Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



 हृदयविकाराचा झटका :

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ताबडतोब नेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, पण तिथे जाईपर्यंत, जाताना आणि जाण्याआधी कोणती काळजी आणि कशा प्रकारे घ्यायची असते याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

हृदयाची कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते, रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते, ते दुर्बल बनतात. याला हृदयविकाराचा झटका आला, असे म्हणतात. योग्य उपचार लवकर मिळाले नाहीत तर हृदयाच्या स्नायूंचे न भरून येण्यासारखे कायमचे नुकसान होते. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. हृदयाची रक्तवाहिनी जेवढी जास्त वेळ बंद राहील तेवढेच हृदयाचे जास्त नुकसान होते. जितक्या लवकर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपचार होतील, त्याप्रमाणात हृदयाच्या स्नायूंची इजा व नुकसान कमी होते. म्हणूनच हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण दिसल्यावर वेळ न दवडता औषधोपचार सुरू करणे हे अत्यावश्यक असते. झटका आल्यावर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पूर्ण विश्रांती व तात्काळ उपचार! विश्रांतीमुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि स्नायूंना इजा कमी होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या व्यक्तीला शक्य तितक्या आरामशीर झोपवावे. अंगावरचे घट्ट कपडे सैल करावेत. फोन करून लवकरात लवकर रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णाला रग्णवाहिकेतून कोणत्याही चारचाकी अथवा अॅटोरिक्षामधूनच रुग्णालयात न्यावे. चालत नेणे किंवा दुचाकीवरून नेणे टाळावे. जवळपास डॉक्टरचे क्लिनिक असेल तर ते डॉक्टर रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाला ‘ऑस्पिरीन’ ही रक्त पातळ करणारी गोळी देतात. तोंडात विरघळणारी एक अॅस्पिरीनची (डिस्प्रिन - 325 mg) गोळी रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत करते. रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल असेल तर त्याला सॉब्रिट्रेट (Sorbitrate) नावाची नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली ठेवण्यासाठी देण्यात येते. उपलब्ध असेल तर डॉक्टर क्लोपीडोग्रील, स्टाटीन्सच्या गोळ्या आणि इनॉस्कॉपॉरिन नावाचे इन्जेक्शन त्वचेच्या आत देऊ शकतो.. पण रुग्णाला लवकरात लवकर सर्व सुविधा असलेल्या आय.सी.सी.यू.मध्ये स्थलांतरित करणे आवश्यक असते.

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टर रुग्णाला तपासतात. त्याच्या हृदयाचे ठोके, नाडी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण याची त्वरित नोंद घेण्यात येते. सर्वप्रथम रुग्णाचा हृदयविद्युत आलेख (ECG) काढला जातो. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचे निदान होते आणि त्याची तीव्रता समजते.
ईसीजीद्वारे हृदयविकाराचा झटका सिद्ध झाल्यास त्याला अतिदक्षता विभागात ठेवले जाते. मॉनिटरद्वारे त्याच्या हृदयाची गती, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण यावर सतत लक्ष ठेवण्यात येते. हाताच्या शिरेतून वेदनाशामक इन्जेक्शन दिले जाते. नाकाद्वारे नळीतून प्राणवायू सुरू केला जातो. नंतर हार्ट अटॅक नक्की आलेला आहे हे बघण्यासाठी इतर तपासण्या करण्यात येतात. त्या खालीलप्रमाणे आहेत..!!!

हार्ट अटॅकचे निदान :
नक्की हार्ट अटॅकच आहे ना हे ठरविण्यासाठी खालील गोष्टींचे अवलोकन केले जाते.
१) छातीतील वेदना :
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुरू झालेली वेदना छातीच्या मध्यात स्टर्नम हाडाखाली जाणवते. या वेदना तीव्र असतात. पूर्ण छातीत आवळल्यासारखे वाटते. दाटून येणे, छातीवर दगड ठेवला आहे असे वाटणे. ही अवस्था ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ असते. सोबतच घाम येणे, थकवा येणे, उलटय़ा होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

