Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



 पिंपल्स :

आपल्या चेहऱ्यावरील त्वचेमध्ये ‘सिबम’ हा एक प्रकारचा स्राव तयार करणाऱ्या तैलग्रंथी असतात. कपाळ आणि नाकावर या ग्रंथींचे प्रमाण सर्वाधिक असते. त्वचेला स्निग्धता देण्यासाठी हा स्राव आवश्यक असतो. त्याची कमतरता झाल्यास त्वचा रूक्ष आणि कोरडी होते. मुले-मुली वयात येताना, म्हणजे १२ ते १४ वयाच्या सुमाराला अँड्रोजेनसारख्या काही हॉर्मोन्सचे प्रमाण वाढू लागते. या हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे सिबम तयार करणाऱ्या ग्रंथी जास्त प्रमाणात सिबम तयार करतात. त्यामुळे या वयात त्वचा विशेषत: कपाळ आणि नाकावर तेलकट होऊ लागते. काही वेळा हा स्राव बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा येतो. असे झाले तर स्राव आत साठून राहून तिथल्या ग्रंथीला सूज येते. त्यात काही जंतूंची वाढ होते, पू होतो आणि ‘पिंपल’ तयार होतो. चेहऱ्यावर, पाठीवर आणि अगदी खांद्यावरही असे पिंपल्स येऊ शकतात. यालाच‘तारुण्यपीटिका’असेही म्हणतात. ‘तारुण्यपीटिका’म्हणजे तारुण्यात प्रवेश करणाऱ्या युवक-युवतींचं एक दुःस्वप्न. चेह‍ऱ्यावरच्या या छोट्या छोट्या पुटकुळ्या अगदी हैराण करतात. अगदी आरशात बघणंही नकोसं वाटतं.चेह‍ऱ्यावर येणा‍ऱ्या त्या लहान लहान पुटकुळ्या भारी त्रासदायक असतात. त्यातल्या काही लाल होतात, काहींच्या टोकावर काळे ठिपके येतात. त्यांच्यापैकी काही पुटकुळ्याचे फोड होतात, त्यातून कधी कधी पिवळसर द्रव येतो, तर कधी कधी त्यांच्या गाठीसुद्धा होतात. चेहरा अगदी राठ आणि भेसूर वाटायला लागतो. तारुण्याच्या लाटेवर स्वार झालेल्या त्या युवा मनात, हे का होतं? आणि यांवर काय करायचं? अशा प्रश्नांचं काहूर माजतं. साहजिकच मग घरातले ज्येष्ठ, मित्रमैत्रिणी यांचे चुकीच्या समजुतींवर आधारलेले सल्ले आणि उपचार सुरू करतात. त्यातच या युवकांच्या या अवस्थेचा आणि अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या असंख्य बाजारू औषधांचा, मलमांचा वापर सुरू होतो. शेवटी तारुण्यपिटीका आहे, तशाच राहातात.

कशा बनतात तारुण्यपीटिका?

तारुण्यपीटिका किंवा मुरमं हा त्वचेखालील तैलग्रंथींचा आजार आहे. प्रथम या तैलग्रंथीच्या सभोवतालच्या त्वचेच्या केरॅटिनोसाइट्स नावाच्या पेशी शरीरातून बाहेर निघून जाण्याऐवजी एकत्रित होऊन, तैलग्रंथीच्या तोंडाशी छोटी गुठळी (मायक्रोकॉमिडोन) तयार करून त्या ग्रंथीचा स्त्राव बाहेर जाण्याचा मार्ग बंद करतात. यौवनावस्थेत पदार्पण करणाऱ्या युवकांमध्ये ‘अॅण्ड्रोजेन्स’ हार्मोन मोठ्या प्रमाणात असतात. ते तैलग्रंथीवर असा काही परिणाम करतात, की त्यातून तैलयुक्त घट्ट स्राव जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागतो. ग्रंथीचं तोंड बंद झाल्यानं साहजिकच तैलग्रंथी गच्च फुगते आणि आतल्या आत फुटते. त्वचेमध्ये ‘प्रॉपिओनीबॅक्टेरियम अॅक्ने’ हे सहजीवी जंतू एरवी सूक्ष्म प्रमाणात असतात. तैलग्रंथीचं तोंड बंद झाल्यानं, त्या भागात प्राणवायू पोहोचत नाही. ही परिस्थिती या जंतूंच्या वाढीला पोषक ठरते आणि त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. या जंतूंद्वारे त्या तैलग्रंथीला सूज येते आणि तारुण्यपीटिका तयार होतात.

