Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



दातांना येणाऱ्या झिणझिण्या

गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दात दुखत असल्यास सेन्सिटिव्ह दातांची समस्या तुम्हाला सतावतेय, हे लक्षात घ्यायला हवं.
थंडगार अन्न खाल्याने वेदना होत असतील तर हे सेन्सिटिव्ह दातांचं लक्षण आहे. १७ टक्के भारतीयांना गरम/थंडगार पदार्थ खाल्ल्यावर वेदना जाणवतात. आयएमआरबीने केलेल्या नॅशनल कन्झ्युमर युसेज अॅण्ड अॅटिट्युड्स सवेर्मधून (सीयुएएस) दिसून आलं आहे, की सेन्सिटिव्ह दातांची समस्या ही तांेडाच्या आरोग्यासंबंधीच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सेन्सिटिव्ह दातांच्या समस्यांंमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

दातांची सेन्सिटिव्हीटी म्हणजे काय?

आपले दात तीन थरांचे बनलेले असतात. दातावरील आवरण म्हणजेच सर्वात बाहेरच्या थराला एनॅमल म्हणतात आणि दाताच्या मुळाचा भाग झाकणाऱ्या थराला सिमेंटम म्हणतात. या दोघांच्या आतमधील थराला डेंटाइन म्हणतात. या भागात खनिज नसतात तसंच त्याची घनता बाहेरील थरांपेक्षा कमी असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मज्जातंतूंची टोके दाताच्या ज्या मऊसर भागात असतात त्या भागाशी जोडणाऱ्या बारीक नलिका दाताच्या याच भागात असतात. जेव्हा डेंटाइन नावाचा हा आतील थर उघडा पडतो, तेव्हा दातांची सेन्सिटिव्हीटी उद्भवते. सवेर्नुसार, सेन्सिटिव्ह दातांमुळे त्रस्त असलेल्या १७ टक्के भारतीयांपैकी, ५८ टक्के लोक समस्येवर काहीच उपचार करत नाहीत. समस्येविषयी उदासीनता आणि अज्ञान ही काहीही न करण्यामागची दोन प्रमुख कारणं आहेत. १९ टक्के लोक सेन्सिटिव्हीटी तपासण्यासाठी डेण्टिस्टकडे जातात आणि फक्त दोन टक्के लोकांनी सेन्सिटिव्हीटी कमी करणारी (डीसेन्सिटायझिंग) टूथपेस्ट वापरली.दातांची सेंसिटिव्हीटी म्हणजेच दातांना येणाऱ्या झिणझिण्या एक सामान्य समस्या आहे. गोड पदार्थ खाल्यावर, थंड पाणी प्यायल्यावर, तसेच थंड पदार्थ जसे की, आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक प्यायल्यानेही दातांना झिणझिण्या येतात. एका अभ्यासानुसार, प्रत्येक ८ पैकी एका व्यक्तीला सेंसिटिव दातांची समस्या असते. लोकांची लाइफस्टाइल सध्या फारच वेगाने बदलत आहे. लोक फास्ट फूड आणि रेडीमेड फूड्सचं सेवन अधिक करत आहेत. यात अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचतं. याच कारणाने दातांची ही समस्या अधिक वाढते आहे. जास्तीत जास्त लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि यावर उपाय करत नाहीत. सुंदर हास्य आपले सौंदर्य खुलवते आणि सुंदर हास्यासाठी दात शुभ्र, स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी दातांची काळजी घेणे, त्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. दात किडण्याबरोबर दातांच्या इतर समस्या ही असतात.जसं आईस्क्रीम खाताना पटकन एखादा दात ठणकतो आणि आपला हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. असाच अनुभव इतर थंड, गोड, गरम पदार्थ खाताना तुम्हाला नक्कीच आला असेल. दात सेन्सिटिव्ह झाल्यामुळे आपल्याला ही समस्या जाणवते. तर मग जाणून घेऊया दातात सेन्सिटिव्हिटी कशी निर्माण होते.

