, Orthopaedics, 25 yrs, Pune
Dr. Sujata Bauskar
Dr. Sujata Bauskar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 23 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Dr. Amar S. Shete
Dr. Amar S. Shete
BAMS, Family Physician, Pune