शास्त्रीय संशोधनात असं निष्पन्न झाले आहे, की मुरुमं आणि मायक्रोकॉमिडोन तयार होणं ही काही ठराविक युवक-युवतींमध्ये जनुकीय प्रवृत्ती (जेनेटिक टेंडंसी) असते. त्यामुळे बाह्य गोष्टींचा प्रभाव, खाण्यापिण्यातल्या गोष्टी यांच्याशी त्यांचा संबंध नसतो. साहजिकच युवकांच्या मनात जे भरवलं जातं, की चॉकलेट्स, कोला ड्रिंक्स, पिझ्झा-बर्गर, तळलेले पदार्थ खाण्यानं मुरुमं होतात हे तद्दन चुकीचं असतं. खूप जागरणं केल्यानं, रोजच्या ताणतणावामुळे मुरुमं होतात अशा समजुतींनादेखील शास्त्रीय आधार नाही. फारतर एखाद्याला खूप मुरुमं असतील, तर त्यानं त्याच्या चेहऱ्यावरील फोड जास्त सुजू नयेत म्हणून या गोष्टी टाळाव्यात, इतपत म्हणणं संयुक्तिक ठरेल. अर्थात आपलं बाकी आरोग्य चांगलं राखण्यासाठी या सा‍ऱ्या गोष्टींचा कमी वापरच चांगला. मुरुमं येऊ नयेत म्हणून चेहरा सतत साबणानं किंवा फेसवॉशनं सतत धुवावा असं युवकांना सांगितलं जातं, तेही चुकीचं आहे. चेहऱ्यावर फक्त धूळ माती बसून मुरुमं येत नाहीत, साधे फोड येऊ शकतील. चेहरा दिवसातून दोन-तीनवेळा पाण्यानं धुतला तरी पुरेसं असतं. फेसवॉशमुळे त्वचा फक्त पाचच मिनिटं ओली राहील. उलट सारखा फेसवॉश वापरला तर चेहऱ्याची त्वचा विनाकारण शुष्क कोरडी होऊ शकेल. त्याऐवजी चेहरा जास्तवेळ ओलसर ठेवणारी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं श्रेयस्कर ठरतं.

अनेकांना मुरमांचे फोड फोडून त्यातील बी काढून टाकल्यास ती बरी होतात असं वाटतं. त्यामुळे फोड जरी सुकले, तरी त्यांचे व्रण कायमचे चेहऱ्यावर राहातात.
तारुण्यपीटिका फक्त चेहऱ्यावरच येतात असं नाही, तर त्या पाठीवरदेखील येतात आणि तितक्याच पीडा देतात. फक्त समाजात पाठ झाकलेली असते आणि चेहरा सगळ्यांना दिसत असतो, त्यामुळे पाठीवरच्या मुरुमांकडे पाठ फिरवली जाते. तारुण्यपीटिका त्यातील ‘तारुण्य’ या शब्दामुळे फक्त तरुणांमध्येच होतात असं समजलं जातं; पण त्या तिशी-चाळिशीत अगदी पन्नाशीतसुद्धा येऊ शकतात. त्यांची तीव्रता या काळात कमी असते; पण बाकी लक्षणं आणि रूप तेच असतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की तारुण्यपीटिका हा एक कॉस्मेटिक आजार आहे. त्यामुळे दुकानात जाऊन नामवंत नटी जे क्रीम वापरते ते घेऊन आपण वापरलं, की आपलीही मुरुमं बरी होतील. एखाद्या ब्युटीशियनचा सल्ला घेऊन त्या बऱ्या होतील; पण हे इतकं सोपं नसतं. मुरुमांची तीव्रता, त्यांची अवस्था, गुंतागुंत, त्वचेचा प्रकार, त्या व्यक्तीची एकूण तब्येत यांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे थोडेफार वेगळे उपचार असतात. त्यामुळे मान्यताप्राप्त त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं, हाच यावर योग्य मार्ग असतो. अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या मते, हा थोडी वर्षे होणारा एक त्रास असतो, याला औषधाची गरज नसते. त्यांना हात लावला नाही आणि वय वाढलं की मुरुमं आपोआप जातात. हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. १३-१४ व्या वर्षी सतत येणारी मुरुमं तिशीमध्ये बंद होतील; पण तोपर्यंत चेहरा असंख्य फोडांनी आणि व्रणांनी विद्रूप होऊन जाईल. यावर उपचार घेऊन ती बरी झाली म्हणजे कायमची बरी झाली, असा अनेक जणांचा समज असतो; पण मुरुमं होणं ही जनुकीय प्रवृत्ती असल्यानं ती बरी झाल्यावर पुन्हा येतात. त्यामुळे याचा उपचार ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते, हे ध्यानात घ्यावं.
आजमितीला तारुण्यपीटिकांसाठी वेगवेगळी आधुनिक वैद्यकीय औषधं, अॅण्टिबायोटिक्स, लोशन्स, क्रीम्स, मलमं, त्वचेच्या शस्त्रक्रिया, लेझर उपचार उपलब्ध आहेत. त्याचा गरजेइतका फायदा तुम्ही घेऊ शकता.

