Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या आहारात असायलाच हवेत हे '६' पदार्थ!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

मातृत्वाच्या टप्प्यावर जेव्हा स्तनपान करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक आई आपल्या आहाराबाबत जागरूक होते. आपल्या बाळाला पुरेसं दूध मिळावं व आपल्याला ही उत्साही, आरोग्यदायी वाटावं असं प्रत्येकीला वाटत. अशाच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी काही पोषक अन्नपदार्थ...

जर्दाळू:
जर्दाळू खाल्ल्याने स्त्रियांच्या शरीरात दुधाची निर्मिती अधिक प्रमाणात होते. ताजे जर्दाळू खाणे उत्तम ठरेल. पण हवाबंद डब्यातील जर्दाळू विकत घेणार असाल तर शुगर सिरप ऐवजी नैसर्गिक रसात पॅक केलेले जर्दाळू विकत घ्या.

खजूर:
लोह आणि कॅल्शिअमने युक्त असे खजूर खाल्याने दुधाच्या निर्मितीत वाढ होते. रोज अर्ध्या कप खारीक खाल्याने तुमची दिवसभराची गरज भागवली जाते.

कोबीची पाने:
स्तनपान करत असताना बाळाला पोषकतत्त्व पुरवण्यासाठी शरीराला अधिक कॅलरीजची गरज भासते. कोबीच्या पानात अधिक प्रमाणात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि के असते. आहारात पालेभाज्या जरूर घ्या. मधल्या वेळेत कोबीच्या पानांचे चिप्स खाल्ल्याने काहीतरी वेगळे खाल्ल्याचा आनंद नक्की मिळेल.

भोपळा आणि त्यासारख्या अन्य भाज्या:
दुधीभोपळा, भोपळा, शिराळ यांसारख्या भाज्या दूध निर्मितीस मदत करतात. त्याचबरोबर यात भरपूर पौष्टीक घटक असून पचनास ही हलक्या असतात.

मेथी:
यात मुबलक प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम असल्याने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी उत्तम आहे. कारण यामुळे दूध निर्मितीस चालना मिळते. तसंच यात galactagogues असल्याने स्त्रिच्या शरीरात दूध तयार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे इतर भाज्यांवर घालून खा किंवा ग्लासभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या.

तूप:
तुपामुळे दूध निर्मितीचे कार्य अधिक सक्रिय होते. तसेच त्यातून अनेक पोषकघटक मिळतात ज्यामुळे हाडं मजबूत होतात. तुम्ही काही भाज्या तेलाऐवजी तुपात बनवू शकता.

Published  

खेळ लहानग्यांसाठी फायदेशीर

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

एका जागी कधीच शांत न बसणारी, सतत इकडून तिकडे पळणारी आणि खूप उड्या मारणारी लहान मुलं पाहिली की प्रश्न पडतो या चिमुरड्यांकडे इतकी ऊर्जा येते कुठून? लहान वयात शरीर लवचिक असतं आणि नवनवीन गोष्टी करून बघण्याचा उत्साह असतो. या वयात एखाद्या क्रीडाप्रकाराची मुलांना ओळख करून दिली तर ती त्यांच्या आरोग्यदायी आयुष्याची एक गुरुकिल्लीच ठरेल.


चांगल्या सवयी या लहान वयातच लागतात. त्यामुळे मजा म्हणून खेळाचा आनंद घेत असतानाच मुलांना खेळाचे नियमही बारकाईनं समजावून द्यायला हवेत. क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धात्मक जगताशी ओळख करून देत असतानाच खेळाची गोडी लावायला हवी. मुलांनी खेळावर मनापासून प्रेम केलं तर मग पुढे हार-जित स्वीकारणं त्यांना सोपं जाईल.

कुठलाही खेळ खेळल्यामुळे अवयवांचा अंतर्गत समन्वय अधिक जलद गतीनं साधला जातो. प्रत्येक क्रीडाप्रकाराचं एक वेगळेपण असलं तरी कौशल्यांचे काही धागे समान असतात. मैदानी खेळांमुळे मातीशी एक नातं निर्माण होतं. तर सांघिक खेळ संघभावना दृढ करतात. बुद्धीचा कस पाहणाऱ्या बैठ्या खेळांमुळे एकाग्रता वाढते आणि विचारांचा दृष्टिकोन रुंदावतो.