२) हृदयविद्युत आलेख (ई.सी.जी.) :
हृदयविकाराचा झटका आला की ई.सी.जी.मध्ये वेगवेगळ्या लहरींमध्ये काही ठरावीक बदल आढळतात. त्यातल्या त्यात एसटी सेगमेंट (ST Segment) उंचावणे आणि टी वेव्हज् (T Waves) खालावणे हे हार्ट अटॅकचे निदान करण्यास पुरेसे आहेत. एसटी सेगमेंट (ST Segment) खालावणे आणि क्यू वेव्हज् (Q Waves) येणे हेसुद्धा हार्ट अटॅकचे निदान करतात.

३) रक्तातील घटकाचे चढ-उतार (Cardiac Enzymes Changes) :
रक्तातील विशिष्ट ईन्झाईमची तपासणी, रुग्णाला हार्ट अटॅक आला आहे का, तो किती तीव्र आहे या सर्व गोष्टींचे निदान करते. सिरिअल इन्झाईम तपासणीद्वारे हार्ट अटॅक हा औषधोपचाराला कसा प्रतिसाद देतो आहे याचेपण मूल्यमापन होऊ शकते.
CK-MB, Total CK, CK-MB Mass Index, कार्डिअॅक ट्रोपोनिन्स याची रक्तातील वाढलेली पातळी हार्ट अटॅकचे निदान करते.

४) एकोकार्डिओग्राफी (हार्टची सोनोग्राफी) :
कधी कधी ईसीजी नॉर्मल असतानापण हृदयाच्या कप्प्यांमधील भिंतीच्या हालचालीवरून हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करता येते. हार्ट अटॅकने झालेली हृदयाची हानी, स्नायूंचे झालेले नुकसान, इकोमध्ये कळते. औषधोपचाराला हृदय कसे प्रतिसाद देते आहे याचीसुद्धा कल्पना इकोद्वारे येते. हार्ट अटॅकमुळे काही गुंतागुंत झाली आहे का, हृदयाच्या भिंतीला छिद्र पडले आहे का, झडपांना इजा झाली आहे का या सर्व गोष्टींचे उत्तर इकोद्वारे मिळते.

५) अॅन्जिओग्राफी :
सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे अॅन्जिओग्राफी. या तपासणीमध्ये कोणती रक्तवाहिनी बंद झाली आहे हे निश्चितपणे कळते. पुढे काय करायचे.. किती स्टेंटस् लागणार वगैरेबाबत निर्णय घेता येतात.
हार्ट अटॅकचे निदान निश्चित झाले की, काय उपाययोजना करायची, जेणेकरून हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत होईल, हे ठरवले जाते. यात दोन प्रकारच्या अॅन्जिओप्लास्टी तंत्राचा वापर केला जातो.

## प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी :
हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन न देता रुग्णाला थेट कॅथलॅबमध्ये घेऊन जाऊन जी रक्तवाहिनी बंद आहे तिला उघडून स्टेंट टाकून तो अडथळा दूर केला जातो.

## रेस्क्यू अॅन्जिओप्लास्टी :
ज्या रुग्णामध्ये रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन दिल्यावरपण छातीत दुखणे, ईसीजीमध्ये सुधार न होणे, रक्तदाब कमी राहणे, दम लागणे किंवा काही गुंतागुंत वाढणे ही लक्षणे दिसतात अशा रुग्णाच्या लवकर सुधारणेसाठी, जीव वाचवण्यासाठी अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते.
हार्ट अटॅकचे निदान नक्की झाले की औषधोपचार सुरू करण्यात येतो.

हृदयविकाराच्या झटक्याचे औषधोपचार
हृदयविकाराचा झटका हा रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळीमुळे येतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे ती गुठळी विरघळविणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुठळी विरघळविणारी औषधे आहेत..

