Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

लघवी कमी येणे

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consultआपल्या घरातल्या मोरीची आणि शरीरातल्या मूत्रसंस्थेची तुलना करून पहा. मोरी धुण्यासाठी फिनेल वगैरे सर्व गोष्टी वापरल्या पण मूळ पाणीच उपलब्ध नसेल तर?..अर्थातच ती स्वच्छ होणारच नाही. तसेच काहीसे आपल्या मूत्रसंस्थेचे आहे. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मूत्रसंस्थेच्या तक्रारींचे प्राथमिक कारण शरीरात पाणी कमी जाणे हे असते.
’उन्हाळ्यात मुतखडय़ाचा त्रास अनेकांना उद्भवतो. लघवीतले क्षारांचे घटक, खर निघून जाण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मूत्रनलिकेत खडा अडकून पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो. २५ ते ५० वयोगटातल्या पुरूषांमध्ये प्रॉस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवीला आग आणि जळजळ होण्याची तक्रार दिसते. स्त्रियांमध्ये लघवीला आग होण्याबरोबरच ठणका लागणे, कळ येणे, क्वचित लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला बोली भाषेत ‘उन्हाळी लागणे’ असे म्हणतात. त्याबरोबर मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. लहान मुलांनाही ‘शू’च्या जागी आग होण्याचा त्रास होतो.
’उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याची संधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात.
प्रतिबंधासाठी-
* पुरेसे पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी. पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत.
* माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले.
* शहाळ्याचे पाणी उत्तम
* नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.
* कलिंगडाचा रस

डॉक्टरांकडे केव्हा जावे–
लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.

लघवीचा बदललेला रंग हा आपल्या आरोग्याबाबत बरेच काही सांगून जातो. सर्वसाधारणपणे लघवीचा रंग हा फिकट पिवळा असतो; परंतु रंग बदललेला असेल तर शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे, असे समजावे. सर्वसाधारणपणे डॉक्टर आजाराची प्राथमिक तपासणी करताना लघवी तपासण्याचा सल्ला देतात. अतिसार, कावीळ, मधुमेह, मुतखडा, मूत्रपिंडविकार, मलेरिया, थंडीताप यांसारख्या आजारावर औषध देताना रक्‍त आणि लघवीची तपासणी केली जाते. साधारणत: आजारी माणसाला साधारणपणे लघवी करताना जळजळ होणे, प्रमाण कमी होणे, रात्रभर लघवी होणे किंवा भरपूर लघवी होणे यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच शरीरातील अतिरिक्‍त पाणी हे घामावाटे निघून गेल्याने बर्‍याच जणांना योग्य प्रमाणात लघवी होत नाही. त्यामुळे आजारी व्यक्‍तीने अगोदर लघवीच्या प्रमाणाकडे आणि रंगाकडे लक्ष देणे गरजेचे असते. लघवी करताना कोणताही त्रास किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यास सुरुवात करायला हवी. विशेष म्हणजे पाणी कमी पिल्याने लघवीचे आजार सुरू होतात. त्यामुळे पाणी पिण्याचा कंटाळा करू नये आणि पाणी भरपूर प्यावे, जेणेकरून शरीरातील तापमान सामान्य राहून आजारांना अटकाव करण्यास मदत होईल. लघवीत संसर्ग झाल्यास अंगात ताप येतो आणि आजारी व्यक्‍तीला थंडी वाजून येते. हा संसर्ग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यासाठी लघवी तपासूनच त्यावर उपचार करावे लागतात.

लघवीचा रंग दर्शवितो पाण्याचे प्रमाण : लघवीचा पिवळा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि समतोलपणा दर्शवितो. लघवीचा रंग पाहून समजते की पाणी किती घ्यावे आणि किती नको. जर लघवीचा रंग अधिक गडद पिवळा असेल तर अधिक पाणी पिण्याची गरज आहे, असे समजावे. शरीरातील पाणी कमी झाल्यास थकवा जाणवतो. याउलट शरीरात पुरेसे पाणी असेल तर कामात उत्साह जाणवतो. घामावाटे किंवा लघवीवाटे अधिक पाणी गेल्यास अशक्‍तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते.