सर्वतोपरी फिट

क्रीडाप्रकार शरीराला नियमित व्यायामाची सवय लावतात आणि शरीराला एक वळण लागतं. धावणं, जॉगिंग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं, पोहणं मुलांची तग धरून राहण्याची क्षमता वाढवतात. तर क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो यासारखे अनेक खेळ एक आनंददायी अनुभव देतात.

सुरक्षित हृदय

व्यायामामुळे रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित पार पडते. खेळत असताना दमल्यावर थोडा दम लागतो. मग अशावेळी श्वास कधी रोखून धरायचा, दीर्घ श्वास कधी घ्यायचा, श्वास नाकानं घेऊन तोंडानं कसा सोडायचा याचे प्रात्यक्षिक धडे नकळत मुलांना मिळतात. भविष्यात उद्भवणाऱ्या हृदयविकाराच्या समस्यांकरता ही संरक्षणात्मक ढाल ठरते.

तंदुरुस्त शरीर

क्रीडा प्रकार शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. खेळांमुळे न दिसणारे पण हळूहळू जाणवणारे काही सूक्ष्म बदल शरीरात होतात. नियमित सरावामुळे क्रीडाकौशल्य विकसित होऊ लागतात. उदा. धावण्याचा वेग हा योग्य पद्धतीनं रोज सराव केला की वाढतो.

फायदे

- व्यायाम केल्यानं झोप चांगली लागते. शरीर थकलेलं असलं की पटकन गाढ झोप लागली जाते. शांत आणि आरामदायी झोपेमुळे पुढील दिवसाची छान सुरुवात करता येते.

- व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहील. तुमच्या अंगात उत्साह संचारेल आणि मग ताण कुठल्या कुठे पळून जाईल.

- क्रीडा प्रकारांमुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि चौफेर विचार करण्याची क्षमता वाढीस लागते.

Published  

लहान मुलांमधील इंटरनेटचं व्यसन दूर करणार 'हा' उपाय

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

आजकाल लहान मुलांना इंटरनेटचं व्यसन लागलं आहे. इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने आजकाल मुलांचाही बराच वेळ फेसबुक, इंस्टाग्रामवर जातो. अमेरिकेत किशोरवयीन आणि युवकांमधील मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी खास क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. यामुळे मोबाईल फोनचं व्यसन सोडवण्यास मदत होत आहे.

सॅन फ्रॅन्सिकोपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका हवेलीमध्ये क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक एका टेकडीच्या उंचावर हिरवळीवर आहे. या क्लिनिकमध्ये सुमारे 45 दिवस उपचार केले जातात. येथे मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटवर बंदी आहे. संगणकाचाही उपयोग केवळ क्लासरूममध्ये होतो. या वापरावरही शिक्षक आणि मानसोपचारतज्ञ लक्ष ठेवून असतात.

क्लिनिकमध्ये रूग्णांवर खास थेरपी दिली जाते. या थेरपीद्वारा मुलांचा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता सुधारते. ऑफलाईन जगात मित्रपरिवार, आजूबाजूच्या व्यक्तींसोबत अधिक वेळ घालवला जातो. थेरपीसोबतच मुलांमधील कौशल्यविकासाकडे अधिक लक्ष दिले जाते. व्यायामाकडे अधिक लक्ष दिले जाते.

योगाभ्यास आवश्यक

आत्मिक शांती मिळवण्यासाठी अध्यात्माची मदत होते. लहान मुलांमध्ये योगासनाची आवड निर्माण केली जाते. मुलांचा दिनक्रम अशाप्रकारे बनवल्याने हळूहळू ते ऑफलाईन जगात रूळायला मदत होते. अमेरिकेमध्ये याला मानसिक आजार समजले जात नसले तरीही ऑस्ट्रेलिया, चीन, इटली, जापानमध्ये इंटरनेटचं व्यसन हा मानसिक आजार आहेत. तर दक्षिण कोरियात या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी खास सरकारी रूग्णालयात उपचार उपलब्ध करून दिले जातात.