स्ट्रेप्टोकायनेज, युरोकायनेज किंवा टीपीए (TPA) (टिश्यू प्लाझ्मिनोजेन अॅक्टिव्हेटर- Tissue Plasminogen Activator)- टेनॅक्टाप्लेज.
यांपैकी एक औषध हे शिरेतून दिले जाते. पहिल्या दोन-तीन तासांत हे दिल्यास रक्ताची गुठळी विरघळून रक्तवाहिनी उघडण्याचे आणि रक्तपुरवठा सुरळीत होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. तेच प्रमाण तीन ते सहा तासांत ६० टक्क्यांपर्यंत आणि पुढील सहा ते बारा तासांत ३०-४० टक्क्यांपर्यंत घसरून कमी होते. बारा तासांनंतर हे औषध देणे योग्य नाही.

रक्तवाहिनी उघडली की, रुग्णास छातीत दुखायचे कमी होते किंवा पूर्णपणे थांबते. ईसीजीपण सुधारतो. रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा कमी होते. नुकताच पक्षाघाताचा झटका (पॅरेलिसिसचा झटका)आला असेल, मेंदूतील रक्तस्राव झाला असेल, जठरव्रणातून रक्तस्राव होत असेल, रक्तदाब खूपच वाढलेला असेल तर अशा व्यक्तींना हे औषध देणे धोकादायक असते.
या औषधाबरोबर रुग्णाला इतरही औषधे देण्यात येतात.

१) नायट्रोग्लिसरीन नावाचे औषध सलाईनद्वारे शिरेमधून दिले जाते. या औषधाने नसा रुंद होण्यास व त्यामुळे रक्तपुरवठा वाढण्यास मदत होते. या औषधाने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हे औषध चालू असताना रक्तदाबाचे सतत मोजमाप ठेवणे आवश्यक असते.

२) रक्त पातळ करणारी औषधे :
अ : अॅस्प्रीन नावाचे औषध :
तोंडात विरघळणारी सोल्यूबल अॅस्पिरीन (Disprin- 325 mg) रक्तवाहिनीतील रक्ताची गुठळी विरघळवण्यास मदत करते.
ब : ‘क्लोपिडोग्रिल’ नावाच्या औषधाच्या चार गोळ्या रक्त पातळ करण्यास मदत करतात.
क : इनॉक्सॉपॉरिन नावाचे इन्जेक्शन सात दिवस देण्यात येते. जेणेकरून उघडलेली नस पुन्हा बंद होण्याचे प्रमाण कमी होते.
ड : GP II b/ III a Inhibitor (जीपी टू बी/ थ्री ए इन्हिबिटर्स) यामुळेसुद्धा रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास खूप मदत होते आणि त्या पुन्हा होण्याचे प्रमाण कमी करते.

३) स्टॉटीन्स : कोलेस्टेरॉल कमी करणारी ही औषधे ४० ते ८० मि.ग्रॅम मात्रा डोसामध्ये दिली जातात. त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतील पापुद्रय़ाला इजा कमी होते.

४) बिटा ब्लॉकर्स- ही औषधे हृदयाची गती कमी करतात. दुखण्यामुळे आणि तणावामुळे हृदयाची गती खूप वाढलेली असते. त्यामुळे हृदयावरील ताण वाढलेला असतो. इजा झालेले हृदय हा अतिरिक्त ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे हृदयाचे अधिकच नुकसान होते.
बिटा ब्लॉकर्स या औषधांमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयावरील ताणही कमी होतो. आधीचक्षीण झालेल्या हृदयाला या औषधांमुळे बराच आराम मिळतो. त्यामुळे हृदयाला कमी इजा होते. हृदयाच्या स्नायूची थरथराट (Ventricular Fibrillation) होण्याचे प्रमाणसुद्धा बिटा ब्लॉकर्स या गोळ्यांनी कमी होते.