कारणे आणि लक्षणे :
* मुली आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता. ओव्हरीजमध्ये ‘सिस्ट’ निर्माण होण्याच्या ‘पीसीओडी’ या विकारात अनियमित पाळीबरोबरच पिंपल्स आणि चेहऱ्यावर केसांची लव वाढणे अशीही लक्षणे दिसतात.

* चेहऱ्यावर लावण्यात येणारी निरनिराळी क्रीम्स. मेकअपचा सतत वापर, सतत फेशियल करण्यामुळेही त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स वाढतात.

* सध्या गोरेपणाचे फॅड वाढत आहे. त्यासाठी वेगवेगळी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली जातात. या स्टिरॉईड औषधांचा एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी पडते. तो गोरेपणा नसतो. या क्रीममुळे पिंपल्स वाढतात.

डोक्यातील कोंडय़ामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का?
* मुळीच नाही. डोक्यात होणारा कोंडा म्हणजे आपल्या त्वचेच्या वरचा निघून जाणारा थर असतो. हा कोंडा चेहऱ्यावर, पाठीवर पडल्यामुळे पिंपल्स येत नाहीत.

पिंपल्समुळे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात?
चेहऱ्यावरील पिंपल्सबद्दल बहुतेक मंडळी खूप निष्काळजीपणा करतात. काही दिवसांनी पिंपल्स बरे होतील म्हणून काही जण काहीच उपचार करत नाहीत, तर काही जण जाहिराती पाहून किंवा आपल्याच मनाने पिंपल्स घालवण्यासाठीच्या ना-ना गोष्टी वापरून पाहतात. सतत पिंपल्स येत राहिले तर त्वचेवर कायमचे खड्डे, काळसर डाग पडू शकतात. ते नष्ट करणे अवघड आणि खर्चिकही असते. पिंपल्सवर योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर हे टाळता येते.

उपाय काय?
* पिंपल्सवर क्रीम औषधांबरोबरच काही पोटात घेण्याची औषधेही आहेत. मात्र ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

* स्त्रियांच्यात अनियमित मासिक पाळीमुळे पिंपल्स येण्याचा त्रास असेल तर पाळी नियमित येण्यासाठी वेगळे उपचार घेणे गरजेचे ठरते.

*‘केमिकल पिलिंग’ ही पिंपल्सवरील एक नवीन उपचारपद्धती आहे. यात चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रासायनिक द्रावणाचा वापर केला जातो. पिंपल्सवरील उपचारांमध्ये इतर औषधांबरोबरच ही पद्धत वापरता येते. पिंपल्सचे खड्डे कमी करण्यासाठीही ती उपयुक्त ठरते.

* पिंपल्सच्या खड्डय़ांवर उपाय म्हणून ‘डर्मारोलर’ आणि ‘लेझर’ या उपचारपद्धतीही वापरतात.