1. थंड आणि गरम पदार्थ: थंड किंवा गरम पदार्थ खाल्यास किंवा पेय प्यायल्यास दातात सेन्सिटिव्हिटी जाणवते. पण सगळ्यांत जास्त सेन्सिटिव्हिटी थंड पदार्थ खाल्याने जाणवते. थंड हवेत श्वास घेताना, दातांची ट्रीटमेंट घेताना वापरल्या जाणाऱ्या यंत्रातून निघणारी हवा यामुळे सारखीच सेन्सिटिव्हिटी जाणवते.
2. दातांची ट्रीटमेंट करताना वापरली जाणारी साधने किंवा यंत्र: दातांची ट्रीटमेंट करताना वापरली जाणारी साधने किंवा यंत्र यामुळे देखील सेन्सिटिव्हिटी जाणवते. स्केलिंग आणि रूट नियोजन इत्यादी करताना वापरल्या जाणाऱ्या यंत्र डेंटिनल च्या सहवासात आल्यास दातात सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. ब्रश करताना किंवा टूथपीक वापरताना देखील सारखाच अनुभव येतो.
3. साखरेचे पदार्थ: साखरेचे पदार्थ खाल्याने साखरेतील ऑस्मॉटिक ग्रेडीयंट (osmotic gradients) चा दातावर परिणाम होतो आणि दातातील नस उत्तेजित होऊन सेन्सिटिव्हिटी निर्माण होते.
4.असिड: असिडिक पदार्थ खाल्याने व पेय घेतल्याने सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. दात कोरण्यासाठी काही प्रक्रियांसाठी असिड वापरले जाते. त्यामुळे देखील सेन्सिटिव्हिटी निर्माण होते.

दातात सेन्सिटिव्हीटी कशामुळे जाणवते?
डेंटिनल ट्युबुल्स मध्ये डेंटिनल फ्लुइड असते. डेंटिनच्या सहवासात एखादे उत्तेजक आल्यास डेंटिनल फ्लुइड बाजूला सारून ते नसेच्या आत जातं आणि त्यामुळे सेन्सिटिव्हिटीची जाणीव होते.

खालील ५ गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला ही समस्या होणार नाही.
#हलक्या हाताने ब्रश करा
फार जोर लावून ब्रश केल्याने दातांच्या सेंसिटिव्हिटीचा धोका वाढतो. कारण याने दातांवर असलेल्या आवरणाला नुकसान पोहोचतं. त्यासोबतच दातांना मजबूत ठेवणाऱ्या हिरड्याही कमजोर होतात. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की, नेहमी हलक्या हाताने ब्रस करावा. तसेच ब्रश केल्यावर दातांवर बोटही फिरवा.

#जास्त टूथपेस्ट टाळा
अनेकांना सवय असते की, ते ब्रश करतेवेळी ब्रशवर खूपसारं टूथपेस्ट लावतात. पण जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणे दातांसाठी आणि तोंडासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे काळजी घ्या की, नेहमी मटरच्या दाण्याएवढा टूथपेस्ट घ्यावा. तसेच अनेकांना असे वाटते की, ब्रस करताना जितका जास्त फेस होईल दात तितके जास्त स्वच्छ होतील, पण असे काही नाहीये. ब्रश करतांना दातांमधील घाण स्वच्छ करणे गरजेचे असते, यात टूथपेस्टच्या फेसाने काही फरक पडत नाही.

#फ्लोराइड माऊथवॉश वापरा
जर तुमच्या दातांमध्ये सेंसिटिव्हिटीची समस्या जास्त असेल तर हे तुम्हाला महागात पडू शकतं. काही लोकांना साधं पाणी प्यायल्याने आणि थोडं गोड खाल्यानेही समस्या होते. अशात तुम्ही फ्लोराइड माऊथवॉशचा प्रयोग करायला हवा. फ्लोराइड दातांवरील आवरण मजबूत करतं आणि दातांना येणाऱ्या झिणझिण्याही दूर होतात. रोज ब्रश केल्यावर तुम्ही या माऊथवॉशचा वापर करु शकता.

#आंबट पदार्थ खाल्यावर ब्रश करा
फळांचा रस, थंड पेय, रेड वाइन, चहा, आइस्क्रीम आणि सिट्रिक फळ जसे की, टोमॅटो, लिंबू, सॅलड ड्रेसिंग आणि लोणचं हे खाऊ नका. कारण या पदार्थामुळे दातांवरील आवरण घासलं जातं. जर हे पदार्थ तुम्ही खाल्ले तरी त्यानंतर ब्रश करा. तसेच काही गोड पदार्थ खाल्यावर पाण्याने गुरळा करा.

#ब्रशच्या स्वच्छतेवर द्या लक्ष
जर तुम्ही ब्रथ बाथरुममध्ये ठेवत असाल तर त्यात किटाणू वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रश दुसऱ्या जागेवर ठेवा. जर ब्रशचं कव्हर असेल तर फार उत्तम. अमेरिकन डेंटल अशोसिएशनने सल्ला दिलाय की, ब्रश ३ महिन्यांचा कालावधीनंतर बदलायला हवा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे दाते खराब होऊ लागतात.

कारणं
* दात पडणे/उपटणं किंवा दाताचा काही भाग झिजणं. यामुळे दातांच्या मुळांचा पृष्ठभाग उघडा पडतो.
* दात किडणं, दातांचं फ्रॅक्चर
* हिरड्यांवरील (पेरिअडॉण्टल) शस्त्रक्रियेनंतर
* कॅविटिज
* अचानक होणारे तापमानातील बदल
* फिलिंग्ज आणि क्राउन्स यांच्या आतमध्ये पोकळ्या निर्माण होणे.
* दात घासून-घासून झिजणे.
* थंड किंवा सोडा असलेल्या पेयांचं अधिक प्रमाणात सेवन
* तोंडाची योग्य ती निगा न राखणं.

उपाय :
* ही समस्या कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डीसेन्सिटायझिंग टूथपेस्टची फारच थोड्या लोकांना माहिती असलेली दिसते. ही समस्या कमी करण्यासाठी डेण्टिस्ट डीसेन्सिटायझिंग टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात. पण याबद्दल फारच थोड्या जणांना माहिती असते. या टूथपेस्टमध्ये दातांच्या पृष्ठभागापासून मज्जातंतूंकडे जाणाऱ्या संवेदना अडवून धरणारी संयुगे असतात. अशा काही टूथपेस्ट मिण्ट फ्लेवरमध्येही उपलब्ध असल्यामुळे रेग्युलर पेस्ट म्हणून ती वापरता येईल.

* डीसेन्सिटायझिंग टूथपेस्टमुळे हा त्रास कमी होत नसेल, तर फ्लुराइड जेल किंवा खास डीसेन्सिटायझिंग एजंट्स वापरण्याचा सल्ला डेण्टिस्ट देतात. पण या उपायांनीही ही समस्या कमी होत नसेल, तर यामागचं नेमकं कारण शोधून फीलिंग, क्राउन इ. उपचारपद्धती घ्यावी लागते.




तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातून संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे, मौखिक आरोग्याची कसोशीने काळजी घ्यायला हवी. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही...

