Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

पालकांनो लक्ष द्या! तुम्ही तुमच्या पाल्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह जास्त वेळ घालवू दिल्यास प्रौढावस्थेत ते निरोगी राहण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. हा अभ्यास सायकोलॉजिकल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी मुले बालपणात आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करतात त्यांना तिशीत रक्तदाबाचा त्रास कमी होत असल्याचे आढळून आले आहे.

बालपणातील सामाजिक सहवासाचा काही प्रमाणातील संरक्षणात्मक प्रभाव प्रौढावस्थेत आपल्या आरोग्यावर होतो, असे अमेरिकेतील टेक्सस टेक विद्यापीठाच्या जेनी कंडिफ यांनी सांगितले. यापूर्वीच्या अभ्यासात प्रौढ व्यक्तीच्या सामाजिक आयुष्याचा, जवळच्या नाते संबंधांचा दय़ रोगांशी संबंधित असल्याचे आढळले होते. आरोग्यावर अशाच प्रकारचा परिणाम बालपणात देखील आढळतो का नाही यावर संशोधकांनी अभ्यास केला. यासाठी संशोधकांनी २६७ व्यक्तींच्या माहितीची चाचणी केली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांनी सहा वर्षांच्या वयापासून १६ वर्षांच्या वयापर्यंत मित्रपरिवारासोबत दर आठवडय़ाला सरासरी किती वेळ घालवला हे सांगितले. या अभ्यासात व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाबाबतच्या माहितीचादेखील समावेश आहे. पौंगडावस्थेत आणि बालपणात जे लोक मित्रपरिवारसह जास्त वेळ घालवतात त्यांना मध्यम वयात निरोगी रक्तदाब असतो असे या विश्लेषणात आढळले आहे.

ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या चंदेरी रंगाच्या वेष्टनांचा अन्नपदार्थ शिजवताना उपयोग करणे वा अन्नपदार्थ त्यामध्ये बांधून देणे हे दोन, तीन दशकांपूर्वी उच्चभ्रू-श्रीमंत वर्गामध्ये सर्रास होते. कारण ते पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मग उच्च मध्यम वर्ग, पुढे मध्यम आणि कनिष्ठ वर्गातले लोक सुद्धा आजकाल या ॲल्युमिनियम फॉईल्सचा नित्य उपयोग उपयोग करु लागले आहेत. कोण आनंद होतो, घरातल्या स्त्रियांना, त्या आपल्या नवर्‍याला वा मुलामुलीला त्यांच्या डब्यातले जेवण गरम राहावे म्हणून ॲल्युमिनियमच्या चकचकीत-चंदेरी वेष्टनामध्ये बांधून देतात तेव्हा. मात्र याचा आरोग्याला धोका संभवतो, याची यांना कल्पना असते काय?

ॲल्युमिनियमच्या संपर्कात येणार्‍यांना कॅन्सर, दमा, हाडांवर विपरित परिणाम होऊन हाडे कमजोर होणे व चेताकोषांवर विपरित परिणाम होऊन स्मृतिभ्रंशाचा धोका, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, या विकृती संभवतात. मेंदुमधील चेताकोषांमध्ये ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अडकल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंशाशी( अल्झायमर्सशी) असण्याची शक्यता आहे. एकंदरच मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याशिवाय हाडांना सुदृढ ठेवणार्‍या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात, ज्यामुळे एकीकडे रक्तामध्ये नको तितके कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमी, परिणामी हाडे कमजोर अशी विचित्र परिस्थिती ओढवते.