५) ACE Inhibitors (ए.सी.ई. इन्हिबिटर्स) या औषधोपचाराने हृदयाचा आकार आणि पम्पिंगक्षमता यावर चांगला परिणाम होतो. या औषधांनी रक्तदाबपण कमी होऊन हृदयावरील ताण कमी होतो.
ही औषधे रुग्णाच्या गरजेप्रमाणे तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरली जातात.
हृदयविकाराच्या झटक्याचे कारण असलेली रक्तवाहिनीतील गुठळी विरघळविणारी औषधे (म्हणजेच स्ट्रेप्टोकायनेज किंवा TPA – टेनॉक्टाप्लेज) फक्त ६० ते ७० टक्केच रुग्णांत परिणामकारक ठरतात. रुग्ण जितका उशिरा रुग्णालयात दाखल होतो, तितका या औषधांचा परिणाम कमी होतो. भारतामध्ये रुग्ण खूप उशिरा दाखल होतात. यामुळे या औषधांनी होणारा फायदा फार कमी होतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेथे रक्ताची गुठळी जमा होते, तेथे सहसा अवरोध असतो (Block) किंवा रक्तवाहिनीचा पापुद्रा (आतला अस्तर) फाटलेला, उद्ध्वस्त झालेला असतो. जोपर्यंत हा अवरोध, अडथळा किंवा फाटलेले अस्तर ठीक होत नाही, तोपर्यंत रुग्णाला सतत त्रास होऊ शकतो. अशा वेळी रुग्णाला रक्तवाहिनीतील रक्ताची गुठळी विरघळण्याचे औषध न देता ताबडतोब त्याची अॅन्जिओप्लास्टी करणे हे जास्त हिताचे, अधिक फायद्याचे असते. अशा अॅन्जिओप्लास्टीला ‘प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.

‘प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी’मध्ये रक्तवाहिनीमधील गुठळीसोबत त्यातील अडथळापण साफ करून तेथे स्टेंट टाकण्यात येतो. म्हणजे पुन्हा पुन्हा रक्तवाहिनी बंद होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. रक्तपुरवठा १०० टक्के सुरळीत होतो. याचे यशस्वी होण्याचे प्रमाणसुद्धा ९८-९९ टक्के आहे.
अधिकाधिक हृदयरोगतज्ज्ञ रुग्णाला प्रायमरी अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला देतात. यात मर्यादा फक्त एकच आहे की, ही उपचारपद्धती फक्त मोठय़ा कॅथ लॅबने सुसज्ज अशाच रुग्णालयांतच उपलब्ध आहे आणि यासाठी खर्चपण थोडा जास्त येतो. पण त्याचे रुग्णाला होणारे फायदे बघता ही ‘गोल्ड स्टॉडर्ड’ ट्रीटमेट ठरते.
हृदयविकाराचा झटका आणि त्यांची गुंतागुंत (Complication of Heart Attack) :

ज्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि काही गुंतागुंत निर्माण झाली नाही, अशा रुग्णाला दोन ते तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्वरित रोगनिदान आणि तत्परतेने उपचार केल्यामुळे lp34रुग्णास जीवदान मिळते.
पण काही रुग्णांमध्ये उशिरा पोहोचल्यामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅक मोठा असल्यामुळे म्हणा, उत्तम उपचार करूनही आरोग्याची गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते.
जेव्हा हार्ट अटॅक मोठा असतो तेव्हा हृदयाचा मोठा भाग निकामी होतो. हृदयाचे पम्पिंग कमी होते. जेव्हा पम्पिंग खूप कमी होते तेव्हा रक्तदाब कमी होतो, फुप्फुसामध्ये पाणी जमा होते. रुग्णाला धाप लागणे, दम लागणे, चक्कर येणे यासारखा त्रास होतो. किडनीचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. किडनी निकामी होण्यास सुरुवात होते. त्याला (cardiogenic shock) कार्डिओजेनिक शॉक असे म्हणतात. ही गंभीर समस्या असून त्यात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