दात, हिरड्या व तोंड या तीनही अवयवांचे आरोग्य हे मौखिक आरोग्यामध्ये येते. आरोग्याच्या दृष्टीने त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असले तरीही प्रत्यक्षात मात्र जोपर्यंत असह्य दाढदुखी, दात हलणे वा दातांच्या अन्य तक्रारी सुरू होत नाहीत तोपर्यंत मौखिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

दात आणि तोंड यांच्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांची लागण आपल्यातल्या अनेकांना झालेली असते. खराब झालेले दात, किडलेले दात, दाताचा संसर्ग, किटण, सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांची झिजून उघडी झालेली मुळे असे अनेक प्रकार त्यात असतात. लहान मुलांच्या दातांच्या आरोग्याचे प्रश्न वेगळे असतात आणि मोठ्या व्यक्तींमधील दंतआरोग्याचे प्रश्न वेगळे असतात. त्यांच्यावर उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असतो. आपल्या आहारावर दातांचे आरोग्य अवलंबून असते, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे, त्यातले अन्नघटक कोणते आहेत हे महत्त्वाचे असते. त्यांचा परिणाम दातांच्या आरोग्यावर होत असतो.

मौखिक आरोग्य चांगले नसल्यास दाताचे, हिरड्यांचे विकार होतात. दात स्वच्छ न ठेवल्यास त्या ठिकाणी आम्ल तयार होते व दात किडतात. या कारणामुळे ९५ टक्के लोकांचे दात किडलेले असतात. काहीवेळा त्यामुळे दाताला छिद्रे पडतात. ही छिद्रे भरली नाहीत तर दात लवकर पडतो आणि तो दुखायला लागतो. तेथील रक्तवाहिन्या तुटतात. तेथून रक्त व पू येतो. अशावेळी हिरड्यांचा आधार असलेले हाड घासले जाते.

दातांचे आरोग्य जपण्यासाठी काय करावे?

- दातांची हिरड्यांची नियमित तपासणी

- दातांसाठी फार कडक ब्रश वापरू नये

- किडलेल्या दातांची स्वच्छता वेळच्यावेळी करावी

- दातांमधील कीड स्वच्छ करणे

- खूप हलणारा दात काढून टाकावा

- दातांनी बाटलीचे झाकण किंवा कोणतीही कडक वस्तू तोडू नये

- दोऱ्याने किंवा हाताने अडकलेले अन्न काढू नये त्यामुळे हिरड्या दुखावतात.

- दात कोरू नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते.

- दूधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काटेकोर काळजी घ्यावी.

आयुर्वेद सांगतोय अशी घ्या दातांच्या काळजी

दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी आयुर्वेदात मार्गदर्शन करण्यात आलंय. दातांचं आरोग्य राखल्यास, संपूर्ण शरीराचं आरोग्य राखण्यास मदत होते. दररोज दात घासणं हे शरीरस्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. यामुळे अनेक रोगांना लांब ठेवण्यास मदत होते. झोपल्यावर लाळेमधून स्रवणारे घटक तसंच, श्वासोच्छवासाने हवेमधले घटकही दातांच्या सभोवताली साठतात. निरोगी आरोग्यासाठी हे घटक काढून टाकणं निकडीचं आहे.

दातांचा आणि पचनाचा घनिष्ठ संबंध आहे. नीटपणे चावलेल्या अन्नाचं पचन सुलभपणे होतं. अन्न नीट चावता येण्यासाठी दातांची मुळं घट्ट असणं गरजेचं आहे. त्यासाठी दातांना मजबूत करणाऱ्या पदार्थांचा वापर करुन दात घासणं फायद्याचं ठरतं. दात घासल्यावर तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचनाची क्रिया सुरळीत पार पडते. त्यामुळे सकाळी उठल्यावर दातांची योग्य पद्धतीनं स्वच्छता करणं आवश्यक आहे.

दातांच्या आरोग्यावर आहार, दिनचर्या आणि व्यसनं यांचा परिणाम होतो. दातांची योग्य निगा न राखल्यास अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांचं आरोग्य बिघडू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.

दात खराब का होतात?

