Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
धसका छातीत दुखण्याचा…
#हृदयरोग

छातीत दुखलं की लगेच हृदयविकाराची शंका घेऊन डॉक्टरची भेट घेतली जाते. छातीत दुखणं प्रत्येक वेळी हृदयविकारामुळे असेलच असं नाही, पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही.

संध्याकाळचे सहा वाजले होते. मी घरी जायला निघालो होतो. एवढय़ात रवी आणि महेश माझ्या ऑफिसात आले. दोघेही आमच्या संस्थेत पीएचडीसाठी आलेले विद्यार्थी (रिसर्च स्कॉलर) होते.

‘‘डॉक्टर, आम्ही पेशंट म्हणून नाही आलेलो. आम्हाला एक शंका आहे त्याबद्दल विचारायचे आहे.’’ रवीने येण्याचे प्रयोजन सांगितले.

‘‘डॉक्टर, मी २५ वर्षांचा आहे. माझ्या छातीत दुखलं तर ते हृदयविकारामुळे असू शकेल का?’’ महेशने आपली शंका विचारली.

‘‘डॉक्टर, वयाच्या पंचविसाव्या वर्षी हृदयविकार कधी होतो का?’’ रवीने आपला मुद्दा नोंदवला.

मला दोघांच्या प्रश्नांवरून त्यांच्यातल्या वादाची रूपरेषा समजली.

आजकाल २५-३० वर्षांच्या तरुणाला हार्ट अ‍ॅटॅक आला ही बातमी ‘ऐकावे ते नवलच’ या सदरात मोडत नाही. क्षणभर हळहळ व्यक्त करून आम्ही ते विसरतो; परंतु आपल्या अंतर्मनात त्याची कुठे तरी नोंद झालेली असते. छातीच्या दुखण्याबरोबर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे शब्द डोक्यात पिंगा घालतात आणि त्याचबरोबर त्यांचे छातीत धडकी भरवणारे दर डोळ्यापुढे नाचू लागतात. म्हणूनच कुणी छातीत दुखते म्हटले की धस्स होतं.

रवी, महेशच्या डोक्यात असाच काहीसा विचार असावा. मी त्यांना बसायला सांगितलं.

‘‘रवी, महेश आपण आज फक्त छातीच्या दुखण्यावर बोलू या, चालेल?’’

रवी काही तरी विचारणार एवढय़ात मी त्याला थांबवलं ‘अर्थात हृदयविकाराबद्दलही बोलूच’. मी रवीच्या संभाव्य प्रश्नाचे उत्तर दिले आणि छातीचे दुखणे या माझ्या आवडत्या विषयावर बोलायला सुरुवात केली.

सर्वसाधारणपणे छातीच्या दुखण्याला इतर अवयवांच्या दुखण्याच्या तुलनेत नेहमीच जास्त महत्त्व दिले जाते व त्यासाठी सर्वाधिक वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. छातीत दुखायला लागले की बहुतेकांच्या मनात क्षणभर का होईना हृदयविकाराची शंका डोकावून जाते. काही जण लगेच डॉक्टरांकडे जाऊन आपल्या शंकेचं निरसन करतात, तर काही जण ‘दुखणे वाढले तर जाऊ डॉक्टरांकडे’ असा पवित्रा घेतात. तर कधीकधी गॅसचं वा स्नायूचे दुखणं असेल असा विचार करून त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आढळते.

हृदयविकारासारख्या गंभीर प्रकारापासून ते स्नायूंच्या किरकोळ दुखण्यापर्यंत अनेक कारणांमुळे छातीत दुखण्याचा त्रस होऊ शकतो. छातीचे दुखणे वेगवेगळ्या प्रकाराचे असू शकते. त्यावरून विकाराचा अंदाज करता येतो, परंतु केवळ लक्षणांच्या मदतीने एखाद्या विकाराचा अंदाज वर्तवताना इतर विकारांची शक्यता ठामपणे फेटाळून लावता येत नाही. विकाराचे गांभीर्य हे लक्षणाच्या तीव्रतेवर अवलंबून नसते, त्यामुळे कधीकधी गंभीर दुखण्याकडे दुर्लक्ष आणि किरकोळ आजाराला अवास्तव महत्त्व अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच हृदयाच्या ईसीजी आणि तत्सम तपासण्या केल्याशिवाय निदान करता येत नाही. या विषयाची माहिती असलेल्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग डॉक्टर नसेल तेथे रुग्णाला धीर देण्यासाठी व वैद्यकीय मदत मागताना डॉक्टरांना रुग्णाबद्दलची आवश्यक माहिती पुरवण्यासाठी करावा, परंतु रोगनिदान करण्याचा मोह मात्र टाळावा.

छातीत दुखायला लागल्यास ते गंभीर स्वरूपाचे आहे अथवा नाही याविषयी जाणून घेण्यापूर्वी छातीच्या दुखण्यास कारणीभूत विविध विकारांबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ या.

छातीच्या दुखण्याची कारणमीमांसा करताना सोयीसाठी हृदयाशी निगडित विकारांमुळे छातीत दुखणे आणि हृदयेतर कारणांमुळे छातीत दुखणे असे दोन प्रमुख भाग करता येतील. हृदयाशी निगडित विकारांमध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका ऊर्फ हार्ट अ‍ॅटॅक आणि हृदयशूळ म्हणजेच अन्जायना यांचा मोठा वाटा आहे. हे दोन्ही विकार हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण होतात. हृदयाशी संबंधित इतर विकारांमध्येसुद्धा छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो; परंतु हार्ट अ‍ॅटॅक आणि हृदयशूळ यांच्या तुलनेत या विकारांच्या रुग्णाची संख्या बरीच कमी असते.

Dr. Rajiv Srivastava
Dr. Rajiv Srivastava
Specialist, Cardiac Surgeon Cardiothoracic Surgeon, 20 yrs, Thane
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune
Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Vaidya Manish Joshi
Dr. Vaidya Manish Joshi
BAMS, Infertility Specialist Panchakarma, 21 yrs, Nashik
Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune