Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Blood Pressure :
Blood Pressure is a silent killer. High blood pressure can quietly damage your body before actual symptoms get visible. Left uncontrolled, you may end up with disability, poor quality of life or even fatal heart attack. Read the symptoms & signs for this silent killer.



हायपोटेन्शन या व्याधीला सर्वसाधारणपणे लो ब्लडप्रेशर असे म्हणतात. या व्याधीमध्ये शरीरातील धमन्यांमध्ये रक्तदाब कमी होतो. काही वेळा हा रक्तदाब इतका कमी होतो, की रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गरगरणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे असे प्रकारही घडू शकतात. १३०/९० हे रक्तदाबाचे रीडिंग आता नॉर्मल समजले जाते. यापैकी जो आकडा जास्त आहे, तो ‘सिस्टॉलिक प्रेशर’दर्शवितो. हे प्रेशर, हृदय धमन्यांमध्ये रक्त पंप करते आणि धमन्यांमध्ये रक्त भरते तेव्हाचे असते. जो आकडा कमी आहे, तो ‘डायस्टॉलिक प्रेशर’दर्शवितो. हृदय धमन्यांमध्ये रक्त पंप करताना विश्रांती घेते. हृदयाच्या दोन ठोक्यांमधील अंतर हा हृदयाचा विश्रांतीचा काळ असतो. ह्या विश्रांतीदरम्यान धमन्यांमध्ये रक्त पंप केले जात नाही. तेव्हाचे धमन्यांमधील प्रेशर म्हणजे डायस्टॉलिक प्रेशर. ह्या दोन्ही प्रेशर्स पैकी कोणतेही प्रेशर कमी किंवा जास्त असेल, तर रक्तदाबाचा विकार उद्भवू शकतो.

जर ब्लडप्रेशर कमी राहत असेल, पण त्याची विशेष लक्षणे जाणवत नसतील, तर याची खूप जास्त काळजी करण्याची आवश्यकता बहुतेक वेळा नसते. पण रक्तदाब कमी असल्याने हृदयाला किंवा मेंदूला, अथवा इतर अवयवांना कमी रक्त पुरवठा होत असेल, तर मात्र त्वरित उपाययोजनेची आवश्यकता असते. आपले ब्लड प्रेशर दिवसभरात निरनिराळे राहते. ह्यातील चढ-उतार हे निरनिराळ्या कारणांमुळे होत असतात. आपली दिवसभरातील हालचाल, शारीरिक आरोग्य, आपण घेत असलेली औषधे, खानपानाच्या सवयी, या आणि इतर काही गोष्टींवर आपले ब्लडप्रेशर अवलंबून असते. आपण झोपेच्या स्थितीमध्ये असताना ब्लडप्रेशर कमी असते, तर आपण उठल्यावर ब्लडप्रेशरमध्ये एकदम वाढ होते.

ब्लड प्रेशर अचानक कमी होण्याची काही कारणे आहेत. शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता असली, तर रक्तदाब कमी होतो, व थकवा, अशक्तपणा, गरगरणे अशी लक्षणे जाणवू शकतात. हृदयासंबंधी काही विकार असले, तरीही रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, हृदयाच्या व्हाल्व मध्ये अडथळे निर्माण होणे या तक्रारी उद्भवू शकतात. एखादी महिला गर्भारशी असेल, तरी ही काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो, पण ही स्थिती कायम टिकून रहात नाही. बाळंतपण झाल्यानंतर त्या स्त्रीचे ब्लडप्रेशर पुनश्च नॉर्मल होते.

एखाद्या मोठ्या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे खूप रक्त गेले असेल किंवा शरीराच्या आतमध्ये जखमा होऊन रक्तस्राव झाला असेल, तर रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच, थायरॉइड किंवा डायबेटिस या व्याधींमध्ये ब्लडप्रेशर कमी जास्त होऊ शकते. शरीरामध्ये बी१२ जीवनसत्वाची कमी असल्यास रक्तदाब कमी असू शकतो. हे जीवनसत्व लाल रक्तकोशिका तयार करण्यास मदत करीत असते. त्यामुळे शरीरामध्ये ह्या जीवनसत्वाची कमतरता असेल, तर रक्तकोशिका कमी प्रमाणात तयार होतात, आणि परिणामी, रक्तदाब कमी होतो. जर अचानक एखादी अॅलर्जी उद्भविली, तर त्यामुळे ही रक्तदाब कमी होऊ शकतो. आहारामध्ये मिठाचे प्रमाण अतिशय कमी असल्यासही लो ब्लडप्रेशरचा त्रास जाणवू शकतो.

जर काही कारणाने ब्लड प्रेशर कमी झाले, तर चक्कर येणे, शुद्ध हरपणे, मळमळणे, चित्त एकाग्र न होणे, थकवा जाणविणे, धूसर दिसणे, गरगरणे अशी लक्षणे जाणवू शकतात. जर रक्तदाब अचानक खूपच कमी झाला, तर पल्स रेट अचानक वाढणे, अशक्तपणा येणे, वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत आपण कुठे आहोत याचे भान हरपणे, चेहरा पांढरा पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. अश्यावेळी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

लो ब्लड प्रेशर टाळायचे असल्यास काही सवयींचा अवलंब करणे अगत्याचे आहे. आपल्या आहारामध्ये द्रव पदार्थांचा भरपूर समावेश करावा. मद्यपानावर नियंत्रण ठेवावे. जर उन्हाळयाचे दिवस असतील, किंवा ताप आला असेल, तर भरपूर पाणी प्यावे. कोणत्याही प्रकारच्या व्याधीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, स्वतःच्या मनाप्रमाणे औषधोपचार करू नयेत. शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत राहण्याकरिता नियमित व्यायाम करावा. झोपेतून उठल्यानंतर काही क्षण अंथरुणातच बसावे आणि मग सावकाश उठून उभे राहावे. एकदम ताडकन उठून चालणे सुरु करु नये. खाण्यामध्ये मीठाचे प्रमाण योग्य राखावे. रात्रीच्या वेळी कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेला आहार टाळावा. जेवणानंतर काही मिनिटे विश्रांती घ्यावी.

रक्तदाब म्हटलं की आपल्याला उच्च रक्तदाब, त्याची लक्षणे, गंभीरता डोक्यात येते. पण हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर ही समस्या देखील तितकीच गंभीर आहे. आजकाल या त्रासाने अनेकजण ग्रासले आहेत. आणि यावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार देखील उच्च रक्तदाबइतकाच गंभीर होऊ शकतो. अचानक रक्तदाब कमी झाल्यास चक्कर येते, थकवा जाणवतो. आणि हे काळजी करण्यासारखे आहे. कारण मेंदूला रक्ताचा योग्य पुरवठा झाला नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. कार्डिओलॉजी, एफएमआरआय चे असोसिएट डायरेक्टर आणि युनिट हेड डॉ. संजीव चौधरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधांव्यतिरिक्त इतर काही मार्ग आहेत ज्यामुळे आपण भविष्यात होणाऱ्या लो बीपी ला प्रतिबंध करू शकतो.

भरपूर पाणी प्या: ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे रक्तदाबात होणारा क्षणिक बदल (रक्तदाब कमी होतो) जो सामान्यपणे डिहायड्रेशनमुळे होतो. यावर झटपट आणि खात्रीचा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे ब्लड वोल्युम वाढते आणि रक्तदाब काही मिनिटातच सुरळीत होतो. दिवसातून ८ ग्लास पाणी अवश्य प्या.

काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खा: एका वेळी भरपूर खाल्याने पचनसंस्थेवर एकाच वेळी अधिक ताण येईल. त्यामुळे रक्तप्रवाह देखील पचनसंस्थेच्या दिशेने वाहू लागेल. आणि शरीराच्या इतर भागातील रक्तप्रवाह कमी होईल. याचा परिणाम म्हणजे रक्तदाब कमी होईल. त्याऐवजी तुम्ही जर काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खाल्लं तर पचनसंस्थेवर एकाच वेळी ताण येणार नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत राहील. पुवी-राजसिंहम आणि माथीस सीजे यांच्या अहवालानुसार रक्तदाब अचानक कमी होऊ नये म्हणून थोडं थोडं खाणं गरजेचं आहे.