अशा रुग्णाचे रक्तदाब डोपामीन, डोब्युटामाईन अॅड्रीनालिनसारख्या औषधांनी वाढवता येते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि हृदयावरील ताण कमी करण्यासाठी काही रुग्णांमध्ये आय.ए.बी.पी. (Intra Aortic Balloon Pump) महारोहिणीत फुगा टाकून यंत्राच्या साहाय्याने हृदयाची पम्पिंगक्षमता वाढवण्यास येते. या रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी करून जीवदान मिळू शकते. फुप्फुसात पाणी जमा झाल्यावर खूप दम लागतो. अशा वेळी व्हेंटिलेटरच्या साहाय्याने रुग्णास कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येतो आणि लॅसिक्स नावाच्या इन्जेक्शनद्वारे फुप्फुसातील कन्जेशन, पाणी कमी करण्यात येते.
काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात. काही रुग्णांमध्ये हृदयाची गती वाढून हृदयाच्या स्नायूंमध्ये थरथराट निर्माण होऊन हृदय बंद पडते. अशा वेळेस डिफिब्रिलेटरने विजेचा एक तीव्र झटका रुग्णाच्या छातीवर देण्यात येतो आणि हृदय पूर्ववत चालू होण्यास मदत होते. तर काही रुग्णांमध्ये हृदयाची गती अत्यंत कमी होते किंवा हृदयाचे ठोके थांबतातसुद्धा. अशा वेळी मानेतून किंवा जांघेतून हृदयात एक वायर टाकली जाते व तिला ‘पेसमेकर’ या विशिष्ट यंत्राला जोडून हृदयाची गती वाढवली जाते.

अशा पद्धतीने गुंतागुंत जितकी जास्त तितका अधिक काळ रुग्णास अतिदक्षता विभागात राहावे लागते. मॉनिटर्सद्वारे रुग्णावर सतत लक्ष ठेवावे लागते. अशा प्रकारे अतिदक्षता घेतल्यामुळे मोठय़ा हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे.

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांच्या समस्यांचा सामना थोरामोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांनाही करावा लागत आहे. हृदय रोगांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर्सही देत असतात. जर तुम्हीही तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी काही डाएट टिप्स शोधत असाल तर, जास्त विचार करू नका. त्यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही.


जेव्हा गोष्ट उत्तम हृदयासाठी असलेल्या हेल्थ टिप्सची असते, त्यावेळी तुम्हाला काही पदार्थांना कटाक्षाने स्वतःपासून दूर ठेवणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हृदयासाठी घातक असणाऱ्या पदार्थांबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत...


सोडिअमयुक्त पदार्थांचे कमी सेवन

अनेक संशोधनांमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, ज्या व्यक्ती आहारात जास्त सोडिअम असणाऱ्या पदार्थांचा समावेश करतात, अशा व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. काही लोकांना सोडिअमच्या अतिसेवनाने हृदयाशी निगडीत इतरही आजार होण्याचा धोका असतो.

शरीरातील सोडिअमचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त खाण्याच्या इतर पदार्थांमध्येही सोडिअम आढळून येते. त्यामुळे फक्त आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे सोडिअमयुक्त पदार्थांची एक यादी तयार करा आणि आहारातील सोडिअमचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.


ट्रान्स फॅट्सपासून दूर रहा

हेल्दी हार्टसाठी सर्वात उत्तम हेल्थ टिप्स काही असेल तर ती म्हणजे, आहारामध्ये कमीत कमी ट्रान्स फॅट्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. आपल्या सर्वांच्या आहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात, ज्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स मुबलक प्रमाणात असतात.

डाएटमध्ये ट्रान्स फॅट्सपासून दूर राहण्यासाठी बटाट्यापासून तयार करण्यात आलेले आणि खासकरून तळलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर राहा. तसेच तळलेल्या पदार्थांचेही जास्त सेवन करणं टाळा.


जंक आणि फास्ट फूड

बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये जंक फूड आणि फास्ट फूड आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. परंतु हे दोन्ही पदार्थांचे प्रकार हृदयासाठी हानिकारक ठरतात. जर तुम्हीही पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ खात असाल तर तुम्ही जास्त कॅलरीसोबतच सोडिअमही जास्त खात आहात. त्यामुळे हेल्दी हार्टसाठी या पदार्थांपासून दूर राहणचं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.


फॅट आणि कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ

नवनवीन पदार्थ खाण्याच्या अट्टाहासापोटी आपण अनेकदा अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतो. फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता आणखी वाढते.