- एकाच वेळी थंड आणि गरम पदार्थांचं सेवन केल्यानं दात ढिले होतात.
- तंबाखू, पान, सिगरेट या व्यसनांमुळे दातांवर किटण साचतं.
- दात कोरण्याच्या सवयीमुळे हिरड्यांमध्ये जखम होते.
- जोरात घासल्यानं हिरड्या सोलवटतात

दात घासण्यासाठी या पदार्थांचा वापर करा
- त्रिफळा चूर्णात दोन थेंब तिळाचं तेल घातलेलं मिश्रण
- तिळाची पूड, ज्येष्ठमधाची पूड आणि तिळाचं तेल एकत्र करून बनवलेली पेस्ट
- बकुळ, बाभूळ, करंज, वड, लिंब, आणि त्रिफळा यांचं समभाग घेऊन बनवलेलं चूर्ण
- बकुळ सालीपासून बनवलेलं चूर्ण
- निंबसालीची पावडर
- रुई, वड, खदीर, करंज यांच्या काड्या ब्रश करण्यासाठी चावा

वजन वाढल्याने काय काय समस्या होऊ शकतात हे आपण नेहमीच ऐकत-वाचत असतो. डायबिटीस, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसोबतच आणखीही अनेक आजार वजन वाढल्याने होतात. आता वजन वाढल्याने आणखी एका समस्येचा खुलासा झाला आहे. मानवी शरीरात दात आणि जबडा तयार करणाऱ्या एका खास जीन्स आणि लठ्ठपणाचा संबंध दात सडने आणि खराब होण्याशी आहे. एखाद्या व्यक्तीच्या आनुवांशिक विशेषता जसे की, लठ्ठपणा, शिक्षण आणि व्यक्तिमत्वाचा संबंध दातांशी संबंधित आजारांशी जोडला गेला आहे.

दातांना कसा होतो धोका?

ब्रिटनच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की, दात खराब होणे आणि पिरिअडऑनटायटीस ज्याला हिरड्यांचा आजार म्हटलं जातं. हा आजार जगात सर्वात जास्त आढळणारा दातांचा आजार आहे. पण इतरही आजारांप्रमाणेच आतापर्यंत या आजाराचीही कमीच माहिती मिळू शकली. त्यात हे कळालं की, जीन्समुळे कशाप्रकारे दातांचा आजार होण्याचा धोका असतो. अभ्यासक आतापर्यंत याचं कारण सांगू शकले नाहीत की, दोन व्यक्ती जे एकसारखे पदार्थ खातात आणि तोंडाची स्वच्छताही एकसारखी करतात, त्यांच्या दातात वेगवेगळे कीटाणु आणि इन्फेक्शन कसे असतात?

हृदयरोग आणि दात खराब होण्यात संबंध

स्वीडनच्या युमिया युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ओडॉनटोलॉजच्या इनगेगार्ड जोहान्सन यांच्यानुसार, या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं की, दात आपल्या शरीराचे महत्त्वाचा भाग आहेत. आपण हे बघू शकतो की, हृदयरोग आणि दात खराब होण्याचा धोका यात खोलवर संबंध आहे. नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये ९ इंटरनॅशनल क्लीनिकल अभ्यासांचा समावेश करण्यात आला होता.

व्यक्तीचे जीन्स आणि दातांचा संबंध

या रिसर्चमध्ये बायोबॅंकमधील ४ लाख ६१ हजार सहभागी लोकांच्या दातांच्या आरोग्याचे व्यक्तिगत रिपोर्टचाही समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनी हृदयरोग आणि धुम्रपान, लठ्ठपणा, शिक्षण आणि व्यक्तिमत्वात जेनेटिक संबंधाला पाहिलं आणि यांचा दातांच्या आरोग्याशी काय संबंध आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ब्रिस्टल पॉप्युलेशन हेल्थ सायन्स इन्स्टिट्यूटचे सायमन हावर्थ म्हणाले की, भविष्यात अशाप्रकारचा रिसर्च त्या लोकांना हे ओळखण्यात मदत करेल, ज्यांना दातांचा रोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो.

Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Dr. Rakhee Tanaji
Dr. Rakhee Tanaji
BHMS, Dermatologist Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Deelip Janugade
Dr. Deelip Janugade
BAMS, Family Physician General Physician, 31 yrs, Pune
Hellodox
x