डोकं थोडं वर ठेवून पडून रहा: अनेकदा आपण आराम करत असताना रक्तदाब कमी असतो. त्यामुळे डोकं थोडं वर च्या अँगलला ठेवून पडून रहा. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर रक्तदाबात अचानक होणारा बदल टाळता येईल. काळजीपूर्वक उभे रहा: खूप वेळ बसल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर पटकन उठून उभे राहू नका. त्यामुळे डोळ्यापुढे अंधारी येऊ शकते. आणि चक्कर येऊन बेशुद्ध होण्याची भीती असते.

नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन ला प्रतिबंध होतो. व्यायामामुळे रक्तप्रवाह एकाच भागात न होता संपूर्ण शरीरभर रक्ताचा व्यवस्थित संचार होतो. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग याचबरोबर आयसोटॉनिक एक्ससरसाईझ म्हणजेच लाईट वेट लिफ्टिंग असे व्यायामप्रकार तुम्ही करू शकता.

मिठाचा योग्य वापर करा: असे सांगितले जाते की, दिवसाला १०-२०ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे. पण तुमच्यासाठी योग्य प्रमाण काय असेल हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर पालक, केळी यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. कारण आहारातून मीठ अधिक घेतल्याने पोटॅशियमचे प्रमाण कमी होईल.



उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाचे प्रमाण सध्या फार झपाट्याने वाढत आहे. उच्च रक्तदाब म्हणजे हृदय, किडनी, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांच्या आजारास निमंत्रण आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करावयाचे असेल तर त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. रक्तदाब म्हणजे शरीरातील धमण्यांच्या भिंतींवर रक्ताने निर्माण केलेला दाब होय. हा दाब दोन प्रकारे मोजला जातो सिस्टोलिक प्रेशर (वरचा) - हृदय आंकुचित होऊन धमण्यांमध्ये रक्त सोडताना निर्माण झालेला दाब होय. हा साधारणतः १२० मिमी पारापेक्षा कमी असावा

डायस्टोलिक प्रेशर (खालचा ) - हृदय प्रसारण पावतेवेळी धमन्यांमध्ये जो दाब तयार होतो, हा सामान्यतः ८० मिमी पारापेक्षा कमी असावा. सर्वसाधारण रक्तदाब १२०/८० मिमी असावा. त्यापेक्षा जास्त दाब झाल्यास आपण त्यास उच्च रक्तदाब असे म्हणतो. प्रिहायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाची पूर्वीची अवस्था असेल तर अशा व्यक्तीस रक्तदाब होण्याचा धोका असतो.

उच्च रक्तदाबाची कारणे

- इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन : सरासरी ९० टक्के ते ९५ टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबासाठी कुठलेही कारण आढळत नाही, यालाच इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतात.

- सेकंडरी हायपरटेन्शन : रुग्णास इतर व्याधींचा परिणाम म्हणून उच्च रक्तदाब असल्यास त्यास सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. जसे किडनीचे आजार, अंत:स्त्रावी ग्रंथीचे आजार इत्यादी.

- उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरणारे घटक

जीवनशैली : सद्यस्थिती पाहता कामाचे स्वरूप प्रामुख्याने बैठे आहेच आणि अति तणावयुक्तही आहे. त्यामुळे तरुण वयातच उच्च रक्तदाबासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

- अतिमद्यपान

- धुम्रपान

- तंबाखू

व्यायामाचा अभाव : रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करणे तर दूरच राहिले परंतु दैनंदिन कामातही दुचाकी व चारचाकीचा वापर वाढू लागल्याने आपण स्थूलता, उच्च रक्तदाब यासारख्या अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत.

स्थूलता : उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णातील ६०% रुग्ण स्थूल असतात. ही स्थूलता कमी झाल्यास उच्च रक्तदाब ही कमी होतो.

चुकीच्या आहार सवयी : आपल्या आहारात सकस अन्न पदार्थांपेक्षा पिझ्झा बर्गर अशी बेकरी उत्पादने, तसेच बराच काळ साठवलेले अन्न यांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे. तसेच अधिक मीठयुक्त पदार्थ उदा. चिप्स, कुरकुरे जास्त प्रमाणात घेतले जातात. या चुकीच्या आहारसवयीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

अनुवांशिकता : आपल्या आई वडिलांना उच्च रक्तदाब असल्यास आपणासही उच्च रक्तदाब होण्याची शक्यता ३०% ते ४०% ने वाढते.