तळलेले मांसाहारी पदार्थ, लाल मांस आणि तळलेले इतर पदार्थ फॅट आणि कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या असतात.


एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफेन पेय पदार्थ

हेल्दी हार्टसाठी एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफेन असणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करणं शक्यतो टाळावं. त्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. कारण हे पेय पदार्थ शरीरातील ब्लड प्रेशर वाढविण्याचं काम करतात. चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्सचं सेवन नियमितपणे करणं टाळावं.


नूडल्ससारख्या खाद्य पदार्थांपासून दूर रहा

सध्याच्या जंक फूडच्या युगामध्ये नूडल्ससारखे खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यात येतात. परंतु यांमध्ये सोडिअम आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असतात. याव्यतिरिक्त नूडल्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही अधिक असते.

सोडिअम, कॅलरी आणि कार्बोहायड्रेटच्या अधिक सेवनाने लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशरची समस्या वाढते. ज्यामुळे कालांतराने हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो.


हार्ट अटॅक आणि हृदय रोगाची लक्षणं

जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हार्ट अटॅकची लक्षणं (Symptoms Of Heart Attack) दिसून आली तर तुमच्या आहाराबाबत त्वरित सावध व्हा. कारण अशावेळी तुम्ही तुमचं डाएट कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं.


डाएटव्यतिरिक्त एक्सरसाइजही आवश्यक

पक्त डाएटमुळेच हार्ट हेल्दी राहत नाही तर त्यासोबतच शरीराला व्यायामाचीही गरज असते. त्यासाठी तुम्हाला दररोज अ‍ॅक्टिव्ह राहण्याचीही गरज असते. त्यासाठी दररोज कमीत कमी 6000 पावलं चालणं आवश्यक आहे. जर तुम्ही इतर व्यायामाचे प्रकार ट्राय करू शकत असाल तर आरोग्यासाठी उत्तम असेल.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.

हिवाळ्यात वातावरणातील गारवा वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका वाढतो. थंडीमुळे हृदयाच्या नसा गोठून जातात. ज्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. अशात हिवाळ्यात हृदयरोग आणि ब्लडप्रेशरच्या त्रासाने त्रस्त असणाऱ्या लोकांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हार्ट रेटचं अचानक वाढणं किंवा घटणं हे हृदय अस्वस्थ होण्याचं कारण असतं. हिवाळ्यात थंडीमुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट रेट वाढण्याची समस्या उद्भवते. अशातच जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर मात्र याचे गंभीर परिणाम भोगवे लागतात. वयोवृद्ध लोकांच्या हृदयाचे ठोके साधारणतः 60 ते 100 बीट्सपर्यंत पडतात. सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये वाढतात किंवा कमी होतात. परंतु जर तुम्हाला चक्कर येणं, डोकं दुखणं, छातीमध्ये वेदना होणं, जबड्याला वेदना होणं, डोळ्यांना धुसर दिसणं यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.


तणावापासून दूर रहा

हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो त्यामुळे या दिवसांत अनेकदा लोक तणावाचे शिकार होतात. अशावेळी पीडित लोकं जास्त साखर, ट्रान्सफॅट, सोडियम आणि जास्त कॅलरीज असलेलं जेवण जेवतात. असं जेवण लठ्ठपणा, हृदयाशी निगडीत आजार आणि हायपरटेंशन या समस्यांनी त्रस्त असणाऱ्य़ा लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे या दिवसांत शरीराचं वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शाकाहारी पदार्थांचं सेवन करा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, सलादचा समावेश करा.

वजन नियंत्रणात ठेवा

ज्या लोकांना डायबिटीजची समस्या अनुवांशिक आहे, त्यांनी लगेच आपलं वजन नियंत्रित करणं गरजेचं असतं. डायबिटीजचा फास्टिंग टेबल 110च्या खाली आणि जेवणानंतर 180च्या खालीच असणं गरजेचं असतं. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, हाई ब्लड प्रेशरच्या रूग्णांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेजही होऊ शकतं. थंडीमध्ये गरम कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्या. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नियमित तपासणी करा

थंडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गोठतात. यामुळेच हृदय रोगांनी त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या वाढते. हृदय रोगाने त्रस्त असणाऱ्या लोकांनी या वातावरणामध्ये काही खास गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. जेवढा शक्य असेल तेवढा व्यायाम करा. व्यायाम करण्यासाठी बाहेर जाणं शक्य नसेल तर घराच्या आतच व्यायाम करा. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रूग्णांना वयाच्या 40व्या वर्षी रक्तदाबाची तपासणी करणं आवश्यक आहे. नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 पर्यंत असणं गरजेचं असतं. जर या प्रमाणाने 150/90 चा टप्पा ओलांडला तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हृदय रोगापासून बचाव करण्यासाठी ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करणं गरजेचं असतं.

योग्य आहार घ्या

हृदय रोगांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी बदाम आणि पिस्त्याचं सेवन करणं लाभदायक ठरतं. ग्रीन-टी पिणंही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच थंडीमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं उन्हाच्या संपर्कात रहा. शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी करवंद किंवा क्रेनबेरीचा समावेश करणं गरजेचं असतं. नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.

देशभरात आणि जगभरात हार्ट अॅटॅकने होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड वाढती आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, आहार, ताण तणाव आणि सोबतच आरोग्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आदी कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. बऱ्याच वेळा आपणास हार्ट अॅटॅक योतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार काय करावेत. हार्ट अॅटेकची लक्षणे काय याबाबत फारसे कळत नाही. म्हणूनच जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणे थोडक्यात.

हार्ट अॅटेकची लक्षणे
सुरूवातीला उलटी होणे ( ओमेटींग).

तीव्र प्रमाणात डोकेदुखी

चक्कर येणे

हात, बोटे, खांदे, मान आणि पाठीचे दुखणे

मानसिक अस्वस्थता..

श्वास घेताना अडथळे

प्रचंड घाम येणे

अशक्तपणा / थकल्यासारखे वाटणे

तणाव आणि भीती...

हार्ट अॅटॅक येताना दिसतात ही लक्षणे

सामान्यपणे थोडंस दुखायला लागल्यावर डॉक्टरांची परवानगी न घेता पेनकिलर घेतली जाते. पण ही पेनकिलर आपल्या शरिरासाठी हानिकारक असल्याचं आपल्याला माहित आहे. तरीही या गोळ्या सर्रास घेतल्या जातात. या औषधांमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते.

'बीएमजे'मध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनात याची माहिती आहे. डायक्लोफेनेकच्या ऐवजी पॅरासिटामोल किंवा इतर औषधांचा वापर केला जाऊ शकतो. डेनमार्कच्या आरहुस युनिर्व्हसिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, डायक्लोफेनेक शरिरासाठी खूप घातक आहे. ही गोळी कोणत्याच स्टोरवर उपलब्ध न होणे हेच योग्य आहे. आणि जरी ही गोळी बाजारात उपलब्ध झालीच तरी पण पॅकेटमध्ये न मिळणं जास्त फायदेशीर आहे.

डायक्लोफेनेक दुखणे आणि सूज येणे यावर त्याचा वापर केला जातो. पारंपरिक नॉन स्टेरॉयड एन्ट्री इंफ्लॅमेटरी औषध आहे. हे अगदी व्यापक स्वरूपात जगभरात कुठेही उपलब्ध होते. त्यामुळे सर्रास अशा पेनकिलचा वापर करण्यापूर्वी थोडा विचार करा.

Dr. Ramesh Ranka
Dr. Ramesh Ranka
MS - Allopathy, Orthopaedics, 25 yrs, Pune
Dr. Amit Gupte
Dr. Amit Gupte
BDS, Dentist, 18 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Sayali Shinde
Dr. Sayali Shinde
BAMS, Pune
Dr. Ajit kadam
Dr. Ajit kadam
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 20 yrs, Pune
Hellodox
x