कसं ओळखाल इंटरनेटच्या व्यसनाचं लक्षणं

इंटरनेट उपलब्ध नसल्यास मुलांना राग येणं,
सोशल मीडियाचा लपून छपून वापर करून त्याबाबत खोटं बोलणं,
कुटुंबातील व्यक्तींशी संवाद कमी होणं,

मुलांमध्ये अशाप्रकारची व्यसन निर्माण झाल्यास त्यांच्या इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचे आहे.

Published  

गाईचं दूध प्या उंच व्हा

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

ज्यांच्या घरात साधारण दहा-बारा महिन्यांची बाळं असतात, अशी मंडळी आजकाल डॉक्टरांना हा प्रश्न विचारतात. प्रश्न ऐकून डॉक्टरांना खरंच खूप भरून येतं. २१व्या शतकातील आरोग्यशैलीत या पालकांनी बाळाला चक्क दूध पाजायचा निर्णय घेतला, हेच खरं डॉक्टरांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. गायीचं दूध, म्हशीचं दूध, डबाबंद पावडरचं दूध, पॅकेज्ड दूध, सोया दूध, बदामाचं दूध असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर असतात. आपल्या या प्रश्नाचं उत्तर संगणकावर न शोधता डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या गोष्टीचं अप्रूप डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही, तर नवलच.


तसं पहिलं, तर दूध हे पूर्णान्न समजलं जातं. एक वर्षापर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं आवश्यक असतं. त्यानंतर मुलांना सर्व स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, कर्बोदकं असे सर्व अन्नघटक, जीवनसत्वं आणि कॅल्शियमसारखी खनिजं पुरवणारे दूध हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे मुलांचे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्था उत्तम बनते. त्यातही आपल्या देशात फार पूर्वीपासून गायीचंच दूध मुलांसाठी उत्तम समजलं जातं.
या समजुतीला पुष्टी देणारं एक संशोधन नुकतंच ‘अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशन’च्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. कॅनडामधील सेंट मायकेल्स हॉस्पिटलमधील डॉ. जोनाथन मॅग्वायर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या संशोधनानुसार, जी मुलं गायीचं दूध अगदी लहानपणापासून नियमितपणानं घेतात, त्यांची उंची इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वाढते.


या संशोधनामध्ये २ वर्षं ते ६ वर्षं वयाच्या ५,०३४ मुलांची वर्षभर पाहणी करण्यात आली. या मुलांना रोज १ ते ३ कप दूध देण्यात आलं. यातील ८७ टक्के मुलांना फक्त गायीचं, १३ टक्के मुलांना इतर प्रकारचं आणि ५ टक्के मुलांना दोन्ही पद्धतीचं दूध रोज देण्यात आलं.
या सर्वेक्षणाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या आणि चित्तवेधक गोष्टी नजरेस आल्या :

जी मुलं गायीचं दूध घेत नव्हती, त्यांची उंची त्यांच्या वयाला किमान अपेक्षित उंचीपेक्षा कमी भरली. आकडेवारीनुसार दर कप (२५० मिलीलिटर) दुधामागे ०.४ सेंटीमीटरनं ती खुजी भरली.

ज्या मुलांना फक्त गायीचं दूध दिलं जात होतं, त्यांची उंची त्यांच्या वयाच्या किमान अपेक्षित उंचीप्रमाणे ०.२ सेंटीमीटरनं अधिक वाढली.

३ वर्षांच्या मुलांमध्ये रोज ७५० मिलीलिटर गायीचं दूध घेणारी मुलं, त्याच वयाच्या इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा १.५ सेंटीमीटरनं उंच भरली.

जी मुलं गायीचं आणि इतर असं दोन्ही प्रकारचं दूध घेत होती, त्यांची उंचीदेखील फक्त गायीचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा कमी भरली.