उच्च रक्तदाबाची लक्षणे

- ९० टक्के रुग्णांत उच्च रक्तदाबाचे कुठलेही लक्षण आढळून येत नाही. बरीच वर्षे आपल्या शरीरात कुठलेही लक्षण नसतांना देखील उच्च रक्तदाब असू शकतो व त्यामुळे इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो, म्हणूनच या आजारास ‘सायलेंट किलर’ म्हणतात.

- डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत धडधड होणे, चालताना दम लागणे ही उच्चरक्तदाबाची लक्षणे असू शकतात. अशी काही लक्षणे आढळल्यास आपल्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी.

- व्हाईटकोट हायपरटेंशन : काही वेळा रुग्णाचा रक्तदाब रुग्णालयात गेल्यानंतरच वाढलेला आढळून येतो व इतरवेळा तो सामान्य असतो. यालाच व्हाईटकोट हायपरटेंशन म्हणतात. त्याच्या निदानासाठी अम्ब्यूलेटरी ब्लडप्रेशर मॉनिटरिंग आवश्यक असते. यात रुग्णाच्या संपूर्ण दिवसभराच्या रक्तदाबाची नोंद केली जाते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करताना
उच्च रक्तदाबाची कारणे, लक्षणे आणि दुष्परिणाम याची माहिती घेतल्यानंतर आता तो कसा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो याची माहिती आज आपण घेऊ.

दैनंदिन जीवनातील आहार सवयी बदलून, स्थूलता कमी करून तसेच जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. धुम्रपान, मद्यपान व तंबाखूसेवन कमी केल्यास दैनंदिन ताणतणाव कमी करून नियमित व्यायाम केल्यास त्याचा बराच फायदा होतो.

काय काळजी घ्याल?

१. मीठ खाण्यावर नियंत्रण : उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. याचा अर्थ असा नव्हे की, मीठ खाऊच नये किंवा अळणी जेवण खावे. खूप काळ साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये तयार केलेले पदार्थ, कुरकुरे, चिप्स इत्यादी पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.

२. ताज्या भाज्या व फळे : रोजच्या आहारात ताज्या भाज्या, फळे तसेच कमी स्निग्धता असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

३. कडधान्ये : सर्व प्रकारच्या कडधान्यांचा डाएटरी फायबर्स हा मुख्य स्रोत असतो. कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

४. मासे : मासे खाणाऱ्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका शक्यतो उद् भवत नाही. मुख्यत्वे यासोबत वजन कमी केल्यास जास्त फायदा होतो.

५. कॉफी : कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी प्याल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो.

हे लक्षात ठेवा

१. मद्यपान : अतिमद्यपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच असते. अतिरिक्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याला हा धोका संभवतो.

२. वजन : स्थूलत्वामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार सहजतेने जवळ येतात. कमी व सकस अन्न खाणे, भरपूर व्यायाम करणे ही खरी वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.

३. नियमित व्यायाम : दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करायलाच हवा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग आदी व्यायाम करता येतील. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी वेट ट्रेनिंग करावे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल, तरी उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे हे लक्षात ठेवावे.

नियंत्रित आहार व आवश्यक व्यायाम करूनही उच्च रक्तदाब नियंत्रित होत नसेल, तर आपल्याला औषधोपचाराची गरज असते.
उच्च रक्तदाबावरील औषधे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात, जसे…

- शरीरातील मिठाचे प्रमाण कमी करणे

- हृदयाचे ठोके नियंत्रित करणे

- रक्तवाहिन्यांचे प्रसारण करणे

बऱ्याच वेळी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एकापेक्षा जास्त औषधांची गरज भासू शकते. तुम्ही उच्च रक्तदाबासाठीची नुकतीच औषधे सुरू केली असल्यास, खालील मुद्दे लक्षात ठेवावेत :

१. तुम्ही औषधे नियमित घेतली पाहिजेत.

२. औषधांचा काहीही परिणाम होत नाही, असे तुम्हाला वाटत असले, तरीही त्यांचे शरीरात कार्य चालू आहे, हे लक्षात ठेवावे.

३. औषधांमुळे वजन वाढणे, थोडासा थकवा जाणवण्यासारखी लक्षणे दिसत आहेत, असे वाटले तरीही ही औषधे बंद करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशी जाऊन वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी करा.

हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांना हे माहितीच नसतं की, ते हाय बीपीचे शिकार झाले आहेत. पण जर या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी फेलसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, वजनासोबतच लाइफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर कमी करू शकता.

onlymyhealth.com या हेल्थ वेबसाइटने दिलेल्या लेखानुसार, अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगितले की, रोज केवळ ३० मिनिटांचं वर्कआउट किंवा फिजिकल अ‍ॅक्टिविटी तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यास फायदेशीर ठरते. या रिसर्चमधून समोर आले आहे की, ज्या महिला दिवसभर ब्रेक घेऊन घेऊन वर्कआउट करतात, त्यांना याचा अधिक फायदा होतो.

वॉक करा

ब्रिस्क वॉकने(वेगाने चालणे) तुमचं ब्लड प्रेशर लो होतं. त्यामुळे हा वर्कआउट चांगला पर्याय आहे. यात हृदय वेगाने ऑक्सिजनचा वापर करतं. आठवड्यातून चार-पाच वेळा कार्डिओ एक्सरसाइज केल्यानेही बराच फरक पडतो. सुरूवात तुम्ही १५ मिनिटांच्या एक्सरसाइजपासून करू शकता. नंतर हळूहळू वेळ वाढवावी.

डीप ब्रीदिंग

काही स्लो ब्रीदिंग आणि मेडिटेशनच्या पद्धती शिकले तर तुम्हाला यांचा फायदा होऊ शकतो. याने तुमचा स्ट्रेस लगेच दूर होईल आणि तुमचं ब्लड प्रेशरही व्यवस्थित राहील. रोज सकाळी आणि सायंकाळी १० मिनिटे हे करा. जर तुम्ही योगा क्लास जॉईन केला तर फारच उत्तम.

पोटॅशिअमयुक्त पदार्थ खावेत

आपल्या आहारात पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यात रताळे, टोमॅटो, संत्र्याचा ज्यूस, बटाटे, केळी, मटार आणि मणूके हे येतात. तसेच मिठाचं सेवन कमी करा.

(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे केवळ माहिती देण्यासाठी देण्यात आले आहेत. यातील सल्ले फॉलो करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)

तुम्हाला असं कधी झालयं का की, तुम्ही कधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजून जा की, तुम्हाला व्हाइट कोट हायपरटेन्शन (White Coat Hypertension) म्हणजेच, व्हाइट कोट सिंड्रोमचे शिकार झाला आहात. पण या समस्येकडे अजिबात दुर्लक्षं करू नका. असं केलंत तर ही समस्या वेळेनुसार आणखी गंभीर रूप घेऊ शकते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या व्यक्ती व्हाइट कोट हायपरटेन्शनमुळे पीडित आहेत आणि त्यावर काहीच उपचार करत नसतील तर अशा व्यक्तींमध्ये सामान्य ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांच्या तुलनेत हार्ट संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.

काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?

व्हाइट कोट हायपरटेन्शन एक अशी स्थिती आहे, ज्यांमध्ये मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं. परंतु ब्लड प्रेशर सामान्य वातावरणामध्ये नॉर्मल असतं. खरं तर ही समस्या जेव्हा या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते. त्यामुळे या हायपरटेन्शनच्या समस्येला डॉक्टरांच्या व्हाइट कोटमुळे 'व्हाइट कोट हायपरटेन्शन' असं नाव दिलं आहे.

व्हाइट कोट हायपरटेन्शनची कारणं

साधारणतः जेव्हाही तुम्ही एखादं काम करता, त्यावेळी तुमचं ब्लड प्रेशऱ त्यानुसार वाढत आणि कमी होत राहतं. ही एक सामान्य परिस्थिती आहे. परंतु व्हाइट कोट हायपरटेन्शनची समस्या तेव्हाच उद्भवते, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाताना नर्वस होता किंवा घाबरून जाता. अशावेळी जर ब्लड प्रेशर चेक केलं गेलं तर ते सामान्य ब्लड प्रेशरच्या तुलनेमध्ये वाढलेलं दिसतं. जास्तीत जास्त लोक डॉक्टरांकडे किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये घाबरून जातात. याचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर होत असतो.