या सर्व संशोधनाला विरोध करणारे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, ज्यांच्या मते ‘अल्प मात्रेमध्ये शरीरात जाणारे ॲल्युमिनियम बाहेर फेकणे शरीराला शक्य आहे व अत्याधिक मात्रेमध्येच वरील धोके संभवतात’. त्यामुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
हे तर नक्की आहे की ॲल्युमिनियम फॉईल्स कधीकाळी महाग होत्या आणि आता स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. सहज उपलब्धी आणि स्वच्छतेसाठी अनुकूल या निकषावर समाजाला ॲल्युमिनियम फॉईल्स उपयुक्त वाटत असले तरी पाश्चात्त्यांच्या या गोष्टी स्वस्त आणि मुबलक उपलब्ध झाल्या की मनात शंका उभी राहते. महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणार्‍या संशोधकांच्या मतांकडेसुद्धा दुर्लक्ष करता येत नाही. अशा वेळी तारतम्याने नेमकी काय काळजी घ्यायची ते बघू.

* अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक.
* गरम अन्नपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बांधून देणे सुद्धा कटाक्षाने टाळावे.
* मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, आंबट फळे, वा आंबट पदार्थ शिजवताना तर ॲल्युमिनियम फॉईल मुळीच वापरु नये, असे संशॊधक सांगतात. आपले जेवण तर मसाल्याशिवाय तयार होत नाही.
* रस्सायुक्त भाज्या, कालवण, सांबार, तळलेले पदार्थ, लोणचं, पापड तसेच अन्य तेलतूपयुक्त अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी यांचा वापर करु नये.
* अम्लीय( ॲसिडीक) पदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून देण्याची चूक कधीही करु नये.
* बिर्याणी वगैरे तयार करताना ॲल्युमिनियम फॉईलचे आवरण त्यावर बांधणे धोक्याचे होऊ शकते.
* मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल्सचा उपयोग करु नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो, तरीही अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* सॅन्डविचसारखे गार पदार्थ गुंडाळायला हरकत नाही असे म्हणतात, पण विषाची परिक्षा घ्यायचीच कशाला?

साधारण दोन-एक दशकांपूर्वी ’नॉन-स्टीक’या विशिष्ट प्रकारचे तवे उपलब्ध झाले. दिसायला आकर्षक, वापरण्यास-धुण्यास सोपे असे हे तवे गृहिणींना खूप आवडले.त्यानंतर नॉन-स्टीक पद्धतीची भांडी बाजारात आली. उपरोक्त फायद्यांबरोबरच अन्न शिजवताना कमी तेल लागणे व इंधनाची बचत होणे हे फायदे ह्या नॉन-स्टीक भांड्यांचे होते. ही भांडीसुद्धा आरंभी खूप महाग होती. त्यामुळे नॉन-स्टीक भांडी वापरणे, ही काही काळ तरी श्रीमंतांची मिजास होती. एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीने नॉन-स्टीक भांडी घरी आणली की तिची शेजार-पाजारच्या स्त्रियांमध्ये कॉलर टाईट होत असे, यावरुन त्यांच्या किमतीचा अंदाज यावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ही नॉन-स्टीक भांडी स्वस्त झाली. इतकी स्वस्त की एका भांड्यावर दुसरे भांडे मोफत मिळू लागले. मुळात पाश्चात्त्यांकडून आलेल्या वस्तू स्वस्त झाल्या की यामागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका येऊ लागते. काय आहे, या नॉन-स्टीक भांड्यांमागचे गौडबंगाल?

नॉन-स्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो, ते म्हणजे परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड(पीएफओए). पीएफओए हे आरोग्यासाठी घातक असे केमिकल आहे. वास्तवात नॉन-स्टीक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्हीं या नॉन-स्टीक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी म्हणून अति-उष्णता देता व जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फरनहाईट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते. दुर्दैवाने हे विषारी घटक नॉन-स्टिक भांड्यांच्या प्रेमात पडलेल्या घरातल्या गृहिणीच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिरतात. नॉन-स्टिकच्या केमिकल्समधून निघणारे विषारी घटक कोणत्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात?