पांढरी लघवी : ढगाळ रंगाची किंवा पांढरी लघवी येत असल्यास विशेषत: महिलांसाठी हे आजारपणाचे लक्षण ठरू शकते. विविध कारणांमुळे लघवीचा रंग बदलू शकतो.अतिसारामुळे फेस निर्माण करणारी लघवी होते.मुत्राशयातील संसर्गामुळे लघवीचा रंग बदलतो. मुत्राशयाचा आजार, मूतखडा यामुळे रंग बदलतो.पांढरी लघवी हे सुद्धा संसर्गाचे लक्षण मानले जाते. तसेच लघवीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटिनचे प्रमाण वाढले असले तरी रंग बदलतो. प्रोटिनचे अतिप्रमाण झाल्याने मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात. अशावेळी डॉक्टर लघवीची तपासणी करून पुढील उपचार निश्‍चित करत असतात.लघवीला विचित्र रंग येणे:

नारंगी रंग : मुत्राशयातील विकारामुळे जर अँटिबायोटिक गोळ्या किंवा औषध घेतले तर लघवीला नारंगी रंग येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्व आणि अतिप्रमाणात गाजर खाल्ल्यामुळे देखील लघवीचा रंग बदलतो.

लाल रंग : जर लघवीत रक्‍त उतरले तर त्याचा रंग लाल होतो. अशी लघवी येत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अनेकांना शरीरातील उष्णता कमालीची वाढल्यामुळे लाल रंगाची वा रक्‍तमिश्रीत लघवी होते. काही वेळा मुत्राशयमार्गावर जखम झाल्यास किंवा संसर्ग झाल्यास लघवीचा रंग लालसर बनतो. असा कोणताही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जांभळा रंग : प्रोफायरिन्सच्या चयापचयात बिघाड झाल्यास लघवीतून प्रोफायरिन जाते. त्यामुळे लघवीचा कलर जांभळट होतो.

हिरवा किंवा तपकिरी : संसर्गावरील उपचारासाठी औषध किंवा वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर लघवीचा रंग बदलतो आणि तो हिरवा किंवा तपकिरी होतो. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी घ्यावीत. लघवीच्या रंगात बदल झाला असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती देणे गरजेचे आहे.

लघवीचा वास येणे : लघवीला येणारा वास हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो.

हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो.

लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते.

लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते.

बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यांवर परिणाम होतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

शरीरातील पाणी कमी झाले असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. ग्लुकोज किंवा मीठ साखर पाणी या माध्यमातून शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राखता येते. जर लघवी लाल येत असेल तर तातडीने डॉक्टरशी संपर्क साधून लघवी तपासणे गरजेचे आहे. तसेच दररोज लघवीत बदल जाणवला तर कोणतीही हयगय न करताना डॉक्टरकडे जाणे हिताचे ठरते. मुतखडा झाला असेल तर लघवी थांबून थांबून येते. अशा वेळी मुतखड्यावर उपचार करून लघवीला होणारा रोध कमी करायला हवा. साफ आणि भरपूर लघवी होणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. म्हणूनच सतत काही दिवस लघवीच्या रंगावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Priyanka Awale
Dr. Priyanka Awale
MD - Homeopathy, Homeopath Dietitian, 11 yrs, Pune
Dr.  Awale Tukaram
Dr. Awale Tukaram
MD - Homeopathy, Homeopath Diabetologist, 12 yrs, Pune
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Dr. Ganesh Pachkawade
Dr. Ganesh Pachkawade
MS/MD - Ayurveda, Cupping Therapist Dermatologist, 4 yrs, Pune
Hellodox
x
Open in App