व्हाइट कोट हायपरटेन्शनपासून बचाव

व्हाइट कोट हायपरटेन्शन तसं पाहायला गेलं तर फार लोकांमध्ये आढळून येत नाही. परंतु ही समस्या कोणालाही आणि कधीही होऊ शकते. त्यामुळे यापासून बचाव करणं अत्यंत आवश्यक ठरतं. जाणून घेऊया यापासून बचाव करण्यासाठी काही उपाय :

1. नियमितपणे आपलं ब्लड प्रेशर चेक करावं आणि त्याचा रेकॉर्ड मेन्टेन करावा. 24 तास ब्लड प्रेशरचं रीडिंग घ्यावं आणि जाणून घ्यावं दिवसभरामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कधी वाढतं आणि कमी होत आहे.

2. सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांच्या सेवनानेही ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडिअमचे प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

3. जर डॉक्टरांकडे जाण्याची भिती वाटत असेल किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये गेल्यानंतर नर्वस होत असाल तर ब्लड प्रेशरचं रिडिंग घेण्याआधी रिलॅक्स करा आणि शांत व्हा. स्वतःला समजावून सांगा की, घाबरण्याची अजिबात गरज नाही. डॉक्टर किंवा नर्सला लगेच ब्लड प्रेशर चेक करू देऊ नका.

4. मनामध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल यांबाबत विचार करण्याऐवजी इतर गोष्टींचा विचार करा. त्यामुळे तुमचं मन डायवर्ट होऊन तुम्हाला भिती वाटणार नाही. तसेच तुम्ही शांत होण्यासाठी गाणीही ऐकू शकता.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांचा थेट संबंध डिप्रेशनशी आहे. एका ताज्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, ज्या महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे असतात, त्यांना असे आजार आजार होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये महिलांमध्ये आजाराच्या आधी आणि नंतर डिप्रेशनची लक्षणे यावर अभ्यास करण्यात आला.

या रिसर्च टीमचे मुख्य Xiaolin Xu यांनी सांगितले की, 'अलिकडे अनेक महिला अनेक क्रोनिक(दीर्घकाळ राहणारा जुना आजार) आजारांनी पीडित आहेत. डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग आजकाल वेगाने वाढत आहेत. आम्ही यावर रिसर्च केला की, डिप्रेशनच्या लक्षणांआधी आणि नंतर हे आजार कसे विकसित होतात'.

या रिसर्चमध्ये सहभागी ४३.२ महिलांना सांगितले की, त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे होती. पण यातील केवळ अर्ध्याच महिलांना डिप्रेशन क्लिनिकली डायग्नोज झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. डिप्रेशनचे शिकार होण्याआधी या महिलांमध्ये क्रोनिक आजारांचा धोका १.८ टक्क्यांनी जास्त आढळला. डिप्रेशन दरम्यान सुद्धा महिलांमध्ये हे आजार सामान्य महिलांच्या तुलनेत २.४ टक्के जास्त रिक्स बघितली गेली.

या रिसर्चमधून हे आढळून आले की, डिप्रेशन आणि दीर्घकालीन आजारांचा समान जेनेटिक किंवा शारीरिक कारणांशी संबंध आहे. रिसर्चनुसार, शरीरात सूज, डिप्रेशन आणि आजार दोन्हींशी संबंध ठेवतं. डायबिटीस आणि हायपरटेंशनसारखे आजारही डिप्रेशनशी संबंधित आहेत.


(Image Credit : Bridges to Recovery)

या रिसर्चमधून समोर आलेले परिणाम आता मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचारासाठी मदत करतील. या रिसर्चमधून ही बाब सुद्धा समोर आली की, ज्या महिलांमध्ये डिप्रेशन आणि आजार दोन्ही गोष्टी होत्या, त्या महिला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील होत्या. तसेच त्या लठ्ठपणाच्या शिकार होत्या, तंबाखू आणि मद्यसेवन करत होत्या.

Dr. Priyanka Awale
Dr. Priyanka Awale
MD - Homeopathy, Homeopath Dietitian, 11 yrs, Pune
Dr. Simranpal Singh
Dr. Simranpal Singh
Medical Student, General Physician, 2 yrs, Chandauli
Dr. Rachana Parmar
Dr. Rachana Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 20 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune
Dr. Himashree Wankhede
Dr. Himashree Wankhede
MBBS, Ophthalmologist Cataract surgeon, 5 yrs, Pune
Hellodox
x