पीएफओए चे आरोग्याला घातक गुणधर्म पुढीलप्रमाणे – कार्सिनोजेनिक अर्थात कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, गर्भिणीने शोषल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकते; जसे जन्मतः बाळाचा आकार तुलनेने लहान असणे-नंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशिर होणे-वगैरे, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम करू शकते, थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बाधा आणून थायरॉइड हार्मोनच्या स्रवणामध्ये बिघाड निर्माण करू शकते, रक्तामधील चरबीचा चयापचय बिघडवू शकते(जे पुढे जाऊन अनेक आजारांना कारणीभूत होऊ शकते). उंदरांमध्ये केलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे लिव्हर(यकृत), पॅन्क्रीआ(स्वादुपिंड) किंवा टेस्टीज(वृषण) या अवयवांच्या कॅन्सरला कारणीभूत होऊ शकते, माशांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कारणीभूत होते: अर्थात शरीरामध्ये ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढवून रक्तामध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढवते (फ्री-रॅडिकल्स हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक-डायबिटीस,कॅन्सर एवढंच नव्हे तर वार्धक्यालाही आमंत्रण देतात), स्त्री-उंदरांवर केलेल्या एका संशोधनामध्ये पीएफओए रक्तामधील इन्शुलिनचे प्रमाण वाढवते. (आता लक्षात आले असेल तुमच्या, नॉन-स्टिक भांडी इतकी स्वस्तात किंवा अन्य खरेदीवर मोफत सुद्धा का मिळू लागली ते!)

हे वाचल्यावर मनात प्रश्न उभा राहतो की आपण एवढ्या उष्णतेपर्यंत नॉन-स्टिक भांडी तापवतो का? याचे ठाम उत्तर देणे कठीण आहे. मात्र कडधान्य-मांस यांसारख्या कठीण कवच असलेल्या पदार्थांना शिजवण्यास वेळ लागतो; त्यासाठी अधिक उष्णता लागते. खाद्य-तेल शिजवण्यासही अधिक उष्णता लागते, मात्र २६० हून कमी रिफाईन्ड करडईचे तेल तापवण्यास मात्र २६० अंश सेल्सिअसहून अधिक उष्णता लागते. अधिक वेळ अन्न शिजवण्याची सवय असणा-या गृहिणी नॉन-स्टिक भांडे अधिक उष्णतेपर्यंत तापवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण २ ते ५ मिनिटे तापवलेले नॉनस्टिक भांडेसुद्धा विषारी वायू फेकायला सुरुवात करते, असा संशोधकांचा अंदाज आहे. रिकामे भांडे नुसतेच तापवणेही घातक होऊ शकते. २०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्यावर पीएफओमधील विषारी वायुंमुळे पक्षी मरतात, असे संशोधन सांगते. मानवास होणा-या एका फ्लूच्या लक्षणांमागे पीएफओए कारणीभूत असावा, अशीही शास्त्रद्न्यांना शंका आहे.

वाचकहो, भाज्या शिजवण्यासाठी शरीराला लोह पुरवणार्‍या लोखंडाच्या कढया, आपल्या कुंभारांना अर्थार्जन करुन देणारे मातीचे तवे ( मातीचे पॅन्ससुद्धा आता उपलब्ध आहेत), किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय स्वयंपाकासाठी वापरणे योग्य होईल. “आमची नॉन-स्टिक भांडी पीएफओए पासून बनवलेली नाहीत”,असा प्रचार काही निर्माते आता करताहेत. जे निर्माते या केमिकलचा वापर करत नसतील, त्यांना हा लेख लागू होत नाही. पण यापूर्वी आपण वापरलेली (किंवा आजही वापरत असलेली) नॉन स्टीक भांडी या घातक केमिकल्सपासून बनवलेली होती वा आहेत, याचा हा अप्रत्यक्ष पुरावा नाही का!कोणतीही स्वयंपाकोपयोगी खरेदी करताना त्यामधून नेमकी कोणती केमिकल्स शरीरामध्ये जाणार आहेत, याची माहिती घेण्याची सवय लावा वाचकहो!