या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की ५०० मिलीलिटर गायीच्या दुधात सर्वसाधारणपणे १६ ग्रॅम प्रथिनं असतात. म्हशीच्या दुधात ती तितक्याच प्रमाणात असतात; पण सोया मिल्क, बदामाचं दूध आणि इतर पॅकेज्ड दुधात ती खूपच कमी असतात. गायीच्या दुधातील प्रथिनं बाळाच्या पचनास सोपी असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम उत्तम होतो. म्हशीच्या दुधात स्निग्धांश खूप जास्त असतो. त्यामुळे मुख्यत्वे मुलांच्या चरबीत वाढ होते. दोन्ही प्रकारच्या दुधातजीवनसत्व आणि कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजं भरपूर असतात; त्यामुळे उंची वाढायला मदत होते. या संशोधकांच्या मते उंची वाढण्याच्या क्रियेला गायीच्या दुधाची जास्त मदत होते.


या संशोधनाचा मुख्य भर हा कृत्रिम आणि फॅन्सी दुधांवर जास्त आहे. एकविसाव्या शतकातल्या पालकांनी हे लक्षात घ्यावं, की नैसर्गिक दूध मग ते गायीचं असो, की म्हशीचं, कुठल्याही जाहिरातबाजी करणाऱ्या दुधाच्या ब्रँडपेक्षा जास्त सकस असतं. त्याचबरोबर, दुधात टाकून त्याची चव बदलणाऱ्या आणि मुलांची उंची आणि स्टॅमिना वाढवण्याची अशास्त्रीय जाहिरात करणाऱ्या बाजारू चॉकलेटी पावडरींपेक्षा गायीचं दूध लक्षपट आरोग्यदायी असतं.

Published  

बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे ?

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

मुंबई : बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला सर्वात आधी आईचे दूध दिले जाते. स्तनपानातून बाळाला मिळणारे दूध हे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे किमान सहा महिने बाळाला केवळ स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. मग बाळासाठी अमृताप्रमाणे असणारे दूध स्तनपानाच्या मार्फत किती वर्ष द्यावे? हा विचार तुमच्या मनात डोकावत असेल तर हा सल्ला नक्की जाणून घ्या.

स्तनपानाचे फायदे
स्तनपान करण्याचे फायदे नवजात बाळाला आणि आईला अशा दोघांनाही होतात. आईचं दूध हे बाळामध्ये डायरिया आणि उलटीचा त्रास कमी करण्यास मदत करते.

बाळाला योग्य प्रमाणात स्तनपानाच्या मार्फत दूध मिळाल्यास भविष्यात लठ्ठपणा आणि इतर समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. स्तनपान केल्याने स्त्रीयांमधील ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

कोणत्या काळापर्यंत स्तनपान करावे ?
नॅशनल हेल्थ सर्विसच्या वेबसाईटनुसार, आई आणि बाळ दोन्ही त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि इच्छेनुसार स्तनपानाचा आनंद घेऊ शकतात. WHO च्या अहवालानुसारही स्तनपान हे किमान सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत केले जाऊ शकते.

मुलांना पोषक आहार
रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,स्तनपानातून दोन वर्षांनंतर मुलांना अधिक पोषणतत्व मिळतात याबाबत कोणतेही संशोधन नाही. दोन वर्षांनंतर मुलांच्या आहारात सार्‍याच पोषक घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे.
स्तनपानामुळे बाळ आणि आईमध्ये बॉन्डिंग वाढण्यासही मदत होते. मात्र अनेक महिला विशिष्ट टप्प्यानंतर पुन्हा त्यांच्या कामावर रुजू होतात त्यामुळे स्तनपान किती वर्ष चालू ठेवायचा हा सर्वस्वी आईचा निर्णय असू शकतो.

समज गैरसमज
2016 सालच्या अंतरराष्ट्रीय स्टडीच्या अहवालानुसार, ब्रिटेनमधील महिला जगात सगळ्यात कमी काळ बाळाला ब्रेस्टफिडींग करतात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याबाबत महिलांना लाज वाटत असते याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सरकारकडूनही सर्वजनिक ठिकाणी खास कक्ष उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dr. Swapnil Dhamale
Dr. Swapnil Dhamale
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Bhagyashri Madake- Kuber
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Harishchandra Chaudhari
Dr. Harishchandra Chaudhari
DNB, Physician, 10 yrs, Pune
Dr. Aradhana Patkar
Dr. Aradhana Patkar
Specialist, Gynaecologist Infertility Specialist, 4 yrs, Pune
Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Hellodox
x