आपल्या शरीरावरील तीळ

शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींच्या जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात. बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. ते आकारमानाने लहान-मोठे असून चपट (सपाट) किंवा त्वचेच्या वर उंचवट्यासारखे असतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळाला फुगीर तीळ म्हणतात. त्यांचा रंग फिकट तपकिरी ते निळसर-काळा असतो. बहुतेक तीळ लहान असतात आणि त्यांच्या दृश्यरूपात सहसा बदल होत नाहीत. काही वेळा तिळावर लांब व गडद केस असतात. अशा केसयुक्त तिळामध्ये कर्करोग उद्भवण्याचा संभव अधिक असतो. काही कुटुंबातील सदस्यांच्या शरीरावर तीळ वाढण्याची प्रवृत्ती असू शकते. तीळ सहजासहजी दिसून येत नाहीत. मात्र, चेहऱ्यावरील ठळकपणे दिसणारे तीळ काही लोकांना अनाकर्षक वाटतात. असे तीळ शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात.

बहुतेक तीळ घातक नसतात. मात्र, क्वचित प्रसंगी त्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते. अशा प्रकारच्या कर्करोगाला कृष्ण कर्करोग (मेलॅनोमा) म्हणतात. या रोगाची सुरुवात तिळापासून होऊन त्याचा रंग बदलतो, खाज सुटते, आकार वाढतो आणि काही वेळा तेथून रक्त वाहते. या रोगामुळे लगतच्या निरोगी ऊतींचा नाश होतो आणि हा कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरू शकतो. वेळीच निदान झाल्यास आणि उपचार केल्यास कृष्ण कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे तिळाच्या स्वरूपात कोणताही बदल झाल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराची लक्षणं पाहून व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्याच्या विधीला सामुद्रिक विद्या म्हणतात. सामुद्रिक विद्येनुसार मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत शरीरावरील तिळांचा वेगवेगळा प्रभाव असतो.

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...

तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात....काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठांवर असेल तर तर क्या बात है... तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेत आणि आकर्षणात भर पडते. पण हाच तीळ ओठांच्या खालच्या बाजुला असेल तर मात्र दरिद्र्याची सूचना देतो.

जाणून घेऊयात... शरीरावर कोणत्या भागावर असणारा तीळ काय सांगतो...

- कपाळाच्या उजव्या भागावर असणारा तीळ समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असतो.

- कपाळाच्या मध्यभागी दिसणारा तीळ व्यक्तीच्या भक्कम आर्थिक परिस्थिती व्यक्त करतो.

- दोन भुवयांच्या मध्ये असलेला तीळ व्यक्ती परोपकारी, उदार आणि दिर्घायुषी असल्याचं सांगतो.

- गालांवर असलेला तीळ आर्थिक दृष्टी भरभक्कम पण व्यक्ती दुर्व्यसनी असल्याचं सूचित करतो.

- नाकाच्या उजव्या भागावर असलेला तीळ सुख आणि धनाकडे तर नाकाच्या डाव्या बाजुला असला तीळ कठिण परिश्रण आणि सफलतेकडे निर्देश करतो

- नाकाच्या मध्यावरच तीळ असेल तर व्यक्ती स्थिर वृत्तीची नसून इकडे तिकडे भटकताना दिसते.

- उजव्या गालावर असलेला तीळ प्रगतीशील असल्याचं सांगतो.

- डाव्या गालावर असलेला तीळ अशुभ मानला जातो. असा तीळ गृहस्थ जीवनात धनाची कमतरता सांगतो.

- हनुवटीवर आढळणारा तीळ व्यक्ती स्वार्थी, व्यक्तिवादी, केवळ स्वत:च हित पाहणारा आणि समाजापासून लांबच असलेला असा दिसतो.

- कंठावर तीळ असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी, सफल आणि स्वावलंबी असलेली आढळते.

- डाव्या हातावर असलेला तीळ शुभ चिन्हं व्यक्त करतो तर उजव्या हातावर तीळ कर्जाची चिन्हं दाखवून देतो.

- पोटाच्या खालच्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती कामूक असते. अनेक स्त्री पुरुषांच्या शरीरावर अशा प्रकारचे तीळ आढळून येतात

Dr. Uday  Maske
Dr. Uday Maske
BAMS, Ayurveda, 18 yrs, Mumbai
Dr. Sonali Chavan
Dr. Sonali Chavan
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Amar S. Shete
Dr. Amar S. Shete
BAMS, Family Physician, Pune
Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Hellodox
x