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झाला आहे..भर दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडूच नये अशा ऊन्हाच्या झळा मारत असतात. कालपासून तर सूर्य विषुववृत्तावर पृथ्वीच्या माथ्यावर असल्याने थेट सरळ किरणे पडत आहेत, ज्यामुळे कधी नव्हे असे ४० अंशाहून अधिक तापमान मुंबईमध्ये आहे.या ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणे, हे निसर्गाच्या नियमाला धरुनच म्हटले पाहिजे. त्यातही ज्यांना उन्हाचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो अशा मंडळींना, ज्यांना ऊन बाधते, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना आणि कडक उन्हाळा असूनही उष्ण गुणांचा आहार घेणार्‍यांना उन्हाळा फार बाधतो. त्यामुळे विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. जसे- मूत्रविसर्जन वा मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणेअंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून वा गुदावाटे रक्त पडणे वगैरे. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसताना घरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे ’सब्जा’.

सब्जा हे तुळशीसारखेच एक लहानसे क्षुप असते, जे सर्वत्र उगवते. त्यातही पंजाब राज्यामध्ये सब्जाची रोपटी अधिक पाहायला मिळतात. या सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.

सब्जाचे बी हे चवीला गोड असून शरीरातला थंडावा वाढवून ऊष्मा कमी करण्याचा अलौकिक गुण त्यांमध्ये आहे. सब्जा बीमुळे मूत्र सहज सुटते व मूत्रविसर्जन करताना होणारा दाह व वेदना दूर होते. या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचा (युरिन इन्फेक्शनचा) त्रास होतो. अशा लोकांनी सब्जाचे बी सकाळ-सायंकाळ घेतल्यास चांगला आराम पडतो. विशेष म्हणजे वरील आजार झाल्यानंतर औषध घेतात, तसे न घेता त्या तक्रारी होऊच नयेत म्हणून घेण्यासारखे सब्जा हे सुरक्षित औषध आहे. सब्जाचा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचा गुण तर इतका प्रभावी आहे की, दिवसातून तीन-चार वेळा सब्जा घेतल्यास शरीरामध्ये एसी ठेवल्यासारखा परिणाम होतो. या तळपत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येणार्‍या पाहुण्याचे स्वागत सब्जा बी देऊनच केले पाहिजे…म्हणजे येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला सरबतही मिळेल आणि औषधही !

अन्नपदार्थातील काही पोषकद्रव्यांमुळे स्किझोफ्रेनियासारख्या आजाराची मानसिक लक्षणे कमी होत असल्याचा दावा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आला आहे.

मात्र उपचाराच्या सुरुवातीला योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये, मानसिक आजार असलेल्या तरुणाला अधिक प्रमाणात पूरक पोषक आहार दिल्यास त्यांच्यावर प्रभावी उपचार होत असल्याचे आढळून आले.

संशोधकांनी यासाठी स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झालेल्या ४५७ तरुणांची विविध पातळीवर तपासणी केली. त्यांना पूरक पोषकद्रव्ये असलेला आहार विविध टप्प्यांवर देण्यात आला. यात देण्यात आलेला विशिष्ट पूरक पोषण आहार हा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करत असल्याचे संशोधकांना दिसून आले.

मानसिक आजाराच्या उपचारांमध्ये पूरक पोषण आहार पुरवणे हे उपहासाने घेतले जाते, असे जोसेफ फर्थ यांनी सांगितले.

मानसिक आजाराच्या सुरुवातीला पुरेसा पोषकद्रव्ये असलेला आहार घेणे फायदेशीर आहे.

यासाठी आहे त्या उपचार पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. मात्र अतिरिक्त उपचार म्हणून काही रुग्णांसाठीही उपयुक्त असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Harshada Giri
Dr. Harshada Giri
BDS, Dental Surgeon, 13 yrs, Pune
Dr. Ramit Kamate
Dr. Ramit Kamate
MBBS, Infertility Specialist In Vitro Fertilization Specialist, 1 yrs, Pune
Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Hellodox
x